देवता सांप्रदायाचे प्रतीक - कोकणातील गावऱ्हाटी


कोकण प्रांतावर इतिहासकाळात राज्य करणाऱ्या अनेक राजवटींनी त्यांच्या त्यांच्या संस्कृतीच्या खुणा ही कोकणच्या सांस्कृतिक वैभवातील व निसर्गरम्यतेतील मोठीच भर ठरते. ते कोकणाचे कोकणपण! तेथे सर्वकाही असल्याने ती नवलाईची व सुजलाम, सुफलाम देवभूमी मानली जाते. तेथील धार्मिक रूढी, परंपरा, सहिष्णुता व माणुसकी यांमुळे त्या देवत्वाला माणुसकीचा मनोरम पदर जोडला गेलेला आहे. कोकणात ते गुण विशेष तयार झाले त्यास कारण ठरले, तिला न्याय, नीती व धर्माचे अनुष्ठान लाभलेली ‘गावऱ्हाटी’ (गाव रहाटी). तेथील ग्रामीण जीवनाचा गावपाडा ‘गावऱ्हाटी’ला अधीन राहून चालत आला आहे. अंधारयुगात (साधारण इसवी सन १००० ते १८००) त्यास अंधश्रद्धेची झालर प्राप्त झाली, पण ती नव्या यंत्रयुगात मोठ्या प्रामाणात नष्ट होत आहे. त्याचे कारण म्हणजे खेड्यापाड्यातील शिक्षणप्रसार. ‘गावऱ्हाटी’चे सध्याचे स्वरूप आणि तिचे मूळचे स्वरूप यांत बराच फरक आहे. तिचे मूळ स्वरूप हे सात्त्विक व सोज्वळ होते.

दक्षिण कोकणातील गावांच्या रूढी-परंपरांमध्ये ‘गावऱ्हाटी’ला सर्वोच्च स्थान आहे. ‘गावऱ्हाटी’ म्हणजे गावाचे दैनंदिन जीवनमान सुलभ व सुरळीत चालण्यासाठी असलेली मार्गदर्शक तत्त्वे. सर्वांच्या भल्याचा त्यात प्रामुख्याने विचार आढळेल. भारतीय जीवन हे धर्म व देव यांतून घडत गेल्याने विविध देवता, संप्रदाय, उपासनापद्धती, श्रद्धा यांतून सांस्कृतिक जीवनाची जडणघडण झाली. त्या परंपरा दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असतात. त्या मानवी जीवनाला जगण्याचा भावनिक आधार मिळवून देतात. शिवाय, कोकण हा मूळ द्रविड संस्कृतीचा प्रभाग असलेला प्रदेश असल्याने देवदेवता, पूजाविधी, प्रतीके यांचा प्रभाव तेथे अधिक दिसून येतो.

कोणत्याही कार्याचा आरंभ करण्यापूर्वी देवाचा कौल घेण्याची प्रथा आहे. त्यामधील अंधतेचा, मूढतेचा भाग वगळला तर ती पद्धत माणसाला घाईगर्दी न करण्याची, मार्गदर्शन घेण्याची पद्धत सुचवते. त्याबरोबर बारा-पाचाची देवस्की हे ‘गावऱ्हाटी’चे खास वैशिष्ट्य आहे. बारा इंद्रिये व (पाच) पंचमहाभूते म्हणजेच बारा-पाच ही संज्ञा. कौलप्रसाद म्हणजे देवाचे न्यायालय. अलिकडे मात्र काळाच्या ओघात त्यात बरेच बदल झाले आहेत. ‘गावऱ्हाटी’ ही अतिशय व्यापक, सर्व हितकर आणि सूक्ष्मशक्तींना कार्यरत करणारी प्राचीन आणि संपन्न अशी संकल्पना आहे. गावाच्या चतु:सीमेत राहणारे गावकरी, प्राणिमात्र यांचे परस्परांशी संबंधित व्यवहार म्हणजे ‘गावऱ्हाटी’ होय. त्यामध्ये मानवी समाजाचे ऐक्य व सामंजस्य अभिप्रेत आहे. ती चिपळूणपासून पेडणे महालापर्यंतच्या परिसरात आढळते. तिला विज्ञानाच्या कसोटीत बसवण्याचा प्रयत्न व्हायला हवा.

कोकणातील समाज हा आर्य व द्रविड संस्कृतीचा मिलाफ आहे. तो  नीती, न्याय आणि धर्म या तीन तत्त्वांवर आधारलेला आहे. त्या त्रिसूत्रीचे उल्लंघन झाल्याने बारा-पाच संप्रदायात प्रक्षेपित होणारी शक्ती प्रभावी व सतेज राहिलेली नाही अशी लोकभावना आहे. कोकणातील पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचे ‘गावऱ्हाटी’च्या अधीन राहूनच पालन केले जाते.

पाषाण वा मूर्ती यांची दुरवस्था, गावकरी व मानकरी यांचे हेवेदावे, देवस्थान इनाम जमिनींचे न्यायालयीन प्रलंबित दावे आदी विविध कारणांमुळे ‘गावऱ्हाटी’ची पिछेहाट होत गेली आहे. गावाच्या उन्नतीसाठी, सलोख्यासाठी व सुखसमाधानासाठी गावकऱ्यांनी, मानकऱ्यांनी, विश्वस्त व पुजाऱ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.

- पांडुरंग भाबल

लेखी अभिप्राय

pls send my book

vitthal gawade09/10/2017

Please send me this book

Nilesh more09/06/2018

please send me book related to gavarhati

Rupesh rajendr…10/07/2018

Please send this book pdf

Rakesh Pawar28/12/2018

Plz send this book

Guridas04/03/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.