उत्तर कोकणची सागरी बोली भाषा

प्रतिनिधी 02/09/2015

‘जीवनगुंजी’ हे अरविंद राऊत यांचे एकशेचार पृष्ठांचे छोटेखानी पुस्तक म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पालघर जिल्ह्यातील वरोर या खेड्यात माणसे कसे जगत होती त्याचे वर्णन आहे. ते मराठी वाङ्मयात उपेक्षित आहे हे लक्षात सहजपणे आले आहे.

जीवन हे अरविंद राऊत यांचे आजोबा (आईचे वडील) तर गुंजी ही आजी. त्या आजी-आजोबांचे जगणे याचे वर्णन या पुस्तकात आले आहे. (लेखन काल 1966-1969)

उत्तर कोकणातील सहा-सात ज्ञातींच्या-समाजांच्या संस्कृतीचे प्रतिबिंब ‘जीवनगुंजी’त अंतर्भूत झालेल्या लग्नगीतांतून दिसून येते. ‘जीवनगुंजी’’त समाविष्ट केलेल्या उत्तर कोकणातील वेगवेगळ्या ज्ञातींच्या बोलीभाषा पुढीलप्रमाणे आहेत.

प्रमाण भाषाः

“काय रे विठू, आज इकडे कुठे वळलास?”

“तुमच्याच बाजूला आलो होतो. गणुदादा कोठे गेला? अरे, त्याच्या म्हशीने माझा वाल साफ खाऊन टाकला. आपण जरा बाजूला गेलो की शेतात शिरलीच. किती वेळा शेपाटली, पण तो काही तिला बांधत नाही. परवा, त्याच्या मुलीला सांगितले. इतकी मोठी मुलगी! तिला समजू नये का? त्याच्या घरी जनावरांना खायला पुष्कळ पेंढा असेल, पण दुस-यालचे नुकसान कसे होईल, ही बुद्धी! मग मी काय करावे? जीवनकाका, त्याला सांगा. दुरून शेताकडे तुझी म्हैस दिसली तर कोंडवाड्यात नेलीच असे समज. तरच मी नावाचा विठू. साल्यांचा किती त्रास काढायचा? येतो मी. बसा.”

वाडवळी बोली भाषाः

“कारं विठू, आज कटेकटे वळला?”

“तुमशास बाजूला आलतो. गणुदादा काय गेला? अरं, त्याहा भयीनं माया वाल साफ खाऊन टाकला. आपू जरा बाजूला जालो का हेतात खिरलीस. कवड्या वखत हेपाटली, पण तो काय बांदे नय. परवा त्याहा पोरीला हांगटल. असणी बोठी पोरी! तिला हमजे नय का? त्याहा घरा जनावरांना खाव्याहा हुकाळाहा पेंडा अहेल पण बिजाह नुकसान कह होयेल हं दानत! मंग मीन का करवं? जीवनकाका, त्याला हांगा. दुहरून हेतातटे तुय भय दिखली का कोनवाड्यात नेली अहं हमज. तरस मी नावाहा विठू. बेंडल्याहा कवडाक तरास काडव्याहा? साललो मी. बहा.”


चौधरी भंडारी भाषाः

“काय रं विठू, आज अटे कय वळला?”

“तुमशास बाजूला आलतो. अरं, गणुदादा कय गेला? त्याहा भयीनं माया वाल साफ खाऊन टाकला. आपू जरा बाजूला जाव का हेतात खिरलीस. कवढे वखत हेपाटली, पण तो काय बांदी नी! परवा त्याहा पोरीला हंगटलं. अहणी बोठी पोरी! तिला हमजे नि काय? त्याहा घरा जनावरांना खाव्याला हुकाळाहा पेंडा हाय, पण बिज्या नुकसान कह होईल इ दानत! मंग मीन का करव्या काय? जीवनकाका, त्याला हांगा दुहरून हेतातडे तूय भय दिहली का कोनवाड्यांत नेली आहे हमज. नय त मी नावा विठू नय! बेंडल्याह कवडाक तरास काडव्यायाहा? जातं मी. बहा.”

देवकर भंडारी बोली भाषाः

“कारं विठू, आज अटकट निघाला?”

“तुमशे दडस आलतू. गणुदादा कय गेला? अरं, त्याहे बहीन माया बाल साफ खाव टाकिला. आपू जरा बाजूला गेलं का हेतात खिरलीस. कवढं वखत हेपाटली पण तो काय भयह बांधी नी. परवादीही त्याहे पोयरीला हांगटलं. आवडी मोटी पोयरी! तिला हमजतहल नीका? त्याहे घरा ढोरांना घालव्या हुकाळाहा पेंडा अहल पण दुह-या ह नुकसान कहे ओयल यी त्याही द्यानत! मंग मीन का करवं? जीवनकाका, त्याला हांग दुहरून हेतान तुय भहय कळली का कोनाड्यात नेली आहे हमज. त मी नावाहा विठूं. बेणलीहे भाड खाधाहा कवडाक तरास काडव्याहा? जातं मी. बहा.”

मांगेली भंडारी भाषाः

“काय रा विठू, आज अटाकटा वडलो?”

“तुमश्यास अटा आयलो ओतो. गणुदादो कया गेलो? अरे, त्या बहीन माहो वाल साफ खाऊन टाकिलो. आपुन थोडोसो बाजूला गेलो का हेतात खिरलीस. कवढ्या ओखत हेपाटली पण तो काय बांधी नय. परवानधी त्याहा पोयरीला हांगतीला. अवढी बोठी पोयरी! तिला कायूस समजला नय का? त्याहा घरा जनावरांना खायाला गनो पेंडा अहेन. पण बज्याहा नास खये ओवेन यी त्याही द्यानत! मींगे मीन काय करवे? जीवनकाका, त्याला हांग. दुहरून हेतावर तुही बह देखली का कोनवाड्यात नेलीस आहे, हमज. तरस मी नावाहो विठू. बेंडल्याह कवढो तरास काढव्याहो? जाता मी. बहा.”

चांभारी बोली भाषाः

“काय रं! विठू, आज अटकट वळला?”

“तुमश्यास दडं आलतू. गणुदादा कय गेलाय? अरं, त्या भयजून माहा वाल साप खाला. काय हांगू, जरा बाजूला गेलू का हेतान येऊन खिरलीस. कवडे ओखत हेपाटली पन तो काय भाय बांधी नय. परवान दिया त्या घरा जाऊन त्याहे पोरीला हांगटलां. अवडी बोठी पोरी! पन तिला काय हमजनीका? त्याहे घरा हुकालाहा पेंढा अहून तरी बिजाहा नास करवाही हीस अक्कल. मंगा मीन काय करवा? जीवनकाका, त्याला जराक हांग. दुहरून जर हेतात भय खिरली तर कोंदवाड्यान घालीनस तरस मी नावाहा विठू. बेनिखल्यांहा कवडाक तरास काडवा रं? बरा मी साललू. बहा.”

प्रमाणभाषेशिवाय इतर ज्ञातींच्या बोली भाषा जवळ जवळ सारख्या आहेत. पण काही शब्दांत फरक आढळेल. प्रत्येकी हेलही वेगळा आहे. प्रत्येक जातीच्या शिव्या वेगळ्या आहेत. शोककारक किंवा करुण प्रसंगाच्या वेळी, हळुवारपणे ही भाषा बोलली तर बरी वाटते. परंतु भांडणाच्या वेळी तिला खरी धार चढते व तिचे हेंगाडे स्वरूप उघडे होते. मुंबईतील मूळचे लोक (साष्टी - वसईशी संबंधित) पूर्वी हीच भाषा बोलत होते. काही वयस्क स्त्रियांच्या तोंडी अद्याप काही शब्द आढळतात. गुजराथी शब्दही अपभ्रंश रूपाने त्या भाषांत आले आहेत. बोर्डी-देहेरी येथील या मराठी बोली भाषेत ’अमथाच’ हा गुजराथी शब्द अगदी ठळकपणे पण अमथाच आला आहे. कोणत्याच मराठी ग्रंथात या भाषेचा उपयोग अद्याप झाला नसावा. ’उत्तर कोकणची सागरी बोली भाषा’ असे नाव या भाषेला देता येईल.

- श्रीकांत ल. राऊत

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.