खारीचा वाटा केवढा?


मोठ्या कार्यातील छोटा वाटा म्हणजे खारीचा वाटा! तो वाक्प्रचार रूढ कसा झाला ते सांगणारी रामायणातील खारीची कथा सर्वांच्या परिचयाची असते. लहानशा खारीने रामाला सेतू-बंधाच्या कामात तिच्या परीने मदत केली. रामाला तिचे कौतुक वाटले. त्याने खारीच्या कार्याचा गौरव केला. मदत कितीही छोटी असली, तरी त्यामागील भावना महत्त्वाची असते, महान कार्य छोट्या, सर्वसामान्य माणसांच्या सहकार्याशिवाय तडीस जाऊ शकत नाही – ह्या दोन बाबी या गोष्टीतून अधोरेखित होतात. त्यावरून खारीचा वाटा हा वाक्प्रचार रूढ झाला. रामायणात अशी कथा होती की नाही याबद्दल शंका वाटते. ती प्रक्षिप्त असावी. म्हणजे नंतर कोणा कल्पक लेखकाने ती मूळ कथा-भागात समाविष्ट केली असावी.

वाटा म्हणजे हिस्सा. तो नक्की किती हे प्रमाणातच सांगायला हवे. जसे एक एकराचा वाटा, चार किलोचा वाटा. त्यामुळे ‘खार’ हे मापनाचे प्रमाण तर नसेल, अशी शंका मनात आली. गंमत म्हणजे ती खरी ठरली!

गीर्वाण लघुकोशात खार (खारि:, खारी स्त्री) या शब्दाचा अर्थ १ कैली माप असा दिला होता. २० द्रोण = १ खार असे समजले जाई.

कोष्टक असे, ४ मुष्टिका = १ निष्टिका, २ निष्टिका = १ अष्टिका, २ अष्टिका = १ कुडव, ४ कुडव = १ प्रस्थ, ४ प्रस्थ = १ आढकी, ४ आढकी = १ द्रोण, २० द्रोण = १ खार.

पूर्वी, माणूस व्यवहारात मापनासाठी हाताची बोटे, हात, पावले अशा अवयवांचा उपयोग करत असे. मुष्ठी किंवा मूठ हे धान्याच्या मोजमापाचे एकक होते. हिशोब केला, तर एक खारी म्हणजे वीस हजार चारशेऐंशी मुठी एवढे धान्य होय. जुन्या काळच्या मापनात ते सहाशेचाळीस शेर एवढे होते.

मी एक मूठ तांदुळाचे वजन इलेक्ट्रॉनिक काट्यावर केले. ते पन्नास ग्रॅम एवढे भरले. त्यावरून एक खार म्हणजे एक हजार चोवीस किलो धान्य भरते. तो वाटा छोटा नाही. म्हणजे खारीचा वाटा याचा जो रूढ अर्थ आहे, तो चुकीचा आहे. प्रत्यक्षात खारीचा वाटा फार मोठा असतो!

खार किंवा खारी हे माप आहे हे लक्षात न आल्याने कोणाच्या सुपीक डोक्यातून खारीची गोष्ट तयार झाली असावी.

ज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यायातील –

एका पाठोवाटीं पुटे |
भांगारा खारू देणें घटे |
तैं कीड झडकरी तुटे |
निर्व्याजु होय ||१५७ || 

ही ओवी वाचल्यानंतर वेगळा विचार मनात डोकावला.

भांगार ही सोन्यातील कीड नष्ट करण्यासाठी सोन्‍याला खारीची म्हणजे क्षाराची किंवा लवणाची पुटे देतात, असा दृष्टान्त ज्ञानेश्वरांनी त्या ओवीत दिला आहे. त्यातील खार किंवा क्षार यावरून र आणि ल वर्णांची आलटापालट होते (रोहित – लोहित, रोम – लोम). तशीच क्ष आणि ख वर्णाचीही होते असे लक्षात आले. उदाहरणार्थ, क्षीर – खीर, क्षुर – खुर किंवा खोरं (क्षौरकर्मातील वस्त-याला ग्रामीण भाषेत खोरं म्हणतात). क्षव – खवखव, रक्षा – राख. हिंदीतील क्षेत्र – खेत, क्षत्रिय – खत्री झाल्याचे दिसते. असेच काहीसे ‘खारीचा वाटा’बाबत झाले असावे. मुळात क्षाराचा वाटा असा वाक्प्रचार असण्याची शक्यता मला वाटली.

जेवणाच्या ताटामध्ये मिठाचे स्थान डावीकडे असते, म्हणजे पक्वान्नांच्या (= शिजवलेल्या ) तुलनेत गौण असते. जेवणात मीठ लागतेही थोडे, पण मिठाशिवाय स्वयंपाकाची कल्पना करू शकत नाही. मिठाचे महत्त्व सांगणारी पौराणिक कथा रूढ आहे. ती अशी, कृष्णाने रूक्मिणीला ‘तू मला मिठासारखी आवडतेस’ असे सांगितल्यावर रूक्मिणीला राग आला. तिचा राग दूर करण्यासाठी कृष्णाने एका मेजवानीत त्यांच्याकडील स्वयंपाक्यांना मीठ न घालता स्वयंपाक करण्यास सांगितले. मंडळी जेवण्यास बसली. पहिला घास तोंडात घालताच सर्वांची तोंडे वाकडी झाली. खरा प्रकार कळल्यावर रूक्मिणीला कृष्णाच्या बोलण्याचा अर्थ कळला. मिठाशिवाय स्वयंपाक पूर्ण होऊ शकत नाही. तसेच, पदार्थांतील मिठाचे अस्तित्व वरून दिसत नाही, पण ते सगळीकडे व्यापून असते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादे मोठे कार्य ज्या व्यक्तीशिवाय पूर्ण होत नाही आणि प्रत्यक्षात त्या कार्यातील सहभाग दिसून येत नसला, तरी तिचे अस्तित्व सतत जाणवत असते; तेव्हा त्या व्यक्तीच्या कार्याला क्षाराचा वाटा म्हणणे उचित ठरेल. त्या ठिकाणीही क्षाराचा / ‘खाराचा वाटा’चे ‘खारीच्या वाट्या’त रूपांतर झाले असावे, असे मला वाटते.

– डॉ. उमेश करंबेळकर

लेखी अभिप्राय

Atishay samarpak Ani Abhyaspurn.

sham badave04/11/2015

Abhyaspurna Mahiti vatate.

dr.sham badave.04/11/2015

खारीचा वाटा. नवीनच माहिती. हे माहीतच नव्हत हं. धन्यवाद.

माधुरी ब्रम्हे…04/11/2015

खारीचा वाटा. वाचल्यावर खरा अर्थ कळला. छान वाटले.

अरविन्द कुंभार05/11/2015

फारच मनोरंजक, ज्ञानवर्धक व सयुक्तिक व्युत्पत्ती. अभिनंदन.

राजेंद्र करंबेळकर 05/11/2015

धन्यवाद डॉ. नेहमीप्रमाणे पुन्हा काहीतरी वेगळे आणि माहितीपूर्ण ज्ञान आपण शेअर केलेत. उत्कृष्ट!

Sonali Herkal-Shinde06/11/2015

aplya kahi sankalpana kiti chukichya astat nahi?

digambar krish…06/11/2015
लेखकाचा दूरध्वनी

9325262692

आपण वर सांगीतलेले कोष्टक व १०२४ किलो वाचून आश्चर्य वाटले. ही अष्टमान पद्धत असून संगणकीय प्रणालीमधे हीच वापरतात. ह्यात ८बिटस चा एक बाइट होतो. त्यावरून ८बीट, १६बीट, ३२बीट की ६४बीट सिस्टीम हे ठरते. आणि दर १०२४ युनिट्स नंतर सहस्त्रमान पद्धत बदलते. १०२४ बाइटचा एक किलोबाइट, १०२४किबा चा एक मेगाबाइट, १०२४मेबा चा १गिगा बाइट इ. खूपच इंटरेस्टींग माहीती आहे. ह्याविषयक अधिक कुठे वाचायला मिळेल??

almighty18/11/2015

किरण क्षीरसागर हे 'व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन'चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी. ते 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'चे सहाय्यक संपादक आहेत. त्‍यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. ते त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता.

लेखकाचा दूरध्वनी

9029557767

विनय, फार छान प्रश्‍न विचारलास.

किरण क्षीरसागर19/11/2015

धन्यवाद विनयजी. ज. वि.ओकांच्या गीर्वाण लघुकोशात मला हे कोष्टक मिळाले. परंतु त्या व्यतिरिक्त ही मापन पद्दत कुठे, केव्हा, कशी वापरात होती यासंबंधी मला फारशी माहिती नाही. मूठ हे एकक वापरून चिपटी, मापटी अधेली शेर ही मापे वापरात आली असावीत.
पूर्वी वीस नगांचा वाटा केला जाई त्याला विसा असे म्हणत. एक विसा, दोन विसा अशा स्वरूपात विक्री होई. अठरा विसे म्हणजे तिनशे साठ. आपल्या कालगणनेत वर्षाचे दिवस तीनशे साठ त्यामुळे वर्षभर गरिबी किंवा दारिद्य असल्यास त्यावरून अठरा विसे दारिद्र्य हा वाक्-प्रचार रूढ झाला. 'विसे'चे संस्कृतिकरण होऊन 'अठरा विश्वे दारिद्र्य' हा वाक्-प्रचार प्रचलित झाला.

डॉ. उमेश करंबेळकर19/11/2015

विनयजी, आपल्या माहितीनुसार संगणकीय प्रणालीमध्ये 1024 बाईट = 1 किलो बाईट. हे 1 किलोबाईट तसे फार छोटे माप ठरते, मेगा बाईट गेगा बाइटच्या तुलनेत, त्यामुळे येथे मात्र 'खारीचा वाटा' चा जो प्रचलित अर्थ (फार छोटा वाटा) आहे तो लागू पडतो. आपल्या सूक्ष्म निरीक्षणाबद्दल अभिनंदन!

डॉ. उमेश करंबेळकर19/11/2015

हा अठरा विसे पण खूपच मस्त आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटना कुठलाही पुरावा नसताना, आधार नसताना medical, space, IT असे जगातील सर्वच शास्त्र व ज्ञान पुराणात आहे असे पोकळ व baseless बडबड करत असतात व सर्वत्र हसे करून घेतात. तुम्‍ही लिहिलेल्‍या लेखांसारखे interesting n logical लेख वाचायलाच मिळत नाहीत.

vinay samant21/11/2015

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, विनयजी.

डॉ. उमेश करंबेळकर21/11/2015

एक खार म्हणजे १०२४ किलो या हिशेबात आलेला '१०२४' हा संगणकीय प्रणालीत नित्य वापरला जाणारा आकडा येणं हा एक गमतीचा योगायोग आहे.
डॉ. करंबेळकर यांच्या मुठीत मावलेल्या धान्याचे वजन ५० gram झाल्यामुळे हा आकडा आला. हा अर्थातच निव्वळ योगायोग आहे. ते वजन ४९ gram किंवा ५१ gram झाले असते तर एक खार म्हणजे १००३ किलो किंवा १०४४ असं उत्तर आले असते.

सुबोध जावडेकर21/12/2015

माहितीपूर्ण लिखाण. सर्वच संदर्भ समर्पक आहेत. रामायणातील गोष्ट मूळची असो वा प्रक्षेप. ती रामायणायात इतर गोष्टींप्रमाणे चपखल बसते. त्या मानाने "खार" शब्दाची व्युत्पत्ती, आणि इतर संदर्भ जरासे कमी वाटतात. मात्र 'माहिती कोशात' समाविष्ट करावी या दर्जाची माहिती आहे. धन्यवाद. (आपणाकडून " tolstoy, एक माणूस" च्या तीन प्रती मागविल्या होत्या, त्या मिळाल्या. त्या आता दुर्मिळ आहेत. आपला छंद / आवड पाहून प्रेरणा मिळते.

jeevanlal पटेल25/06/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.