बनारसी मराठी बोली

प्रतिनिधी 16/09/2015

बनारस शहरात साधारण तीन हजारांच्या आसपास मराठी भाषिक समाज आहे. मराठी समाज स्थलांतरित होऊन सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून त्या ठिकाणी आलेला आहे. काशी हिंदू विश्ववविद्यालयातील धर्ममीमांसा विभागाचे प्राध्यापक डॉ. माधव रटाटे मराठी भाषकांचे काशीतील अस्तित्व तेराव्या शतकापर्यंत मागे नेतात. त्यांच्या मते, संत ज्ञानेश्वरांबरोबर काशीयात्रेस आलेल्या मराठी समाजापैकी काही लोक काशीतच स्थायिक झाले. मराठी समाज शिवकाल, तसेच पेशवेकाळात काशीत आला असावा. स्थलांतरितांमध्ये पुरोहित समाजाचे बाहुल्य आहे. ते लोक ज्ञानार्जनाबरोबर धार्मिक हेतूने आले असावेत. मराठी वस्ती काशीतील ब्रह्माघाट, गायघाट, दशाश्वमेध घाट, दुर्गाघाट, पंचगंगा घाट, पक्का महाल घाट, पटनी टोला या भागांत जास्त आहे.

बनारस शहरातील मराठी भाषिक समाजाचा समाज-भाषावैज्ञानिक अभ्यास करण्याच्या उद्देशाने एक प्रश्नावली तयार करण्यात आली. वेगवेगळ्या लिंग, वय, आर्थिक स्तर, शैक्षणिक स्तर यांचे प्रतिनिधित्व करणा-या सुमारे एक हजार प्रतिनिधींची निवड केली गेली. जी माहिती समोर आली ती अशी -  पंच्‍याण्‍णव टक्के लोकांना त्यांचे महाराष्ट्रातील मूळस्थान माहीत नाही. ज्यांना माहीत आहे ते कोकण हे मूळ स्‍थान असल्‍याचे सांगतात. सर्वांचेच जन्मस्थान हिंदी क्षेत्रातील असूनही ते मराठीला त्यांची मातृभाषा मानतात. मातृभाषेसंदर्भात समजणे, बोलणे, वाचणे या स्तरांवर स्वतःला कुशल मानतात. त्यांच्या लिखाणाचा स्तर मात्र सर्वसामान्य आहे. ते लोक कुटुंब तसेच, नातेवाईक यांच्याशी संवाद साधताना मराठीचाच प्रयोग करतात. समारंभ, उत्सव यानिमित्ताने एकत्रित आलेला मराठी समाज प्राधान्याने मराठीचा वापर करतो. मराठी ही एक समृद्ध व प्रतिष्ठित भाषा आहे याचे भान सर्वांना आहे.

काशीतील बहुसंख्यांची मातृभाषा हिंदी असल्याकारणाने सर्व व्यवहार हिंदीतून होतात.

बनारसमधील मराठी भाषक पिढ्यान् पिढ्या तेथे वास्तव्य करत आलेला असूनही त्यांनी स्थानिक बहुसंख्याकांच्या भाषेच्या प्रभावाखाली मराठीचा त्याग केलेला नाही. ज्याप्रमाणे गुजरातमधील मराठी भाषक, इंदूरमधील मराठी समाज; त्यांच्याप्रमाणे काशीतील मराठी समाजाने मराठीला जिवंत ठेवलेले आहे. तेथील मराठी भाषकांचे संपर्क जाळे व्यापक आहे.

बनारसमधील मराठी लोक हिंदी भाषकांच्या संपर्कात असल्याकारणाने त्यांच्यावर हिंदीचा प्रभाव असणे साहजिक आहे. हिंदी वर्णमालेत ‘ळ’’ वर्ण नाही. ‘‘ळ’’साठी ‘‘ल’ हा पर्याय तेथे सर्रासपणे वापरला जातो. नवीन पिढीमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. ‘ज्ञ’’ आणि ‘क्ष’’चे उच्चारण हिंदीत मराठीपेक्षा भिन्न आहे. हिंदीच्या प्रभावाने त्या वर्णांचा उच्चार अनुक‘मे ‘ग्य’’ आणि ‘‘छ’’ असा होतो. ‘च’’ आणि ‘ज’’चे उच्चारण मराठीत दोन प्रकारे होते. शब्दांनुसार ते उच्चारण बदलते - याचे भान तेथील भाषकांना नसते. त्यामुळे नको त्या ठिकाणी नको ते उच्चारण होते. उदा. ‘चांगला’ऐवजी ‘च्यांगला’. हिंदी आणि मराठी व्याकरणात बरेच साम्य आहे. वाक्यरचना समान आहे. त्यामुळे त्यात फारसे दोष आढळून येत नाहीत. असे असले तरी कधी कधी मराठी क्रि‘यापद हिंदीचे रूप घेऊन येते. त्याचप्रमाणे मराठी संभाषणात हिंदी शब्दांचा प्रयोग सर्रासपणे केला जातो. तरुण पिढीत त्याचे प्रमाण जास्त आहे.

- प्रमोद पडवळ

(मूळ लेख - भाषा आणि जीवन, दिवाळी २०१४ वरून – संस्कारित, सुधारित)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.