सांगोला तालुका ग्रंथालय


'सांगोला तालुका ग्रंथालय संघा'चे लहान रोपटे ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांनी 19 ऑक्टोबर 2003 रोजी लावले. तालुका ग्रंथालय संघाची चळवळ गेले पूर्ण तप सरस ठरली आहे. तालुक्यात एक्याऐंशी ग्रंथालये सक्षमपणे कार्यरत आहेत. 'अ' वर्गाची दोन, 'ब' वर्गाची तेवीस, 'क' वर्गाची एकेचाळीस व 'ड' वर्गाची पंधरा ग्रंथालये अशी त्यांची वर्गवारी होते. त्यामध्ये 'नगरवाचन मंदिर, सांगोला' हे शतकोत्तर ग्रंथालय आहे. कोळे, जवळा, बलवंडी, नाझरा व किडेबिसरी येथील ग्रंथालये यांनी रौप्यमहोत्सव साजरे केले आहेत. त्या ग्रंथालयांमध्ये प्राथमिक शिक्षक, डॉक्टर, पत्रकार व इतर क्षेत्रांतील नामवंत मंडळी एकमताने कार्यरत आहेत. आलेगाव येथील स्वामी विद्यानंद सार्वजनिक वाचनालयाची स्थापना 1993 मध्ये झाली. तेव्हापासून तालुक्यातील ग्रंथालय चळवळीने गती घेतली. तोपर्यंत पूर्ण तालुक्यात सहा ग्रंथालये होते. परंतु त्या ग्रंथालयाची प्रेरणा घेऊन तालुक्यातील इतर गावांतही ग्रंथालये सुरू झाली. ग्रंथालयांच्या माध्यमातून गावातील लोकांना मोफत वृत्तपत्रे, नियतकालिके व ग्रंथ वाचण्यास मिळू लागले.

ग्रंथालयाचा प्रचार व प्रसार करणे, ग्रंथालय चळवळ लोकाभिमुख व गतिमान करणे, नवीन ग्रंथालये उघडण्यास मार्गदर्शन व सहकार्य करणे मान्यताप्राप्त ग्रंथालयाच्या अडीअडचणी सोडवणे असे उद्देश ठरवून 'सांगोला तालुका ग्रंथालय संघा'ची स्थापना 2003 साली करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष ग्रंथमित्र गुलाबराव पाटील व संस्थापक सचिव सुनील बिडकर यांनी झटून कार्य केले. सांगोला तालुक्यात एकशेतीन गावे आहेत, पैकी एक्याऐंशी गावांमध्ये शासनमान्य ग्रंथालये आहेत. उरलेल्या बावीस गावांमध्ये ग्रंथालये चालू व्हावी यासाठी संघटनेचे प्रयत्न चालू आहेत. ग्रंथालय कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरे, ग्रंथालये प्रश्नासाठी धरणे आंदोलन, उपोषण, शासनाकडे विविध मागण्यांसाठी निवेदन देणे, ग्रंथालयांच्या प्रश्नावर आवाज उठवणे इत्यादी कार्य सांगोला तालुका ग्रंथालय संघाने नेटाने चालू ठेवले आहे. त्यात संघटनेला यशही मिळाले आहे. प्रत्येक वर्षी संघाचे कॅलेंडर निघते. त्यात ग्रंथालयांच्या सर्व ताज्या घडामोडी व विविध माहिती दिलेली असते. त्यामुळे ग्रंथालयांना नवसंजीवनी लाभते. ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट कार्य करणारी ग्रंथालये, ग्रंथालय कार्यकर्ता व ग्रंथालयीन कर्मचारी यांना पुरस्कार दिले जातात. संघाचे अध्यक्ष विठ्ठल वलेकर सर आहेत व प्रमुख कार्यवाह सोमनाथ ढोलेसर हे काम करत आहेत.

सांगोला तालुक्यामध्ये गाव तेथे ग्रंथालय ही शासनाची योजना मोठ्या प्रमाणात राबवल्याबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव पाटील यांना 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'ग्रंथमित्र पुरस्कार' देण्यात आला. ते सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या त्या पदाचाही तालुक्यातील ग्रंथालयांना फायदा होतो.

कर्मचाऱ्यांना दिले जाणारे मानधन तुटपुंजे असून त्यांना सेवाशर्तीची हमी नाही. यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. शासनानेही त्याची दखल घ्यावी व सेवकांचे प्रश्न सोडवून ग्रंथालय चळवळ जिवंत ठेवण्यासाठी मदत करावी. ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तालुका ग्रंथालय संघाच्या मार्फत ग्रंथालय कर्मचारी संघाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे सर्व कामकाज अध्यक्ष संजय सरगर व सचिव अमर कुलकर्णी हे उत्तम पद्धतीने करत आहेत.

- गुलाबराव पाटील

लेखी अभिप्राय

Khup sundar

Prakash Gudale19/10/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.