स्मृती जपणारे सोलापूरचे उद्यान!


प्रसन्न वातावरण... चारही बाजूंनी हिरवळ... तीनशेवीसहून अधिक प्रजातींच्या वनस्पती... सत्तराहून अधिक प्रकारचे पक्षी... सचित्र माहिती देण्यासाठी निसर्ग परिचय केंद्र... पक्षी निरीक्षणासाठी लपणगृह आणि टॉवर... अभ्यासासाठी तारांगण आणि दिशादर्शक यंत्रही... हे सगळे एकाच ठिकाणी... असा परिसर सोलापुरात आहे. ते स्मृती उद्यान. कुटुंबीय आणि मित्र यांच्यासमवेत छानशी सहल करण्यासाठी जैवविविधतेने नटलेले स्मृती उद्यान! तेथे बाराशेहून अधिक वृक्षप्रेमींनी त्यांचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीय यांची स्मृती जपण्यासाठी झाडे लावली आहेत.

सोलापुरात अशा प्रकारचा वेगळा उपक्रम शासनाच्या मदतीने 1996 साली सुरू झाला. विजापूर रस्त्यावर असलेल्या संभाजी तलावाच्या शेजारी वन जमिनीवर स्मृती उद्यानाची स्थापना करण्यात आली. पर्यावरणप्रेमी बी. एस. कुलकर्णी, वासुदेव रायते, निनाद शहा, भरत छेडा यांच्या पाठपुराव्यातून स्मृती उद्यान फुलले. स्मृती उद्यानाच्या विकासासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. शासनानेच तशा प्रकारचा वेगळा उपक्रम हाती घेतल्याने सर्व स्तरांतून सहकार्य मिळत गेले. वन जमिनीवर हिरवळ दिसू लागली. एक ना अनेक प्रकारची झाडी तेथे लावण्यात आली. लोक कोणाची कोणाची स्मृती जपण्यासाठी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण करू लागले. अनेकांनी त्यांची ओळख म्हणून स्मृती जपण्यासाठी लावण्यात येणाऱ्या झाडाजवळ त्यांच्या नावाचे फलकही लावले आहेत. सोलापूरकरांमध्ये देणगी शुल्क भरून त्या ठिकाणी झाड लावून कोणाची स्मृती जपू शकतो ही भावना रुजवण्याचे काम पर्यावरणप्रेमी आणि माध्यमे यांनी केले. सामाजिक वनीकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी झाडांची देखभाल करतात. झाडे मोठी झाली असून, झाडांच्या रूपाने जपलेल्या स्मृती पाहण्यासाठी लोक आवर्जून येतात.

स्मृती उद्यानात पाहण्यासारखे आणि अभ्यास करण्यासारखे बरेच काही आहे. कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणी यांच्यासमवेत निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. लोक सकाळी आणि सायंकाळी ‘वॉक’साठीही तेथे येत असतात. पावसाळ्यात तर हा परिसर हिरवाईने नटलेला असतो. झाडा-झुडपांमधून म्याव-म्याव करत समोर येणारा मोर पाहून थक्क व्हायला होते. स्मृती उद्यानात इको लायब्ररीही आहे, तेथे 1586 मराठी आणि इंग्रजी पर्यावरणविषयक पुस्तके आहेत. नव्याने उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग परिचय केंद्रा’च्या भिंतीवर पर्यावरणविषयक कविता, माहिती लिहिण्यात आली आहे. छान छान चित्रेही रेखाटण्यात आली आहेत. सोलापूरचे वन्यजीव छायाचित्रकार डॉ. व्यंकटेश मेतन यांनी स्मृती उद्यान परिसरात टिपलेल्या विविध पक्ष्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. ‘नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल’चे भरत छेडा, ‘सामाजिक वनीकरणा’चे शिपाई संजय भोईटे यांनी टिपलेल्या वन्यजीवांची छायाचित्रे आणि माहितीही तेथे आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे माजी उपसंचालक अशोक पाटील यांच्या पुढाकारामुळे स्मृती उद्यानाचे चित्र पालटले. शासनाकडून अनुदान स्मृती उद्यानास मिळत नाही. देणगी स्वरूपात जमा झालेल्या रकमेतून व व्याजाच्या रकमेतून स्मृती उद्यानाची देखभाल केली जाते.

अनेक मान्यवरांनी स्मृती उद्यानास भेटी दिल्या असून त्यात माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम, माजी राज्यपाल के.शंकर नारायणन, जलबिरादरीचे राजेंद्रसिंग आदींचा समावेश आहे. स्मृती उद्यानात ‘रामसुख संतोकीराम चंडक चॅरिटेबल ट्रस्ट’ने देणगी देऊन खुले सभागृह बांधले आहे. छोटेखानी कार्यक्रम घेण्यासाठी ती जागा छान आहे. तसेच ट्रस्टने त्या परिसरात काव्यसृष्टीही उभारली आहे. अवकाश निरीक्षण गृह उभारण्यात आले आहे. उद्यानात सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका आहे. जर कोणी तेथे आले तर, अरे हे असे काही सोलापुरात आहे असे वाटत नाही. मस्तच! घरी जायला नको वाटते. अशी वाक्येा पाहुण्यांच्या तोंडातून बाहेर पडतात.

संपर्क कार्यालय दूरध्वनी : 0217-2343390 किंवा उत्साही कर्मचारी संजय भोईटे : 8275303791

- परशुराम कोकणे

लेखी अभिप्राय

Save nature! Save our life!

supriya devkule24/08/2015

धन्यवाद..
थिंक महाराष्ट्र..
एका उत्तम चळवळीत सहभागी होऊन सोलापूरच्या स्मृती उद्यानाविषयी लिहिण्याची संधी दिल्या बद्दल धन्यवाद..

- परशुराम कोकणे,
पत्रकार सकाळ, सोलापूर
8888856530

Pashuram Kokane24/08/2015

सर्व खूप छान. पण अवकाश दुर्बीणचे काय? धुळ खात पडून आहे. लाखो रुपयांची दुर्बीण. काहीच उपयोग नाही झाला. मिळाले फक्त आश्वासन.

मुकुंद सर17/02/2016

सदर लेख अतिशय सुरेख व वस्तुनिष्ठ आहे. हा लेख सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तिने वाचावा. ज्यामुळे आपण करत असलेल्या पर्यावरणीय कार्याचे महत्‍त्व समजाला समजेल व समाज पर्यावरणप्रिय बनेल. यातून जीवांचे संरक्षण होईल.

संजय भस्मे17/02/2016

खुप सुदंर. आणखी भरपुर माहिती घालावी संपुर्ण जगाच्या इतिहासात सोलापुरचे नाव आले पाहिजे

मधुकर कुलकर्णी25/11/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.