शतकापूर्वीची दोन बंडखोर नाटके


मराठीतील स्त्री लिखित आणि रंगभूमीवर आलेले पहिले गद्य नाटक अशी गिरीजाबाई केळकर यांच्या ‘पुरुषांचे बंड’ या नाटकाची ओळख आहे. १९१२ मध्ये हे नाटक रंगभूमीवर आले व १९१३ साली त्याचे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तकाला श्री. कृ. कोल्हटकरांची प्रस्तावना आहे. ‘बायकांचे बंड’ नावाचे नाटक १९०७ मध्ये रंगभूमीवर आले होते. ते संगीत नाटक होते. आणि ते बऱ्यापैकी लोकप्रियही झाले असावे. (कारण केवळ सात वर्षांत त्याच्या तीन आवृत्त्या निघाल्या होत्या). ‘बायकांचे बंड’नंतर पाच-सहा वर्षांत ‘पुरुषांचे बंड’ रंगभूमीवर यावे हा योगायोग होता का? निश्चितच नव्हता!

लेखिकेने निवेदनात म्हटले आहे, “एका संभाषणात काही काही गोष्टी पुरुषांना करता येण्यासारख्या असूनही ते त्या करत नाहीत हे मी जेव्हा दाखवून दिले तेव्हा स्नेही म्हणाले, ‘वहिनी तुम्ही तर उलटे आम्हालाच बंडखोर ठरवलेत. तर याविषयी एखादे सामाजिक नाटकच लिहाना.’ त्यावर मी म्हटले, बरं तर. मी जेव्हा नाटक लिहायला बसेन तेव्हा पहिल्याने ‘पुरुषांचे बंड’ हेच नाटक लिहिन.”

बार्इंनी हे नाटक फक्त पंधरा दिवसांत लिहिले असे त्या सांगतात. प्रस्तावनेत श्री. कृ. कोल्हटकर अधिक खुलासा करताना म्हणतात, ‘बायकांचे बंड’ या नावाचे एक रसभरित नाटक एका नाटककाराने लिहिले आहे. पुरुषांनी रूपाच्या व पराक्रमाच्या बळाने स्त्रियांवर मिळवलेल्या विजयाचे पुरुषवर्गीय कारागिरीने कौशल्यसर्वस्व खर्च करून रंगवलेले चित्र पुरुषांमध्ये लोकप्रिय व्हावे यात नवल नाही. रा. रा. खाडिलकरांनी पुरुषांची बाजू जितकी चांगली रंगवली आहे, तितकीच एखाद्या नाटककर्तीकडून स्त्रियांची बाजू पुढे येणे आवश्यक होते.’

आता यावरून स्पष्ट होते, की खाडिलकरांच्या ‘बायकांचे बंड’ या लोकप्रिय झालेल्या  नाटकाला प्रत्युत्तर म्हणून गिरीजाबार्इंनी ‘पुरुषांचे बंड’ लिहिले. खाडिलकरांची जी नाटके अधिक लोकप्रिय ठरली त्या ‘मानापमान’, ‘स्वयंवर’ यांच्या अगोदरचे नाटक ‘बायकांचे बंड’ हे संगीत नाटक होते आणि त्यात रागदारीवर आधारित तीस पदे होती. या कारणांमुळे या दोन ‘बंडां’चा विचार एकत्रितपणे करणे अधिक उचित ठरेल.

‘पुरुषांचे बंड’च्या प्रस्तावनेत कोल्हटकरांनी खाडिलकरांच्या नाटकांची लोकप्रियता ‘पुरुषांनी स्त्रियांवर मिळवलेल्या विजयाचे ‘पुरुषवर्गीय’ कारागिरीने कौशल्यसर्वस्व खर्च करून रंगवलेले चित्र’ यामुळे निर्माण झाली असे मत व्यक्त केले आहे. मुळात कारागिरी ही पुरुषवर्गीय अथवा स्त्रीवर्गीय असते हे म्हणणे सयुक्तिक वाटत नाही. दोन ‘बंडां’त काही साम्य आहे का आणि कोल्हटकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘बायकांचे बंड’ लोकप्रिय झाले ते पुरुषांनी स्त्रियांवर मिळवलेल्या विजयाचे चित्रण असल्याने झाले का हेही तपासून बघायला हवे.

गिरीजाबाई लिहितात, ‘जेवढे काम पुरुषांना करणे शक्य होते तेवढे पुरुषवर्ग करत नाही’ या त्यांच्या भूमिकेचा पाठपुरावा नाटकात केला आहे. असे असेल, तर हे बंड बायकांचे की पुरुषांचे? ‘बंडा’मध्ये बंड करणारा कोणीतरी अन्याय करणाऱ्याचा निषेध करत असतो. १८५७ चे बंड हे हिंदी जनतेचे होते, ब्रिटिश सरकारचे नव्हते. त्याच तर्काने येथे बायकांचे बंड म्हणायला हवे होते. असो.

खाडिलकरांच्या नाटकाचे कथानक अर्जुन-प्रमिला यांच्या विवाहाचे आहे. प्रमिलेने स्त्रियांचे स्वतंत्र राज्य स्थापले आहे. त्या राज्यात– सेनापती, वकील, पुजारी, न्यायाधीश अशा साऱ्या पदांवर स्त्रियाच कार्य करत आहेत. पुरुषांना त्या राज्यात येण्यास बंदी आहे. अर्जुनाला त्या राज्यातून अश्वमेधाचा घोडा न्यायचा आहे. परंतु राज्यात पुरुषांना प्रवेश नसल्याने तो आणि त्याचा साहाय्यक वेशांतर करतात (म्हणजे येथे बंड केलेले दिसत नाही). प्रमिला हिला विवाह करणे मान्य नसते. कारण तिच्यावर तिची गुरू सत्यमाया हिचा जबरदस्त पगडा आहे (सत्य आणि माया या परस्परविरोधी गोष्टी एका नावात गुंफून खाडिलकर नाटकाचा रोखच दाखवतात). सत्यमायेचे तीन सिद्धांत आहेत -

१. जन्म पुरुषाचा असो वा स्त्रीचा, लग्नामुळे तुम्ही परतंत्र होता.
२. लग्नानंतर प्रमिलेला नवऱ्यापेक्षा पारतंत्र्याची दु:खे जास्त भोगावी लागतील.
३. एक नवरा सोडून दुसरा केला तरी दुसऱ्या पुरुषाची दासी होऊन स्त्रियांना पारतंत्र्यात दिवस काढावे लागतात.

म्हणजे स्त्रियांची परवशता म्हटल्यावर जी टोकाची विधाने नजरेसमोर येतात, तीच खाडिलकर प्रथमच मांडतात. आता अशा प्रतिपादनाचा प्रतिवाद एक तर झगडा करून करता येतो किंवा वाद घालून, चर्चा करून म्हणजे विवेकाने करता येतो. खाडिलकर दुसरा मार्ग स्वीकारतात.

प्रमिलेचे मतपरिवर्तन करण्यासाठी अर्जुन जे चार मुद्दे मांडतो, त्यातील पहिले तीन परंपरागत पुरुषी विचारसरणीचे आहेत. ते म्हणजे –

१. संरक्षण आणि वाटाघाटी ही कामे स्त्रियांनी करणे हे परमेश्वरी इच्छेविरुद्ध आहे.
२. स्त्रीराज्यात पुरुषांना सर्रास राहण्याची परवानगी दिली तर लढाई न करता स्त्रीराज्य मोडले जाईल. कारण शरीराने/ बुद्धीने/ मनाने पुरुषजातीची योग्यता अधिक असल्याने, स्त्रीराज्यातील स्त्रिया आपखुशीने पांडवसेनेचा पुढारीपणा कबूल करतील.
३. संसारात पुरुषांचे वर्चस्व असावे, की बायकांचे असा खोटा प्रश्न पुरुषराज्यातील चंचलवृत्तीच्या काही बायका सोडल्या तर इतरांना पडत नाही.

हे मुद्दे अर्थातच आज ऐकून घेतले जाणार नाहीत. पण वाचक शंभराहून अधिक वर्षांपूर्वीचे नाटक वाचत आहेत हे लक्षात घेता त्या वेळच्या पुरुषी मनोवृत्तीचे दर्शन घडवणारे हे मुद्दे आहेत हे जाणवते. परंतु अर्जुनाचा नंतरचा मुद्दा अधिक महत्त्वाचा किंवा कळीचा आहे. तो म्हणतो, “पुरुषराज्यात अशा लाखो स्त्रिया पडल्या आहेत की ज्या पुरुषांवर प्रत्यक्ष अधिकार गाजवत आहेत. स्वतंत्र स्त्रीराज्यात अधिकार व सत्ता आपण बायकांवरच गाजवत आहेत. अर्जुन महाराजांना आपण मुठीत ठेवले तरच आपली शहामत खरी.”

त्यानंतर वेश बदललेला अर्जुन प्रमिलेबरोबर शिकारीला जातो. तो तिचे सिंहापासून संरक्षण करतो. तिच्या गुरूला पाण्यात बुडू देत नाही (वाचवतो). त्याच्या पराक्रमाने आणि देखणेपणाने प्रमिलेला त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागते.

प्रमिलेचे हृदयपरिवर्तन होते ते अर्जुनाच्या पराक्रमामुळे आणि सौंदर्यामुळे असे जे श्री.कृ. कोल्हटकर प्रस्तावनेत सुचवतात, ते तितकेसे पटत नाही. त्याचे कारण प्रमिलेच्या सहकारी स्त्रियांना त्यांच्या नवऱ्या/मुलांपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे त्या दु:खी आहेत. दुसऱ्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात प्रमिलेची एक सहकारी स्त्री राज्यातून सुटून नवऱ्याच्या घरी जाण्याची इच्छा प्रकट करते. एवढेच नाही, तर ती तिच्या नवऱ्याच्या चांगल्या स्वभावाची भलामणही करते.

तिसऱ्या अंकात रूप पालटलेल्या अर्जुनाच्या पराक्रमाची व रूपाची तिच्यावर भुरळ पडली आहे असे प्रमिला स्वत:शी कबूल करत असली तरी त्याचबरोबर तिच्या सहकारी तिला बजावतात, “मेल्या  पुरुषांचे तोंड चुकवून, त्यांच्यापासून दूर दूर पळून जाऊन ह्या चार पहाडांच्या भिंतींत कोंडून घेण्यापेक्षा पुरुषराज्यात शिरून पुरुषांना आपले गुलाम केल्याने आमची शपथ अधिक चांगली पाळली जाईल असे आम्हाला वाटते.” एवढे स्पष्ट बोलून त्या सहकारी स्त्रिया निघून जातात. प्रमिलेची सेनापतीसुद्धा लग्न करून निघून जाते. त्यामुळे प्रमिलेला स्त्रियांच्या चंचल स्वभावाची जाणीव होते.

त्यामुळे प्रमिलेचे परिवर्तन केवळ पराक्रमाने व रूपसौंदर्याने झाले असे म्हणणे म्हणजे नाटकाच्या मुख्य प्रतिपादन निदर्शक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. ‘बायकांचे बंड’मध्ये दाखवलेले/कल्पिलेले बंड हे एक शक्यता दर्शवणे यासाठी दाखवलेले आहे. ते करावे असे कोठेही प्रतिपादन केलेले नाही. उलट, असे बंड पुकारून राहण्याचा प्रयत्न कसा अव्यवहार्य आणि अनैसर्गिक आहे हेच सौम्यपणे दाखवले आहे.

त्याचबरोबर खाडिलकर सार्वजनिक व्यवहारातील एक तत्त्व सांगत आहेत. एखादी गोष्ट जर पसंत नसेल, चुकीची वाटत असेल तर तिचा निषेध म्हणून तीपासून दूर राहण्याऐवजी तिला बदलून टाकण्याचा प्रयत्न करणे हे अधिक योग्य असे ते मांडत आहेत. आजही आपण राजकारण बिघडले आहे म्हणून त्यापासून दूर राहण्याऐवजी राजकारणात पडून त्याची प्रत सुधारण्याचा प्रयत्न तरुणांनी करावा असे आवाहन मधून मधून ऐकतो. त्यामागे हेच तत्त्व आहे.

या पार्श्वभूमीवर ‘पुरुषांचे बंड’ कसे फसते ते पाहू. प्रथम ते बंड आहे का हेही ठरवणे इष्ट होईल. या नाटकातही एक राजा आहे. आणि त्याला मोक्षप्राप्ती,खरे ज्ञान वगैरे हवे आहे. त्यासाठी त्याने एक गुरू शोधला आहे. त्याचे नाव विकारानंद (विकार-आनंद. सत्यमायेला समांतर). राजाला शिष्य म्हणून स्वीकारण्यासाठी विकारानंद एक अट घालतो, की ‘राजाने राणीचा, मुलीचा त्याग करावा. स्त्रिया ह्या मोक्षप्राप्तीच्या मार्गातील मोठा अडथळा आहेत.’ राजा ते मान्य करतो आणि राणीचा त्याग करतो. तिला राजवाड्याबाहेर जाण्याची आज्ञा देण्याच्या अगोदरच राणी निघून गेलेली असते.

राजा असेही फर्मान काढतो, की ज्याला सरकारी नोकरी हवी असेल त्याने आपल्या कुटुंबातील पत्नी/मुलगी वगैरे स्त्रियांचा त्याग करावा. कोठलाही सामान्य पुरुष त्यामुळे नाखुष होईल. तसे राजाचे काही प्रजाजन नाखूष होतात, काही पळवाट काढतात. व्यापाऱ्यांनी स्त्रियांशी खरेदी-विक्रीचे व्यवहार करून नयेत. अशा हुकूमामुळे कासार, सोनार, शिंपी, माळी यांचे व्यवहार थंडावतात.

इकडे राणीसकट ज्या स्त्रियांना नवरे घराबाहेर काढतात त्या राज्याच्या बाहेर स्वतंत्र वस्ती करतात. तेथे त्या एक इस्पितळ काढतात – मूलत: गरीब स्त्रियांना फुकट आणि वरच्या वर्गातील स्त्रियांना माफक दराने औषधोपचार करतात. त्यासाठी अमेरिकेत शिकून एम.डी. झालेल्या एका डॉक्टर महिलेचे साहाय्य घेण्याचा त्यांचा विचार असतो.

पुढे राजा आपला राज्यकारभार मुलाकडे सोपवतो (पण राज्याभिषेक करत नाही). तक्रार घेऊन आलेले माळी, शिंपी, कासार, सोनार यांच्या तक्रारींवर राजपूत्र तोडगा काढत नाही. फक्त आश्वासन देतो. त्यांच्याकडे एक कलावंतीणही येते. ती म्हणते, “सरकार, आपल्याकडून आम्हाला निरोप मिळाला आहे आणि आम्ही स्त्रियांनीही शपथ घेतली आहे की पुन्हा पुरुषाचे वारे घ्यायचे नाही. तेव्हा यापुढे जर आपला कोणी सरदार आमच्या घरी येईल तर त्याला धक्के मारून बाहेर काढण्यात येईल. त्याच्याबद्दल फिर्याद झाल्यास आम्ही जबाबदार नाही. आज आपल्या बागेत आम्हाला नाचाबद्दल बोलावणे आले आहे. पण आता आम्हाला बोलावणे पाठवण्याचा अधिकार आपल्याला नाही. कारण आपण आम्हाला रजा दिलेली आहे. मात्र ही सरदार मंडळी आमच्या मोहल्ल्यात येऊन आम्हाला त्रास देणार नाही अशी तजवीज करण्याबद्दल अर्ज आहे.”

शेवटच्या अंकात (अंक ५), अपघातात जखमी झालेल्या एका राजपुत्रावर राणीच्या वसाहतीतील इस्पितळात ‘मानवतेच्या भावने’तून उपचार होतात. ज्या ईश्वराची आम्ही लेकरे आहोत, त्याच ईश्वराच्या दुसऱ्या लेकरांची म्हणजे आमच्या भावंडांची काळजी घेणे हे तर आमचे कर्तव्यच आहे.” आणि अशा या मानवी भूमिकेतून राजपुत्राचे प्राण वाचल्यामुळे राजाला आपली चूक वगैरे कळते आणि ‘पुरुषांचे बंड’ लयास जाते.

सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे ‘पुरुषांचे बंड’ हे वास्तविक पुरुषांनी केलेली घोडचूक आहे. मोक्षप्राप्तीत स्त्रिया या धोंड असतात, ह्या तद्दन चुकीच्या मताचा स्वीकार केल्याने काय अनर्थ घडू शकतात त्याचे रेखाटलेले हे चित्र आहे. ह्यात बंड कोणाचे हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

राजाने आज्ञा देण्याअगोदर राणीने राज्याबाहेर जाणे हे तिला उंचीवर नेते. पण तसे करण्यामागे तिला काय कारण आहे? “मला खरे तर दुसरे कर्तव्यच माहीत नव्हते... महाराजांना सुख कसे होईल? ... माझा देव तेच. माझा नेमधर्म, माझे कर्तव्य, विरंगुळा.... सारे तेच. नावाप्रमाणे कृती करणाऱ्या साधुवृत्तीच्या महाराजांनी मलाही तशीच वागवली. पण माझ्या पूर्वजन्मीच्या पापाने कोणते स्वामी महाराज भेटले आणि त्यांनी माझ्या सुखात अशी माती कालवली.” (अंक २, प्र. ४). अशा या गरीब, दीन महिलांनी गावाबाहेर वसाहत वसवली, पण ती काही पुरुषांना धडा शिकवावा म्हणून नाही. सरस्वतीदेवी नावाची कोणी एक विचारकर्ती बाई त्या गावात आलेली असते. ती महिलांच्या सभा घेत असते आणि संसार नेटका करून परमार्थ साधा असे प्रतिपादन करत असते. महाराणीला ती स्त्रियांसाठी दवाखाना काढण्याचे सुचवते. ती राणीला सांगते, “हल्ली तिकडच्या (म्हणजे युरोपातील) स्त्रियांची मजल मताभिलाषेपर्यंत गेली आहे. (न्यूझीलंडमध्ये १८९३मध्ये व फिनलँडमध्ये १९०६ मध्ये स्त्रियांना प्रथम मतदानाचा अधिकार मिळाला. हे नाटक १९१२ सालचे आहे.). तितके आपल्याला नको आहे. कारण निरुपद्रवी आणि शांतता हे मुळी आपल्या आर्य स्त्रियांचे ब्रीद आहे... साप चावला नाही तरी सापाचा फुत्कार लागतो. आपणाला जरी पुरुषांवर वर्चस्व गाजवायचे नाही तरी त्यांनी आपल्याला उगीचच पायाखाली तुडवू नये एवढे आपण बघितले पाहिजे.... दोघांना सारखे ज्ञान पाहिजे ते देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे.” (अंक २, प्र. ४)

आता वरील तपशील बघितले, की आपल्याला लेखिकेचा हेतू आणि लेखन/त्याचे नाव याबद्दल काही प्रश्न पडतात.

‘बायकांचे बंड’मध्ये खाडिलकारांनी स्त्रियांना वाटणारा पुरुषद्वेष अन्यायातून आलेला असून, त्यांना धडा शिकवायचा अशा निर्धाराने स्थापलेले राज्य दाखवले आहे. म्हणजे ते रुढ अर्थाने बंड आहे. गिरीजाबाई पुरुषांचे बंड म्हणतात. पण ते त्यांनी स्त्रियांनी पुरुषांवर केलेल्या अन्यायाच्या विरोधात केले आहे असे दिसत नाही. स्त्रियांचा केलेला त्याग हा मूर्खपणातून केलेला आहे आणि त्याचे परिणाम राजाला भोगावे लागले असते – पुरुषांनी उठाव करून राजाज्ञा मोडली असती – तर कोठेतरी बंडाचा उदय झाला असता. पण तसे होत नाही. बरे पुरुषांचे नाही तर नाही पण बायकांचे बंड तरी आहे का? म्हणजे राणी राज्याबाहेर पडते ती नशिबाला दोष लावत. तिला सक्रिय करणारी सरस्वतीदेवीनामक विदुषी तीही पुरुषांवर वर्चस्व गाजवायची इच्छा नाही असेच म्हणते. ती मार्ग दाखवते तो उदात्त आचारांचा. त्यामुळे तिला अन्यायाची प्रखर जाणीव झाली होती का? असे वाटत राहते. नाटकाच्या अखेरीस विकारानंद हा सरस्वतीदेवीचा मनाविरुद्ध लग्न झाल्याने पळून गेलेला नवरा आहे हे उघडकीस येते. (अंक ३, प्र. २ आणि अंक ५, प्र. ७). वास्तविक हा तिच्यावर मोठा अन्याय झाला होता, पण ती बंड करत नाही. राणीवर अन्याय होतो, तीही बंड करत नाही. पुरुषांना स्त्रियांची किंमत कळून यावी यासाठी त्या जे उपाय करतात तेही सात्त्विक असे.

मग हे ‘बंड’ आले कोठून? आणि आले नाही तर जाणार कसे? वस्तुस्थिती अशी, की ‘पुरुषांचे बंड’ हे एका प्रत्युत्तराच्या भूमिकेतून लिहिले गेले. ‘बायकांचे बंड’मध्ये कर्तृत्ववान भासणाऱ्या प्रमिलेला अर्जुन पराक्रम आणि रूप यांच्या जोरावर जिंकतो असा समज झाल्यामुळे स्त्रिया पुरुषांपेक्षा सद्भाव आणि सद्वर्तन यांच्यामुळे अधिक चांगल्या असतात हे सिद्ध करण्यास हे नाटक लिहिले. पण त्यात मनाच्या परिवर्तनाचा पट ओझरताच दिसतो. सांगितला जातो तो उपदेश व तत्त्वविचार. बरे अन्यायाविरुद्ध दाद मागणारे पुरुषही नाहीत व स्त्रिया सार्याोच सद्वर्तनी.

मग बंड म्हणजे नक्की काय? शेवटच्या अंकात सरस्वतीदेवी व विकारानंद यांचे नाते दाखवून पुन्हा एकदा पुरुषांच्या मूर्खपणावर शिक्कामोर्तब करण्याचा अट्टहास.

मध्यप्रदेशातील मराठी माणसे हिंदीमिश्रित जी मराठी बोलत असतात त्यात ‘आजकाल अमुक गोष्टीचं बंड आलंय’ असा ‘फॅशन’ला प्रतिशब्द म्हणून ‘बंड’ हा शब्द येत असे. गिरीजाबार्इंचे बंड त्याप्रकारचे वाटते. संगीत न घालता नाटक लिहिता येते हेही दाखवणे हाही बंडाचा भाग असू शकतो.

यशस्वी आणि फसलेले अशी ही दोन बंडखोर नाटके एकदा जरूर वाचा - विचार आणि विकार यातील फरक समजण्यासाठी.

- मुकुंद वझे

लेखी अभिप्राय

Good

Rangdal R.B.19/07/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.