साडे पाच वर्षे निकराची झुंज देणारा रामशेज किल्ला

प्रतिनिधी 02/10/2015

रामशेज किल्ला नाशिकजवळ दिंडोरीपासून दहा मैलाच्या अंतरावर आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी त्‍यांच्‍या कारकिर्दीत हा किल्‍ला सतत साडेपाच वर्षे (पासष्‍ट महिने) मोगलांशी झुंजत ठेवला. रामशेजच्या लढाईचे वर्णन सर्वप्रथम मुघलांच्या कागदपत्रांत वाचायला मिळाले व खरा इतिहास उजेडात आला.

प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे आणि तेथे त्यांची शेज आहे अशी लोकभावना. म्हणून किल्ल्याला रामशेज हे नाव पडले.

मराठा साम्राज्यातील बहुतांश किल्ले सह्याद्रीच्या द-याखो-यात व घनदाट झाडींमध्ये होते. रामशेज किल्ला मात्र यास अपवाद ठरतो. हा किल्ला सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. संपूर्ण नाशिकमधून या किल्‍ल्‍याचे दर्शन होते. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड. तो तेथून आठ कोस अंतरावर आहे.

शिवाजी महाराजांच्‍या निधनानंतर मराठ्यांचा सहज पाडाव करता येईल या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन खान फिरोजजंग या सरदाराला महाराष्‍ट्राच्‍या स्‍वारीवर पाठवले. त्‍याने रामशेज किल्ल्यावर चाँदसितारा फडकावावा आणि त्यानंतर त्र्यंबक, अहिवंत, मार्कडा, साल्हेर असे किल्ले जिंकून घ्यावेत असा औरंगजेबचा मनसुबा होता. औरंगजेबाच्या या कारवाईची कुणकुण लागताच संभाजीराजांनी रामशेजच्‍या संरक्षणासाठी साल्हेर किल्‍ल्‍याचा किल्लेदार रामशेजवर रवाना केला. ऐतिहासिक कागदपत्रांत रामशेजच्या किल्लेदाराचे स्पष्ट नाव सापडत नाही, परंतु बहुतांश इतिहासकारांच्या मते, सूर्याजी जेधे हे रामशेजचे किल्लेदार होते. औरंगजेबाच्‍या आज्ञेनुसार शहाबुद्दीन रामशेज किल्ल्यावर चालून आला. त्याच्यासोबत दहा हजारांची फौज होती आणि अफाट दारूगोळा आणि तोफा होत्या. त्‍यावेळी रामशेज किल्ल्यावर फक्त सहाशे मावळे होते. ते मुळचे मावळातील, धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी. सूर्याची जेधे रामशेजच्या तटावरून फिरत असायचे, दिवसा आणि रात्री. ते झोपायचे कधी हेच कोणाला माहीत नव्हते. शहाबुद्दीनन खानाने चार-पाच तासांत किल्‍ला ताबयात घेऊ या विचाराने किल्‍ल्‍यावर नाना त-हेने हल्‍ला केला. किल्‍ल्‍याभोवतीचा वेढा कडक केला, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या. मात्र किल्‍ला त्‍याच्‍या ताब्‍यात येईना. रामशेज किल्ल्यावर तोफा नव्हत्या. पण संभाजीराजांनी प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारूगोळा उपलब्ध करून ठेवला होता. मग किल्लेदाराने आणि मावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या. मराठ्यांनी किल्ल्यावरून खाली तोफांचा मारा सुरू केला. त्यामुळे शहाबुद्दीन खान गांगरून गेला. पाच महिने झाले, त्याला किल्ला काही जिंकता येईना. मोगलांचे तोफगाळे किल्ल्यावर पोचत नव्हते. तेव्हा मोगलांनी जंगलातील झाडे तोडून किल्ल्याच्या उंचीचा बुरूज बनवला आणि त्यावर तोफा नेऊन किल्ल्यावर डागण्याचा बेत आखला. त्यावरून ते किल्ल्यावर मारा करू लागले. मात्र त्‍याचा परिणाम झाला नाही. घनघोर युद्ध चालू होते. दोन वर्षे झाली, मात्र रामशेज किल्ला अजिंक्य राहिला.

त्‍यानंतर औरंगजेबाने शहाबुद्दीनला माघारी बोलावून ती मोहीम फत्तेहखानकडे सोपवली. फत्तेखानने रामशेजवर आक्रमण चढवले. तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल किल्ल्यावर आले, की किल्ल्यावरून मराठ्यांच्या गोफणीतून दगड सुटायचे. दगड इतके जोरात सुटायचे, की काही मोगल जाग्यावरच ठार व्हायचे. फत्तेहखानला मावळे तसूभरही पुढे सरकू देईनात. इतका खटाटोप करूनही किल्ला हाती येईना. फत्तेहखानाचा एखादा तोफगोळा किल्ल्यावर पोचायचा आणि त्यामुळे किल्ल्याची तटबंदी किंवा बुरूज ढासळायचा. ते पाहून तो खुश व्हायचा. पण सकाळ झाली की तो बुरूज परत बांधून झालेला असायचा! ते पाहून फत्तेहखान आश्चर्यचकित व्हायचा. अनेक महिने सरले, हजारो मोगल मारले गेले, दारूगोळा वाया गेला.

फत्तेहखानने किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावर तोफांचा मारा चालू केला. मुख्य दरवाज्याशी मावळे गुंतवून ठेवले. मग फत्तेहखानने निवडक सैनिक घेऊन किल्ल्याच्या मागून चढाई सुरू केली. वाट अवघड होती तरीही त्यांचे सैनिक वर चढत होते. मावळेही तशा परिस्थितीत गाफिल राहणारे नव्हते. सूर्याजींनी साथीला दोनशे मावळे घेतले आणि चहुबाजूंनी पहारा चालू केला. त्यांना फत्तेहखानाचा अंधारात चाललेला डाव समजला, मावळे बुरूजावर दबा धरून बसले. जसे मोगल सैनिक वर पोचले तसे मराठ्यांनी गोफणी फिरवल्या. किल्ल्यावरच्या मोठमोठ्या शिळा ढकलून दिल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोगल जीव मुठीत धरून उड्या मारू लागले. शत्रू पळून जाताना बघून मावळे आनंदित होऊन जोर जोरात आरोळ्या देऊ लागले, हर हर महादेव, जय शिवाजी जय भवानी.

औरंगजेबाने फत्तेहखानला परत बोलावले आणि कासमखानला स्वारीवर पाठवले. कासमखानने कडेकोट पहारा ठेवला. किल्ल्यावर दारूगोळा आणि अन्नधान्य पोचण्यासाठी वाट ठेवली नाही. किल्ल्यापासून काही कोसावर रूपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेऊन तयार होते, पण त्यांना रसद पोचवता येत नव्हती. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले, अन्नावाचून हाल होऊ लागले. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला आला, जोराचा पाऊस पडला, तो सलग दोन दिवस पडत होता. किल्ल्याच्या बाजूला मेलेल्या जनावरांची दुर्गंधी सुटली. मोगल सैनिकांना पहारा देणे अशक्य झाले. मग कासमखानने पहारा सैल केला. तो दिवस सरला, रात्र झाली. रात्रही सरली, नंतर पहारे पुर्ववत करण्यात आले. कासमखानच्या लक्षात आले, की मावळे ताजेतवाने दिसत आहेत. कासमखानला त्याची चूक लक्षात आली. त्या दोन दिवसांच्या सैल पहा-यात मावळे गडावर पोचले होते! रूपजी आणि मानाजी यांनी अन्नधान्य, दारूगोळा गडावर पोचवला होता. कासमखानला कळून चुकले, की रामशेज काबीज करणे हे स्वप्नच राहणार आहे. कासमखानही किल्ला जिंकू शकला नाही. किल्ला सहा वर्षें झुंजत होता!

रामशेज किल्‍ला नाशिक-पेठ रस्त्यालगत उभा आहे. पेठ रस्‍त्‍यापासून अर्ध्‍या तासाच्‍या अंतरावर आशेवाडी नावाचे गाव आहे. ते किल्‍ल्‍याच्‍या पायथ्‍याशी असलेले गाव. नाशिकच्या सीबीएस बस स्थानकावरून ‘पेठ’ कडे जाणारी एस.टी. आशेवाडी गावाच्‍या फाट्यावर थांबते. तिथे उतरून आशेवाडी गावात पोचले, की रामशेज किल्‍ल्यावर चढाई करता येते. रामशेजचा किल्‍ला समुद्रसपाटीपासून 3270 मीटर उंचीवर आहे. परंतु प्रत्यक्ष पायथ्यापासून त्याची उंची जास्‍त नाही. गावातून गडावर पोचण्‍यासाठी पंचेचाळीस ते साठ मिनीटे पुरतात. गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. किल्ल्यावर जाणारी वाट किल्ला डावीकडे ठेवत जाते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पाय-या लागतात. गडावर शिरताना गुहा दिसते. त्‍या गुहेत रामाचे मंदिर आहे. गुहेच्या एका बाजूला शिलालेख कोरलेला आहे. गुहेच्या खालच्या बाजूला पाण्याचे एक टाके आहे. त्‍यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गुहे समोरच्या तुटलेल्या पाय-या थेट गडावर जातात. त्‍यावरून पुढे गेल्यानंतर आपण गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात पोचतो. हा भाग बराचसा अरुंद आहे. गडमाथ्यावर बुजलेल्या अवस्थेतील गुप्त दरवाजा आहे. या वाटेने खाली गेल्यास समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते.

गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुस-या टोकाकडे जाते व डावीकडची वाट थेट गडाच्या माचीकडे अर्थात, मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यास काही पाय-या दिसतात. एका कड्यावर या पाय-यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो. दरवाजा पाहून मुख्‍य वाटेला आल्‍यानंतर किल्‍ल्‍याच्‍या मुख्‍य बुरूजावर उभारलेला ध्‍जस्‍तंभ दिसतो. तेथे संभाजी महाराजांच्‍या जन्‍मदिनी मोठा उत्‍सव साजरा केला जातो. त्‍या ठिकाणाहून सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर असलेला चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे पर्वत न्याहाळता येतात.

लेखी अभिप्राय

अभिमानास्पद इतिहासाचं प्रेरणादायक वर्णन ! एका ठिकाणी तपशीलात मोठी चूक झालीय. किल्ल्याची उंची ३२७० मीटर असू शकत नाही. ३२७० मीटर म्हणजे साडेदहा हजार फुटापेक्षा जास्त होईल. भारतात एवढी उंची हिमालयाव्यतिरिक्त अन्यत्र कुठेच नाहीये. रामशेजची उंची ३२७० फूट असेल हे मान्य!

स्वामी निश्चलानन्द03/10/2015

माहिती अतिशय छान दिली आहे. फक्त एक चूक झाली आहे रामशेज समुद्र सपाटीपासून अवघ्या १४२० मीटर वर आहे.

मुक्ता पाठक03/10/2015

अत्यंत उत्कृष्ट माहिती आहे.

अनिल परशराम लोहार 18/02/2017

माहिती चांगली आहे

राहुल तालवर18/03/2018

असा इतिहास माहीत असणे खूप गरजेचे आहे आणि माहिती अतिशय उत्कृष्टपणे सादर केली आहे. धन्यवाद.

Sarvesh06/08/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.