क्षात्रैक्य परिषद : पुरोगामी विचारांची सामाजिक चळवळ


महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात एक छोटीशी तरीही समाजैतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण अशी घटना ४ सप्टेंबर १९४९ या दिवशी घडली. सोमवंशी क्षत्रिय समाजातील काही उत्साही आणि चळवळ्या कार्यकर्त्यांनी भेदरहित भारतीय समाजाच्या निर्मितीसाठी कृती करण्याचा ध्यास घेऊन ‘क्षात्रैक्य परिषद’ नावाच्या चळवळीला आरंभ करून दिला. भारताच्या नवनिर्माणाचे स्वप्न त्यांच्या उराशी होते.

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील सुमारे एकशेसत्तर गावांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या त्रेचाळीस सोमवंशी क्षत्रिय व्यक्ती एकत्र आल्या होत्या. त्यांनी एकीकरणाची शपथ घेतली. गांधीजींच्या दांडी सत्याग्रहात सहभागी झालेले सत्याग्रही मुकुंदराव सावे व शामराव पाटील, पुढील आयुष्यात ‘चालना’कार म्हणून ओळख निर्माण करणारे श्री अरविंद हरी राऊत, दादर येथील बालमोहन शाळेजवळील रस्त्याला ज्यांचे नाव दिले आहे ते डॉ. मधुकर बळवंत राऊत, पद्मश्री हरी गोविंद उर्फ भाऊसाहेब वर्तक, चेंबुरचे डॉ. आनंदराव परळकर, डॉ. पु.ग. वर्तक (विलेपार्ले), डॉ. रत्नाकर भार्इंदरकर (दादर), डॉ. रंगनाथ म्हात्रे (झिराड) यांच्यासारखी मंडळी त्या त्रेचाळीस व्यक्तींमध्ये होती. त्यांनी ‘क्षात्रैक्य परिषद’ नावाची संस्था स्थापन केली. समाजातील समविचारी लोकांच्या सहकार्याची अपेक्षा बाळगत त्यांनी एका सामाजिक चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. पासष्ट वर्षे ध्येयाशी बांधिल राहून ती संस्था अव्याहतपणे काम करत आहे. मात्र प्रसिद्धीपासून दूर राहत गेली. त्या कामी सोमवंशी क्षत्रिय मंडळींचा पुढाकार होता. इसवी सन ११३८ मध्ये उत्तर भारतातील (गुजरात) चंपानेरच्या अहिनलवाड पाटण येथील सोळंकी कुळातील प्रताप बिंबराजाने उत्तर कोकण (तत्कालिन अपरान्त प्रदेश) प्रांतावर विजय मिळवला व ‘महिकावतीचे राज्य’ स्थापन केले. त्याच्यानंतर १२९६मध्ये देवगिरीचा सम्राट रामदेवराय यादव याचा पुत्र बिंबदेव यादव उत्तर कोकणात आला. बिंबदेव यादव हा सोमवंशी क्षत्रिय राजा होता. त्या राजांबरोबर सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी क्षत्रियांची सहासष्ट कुळे, अपरान्ताच्या परिसरात आली. त्याच क्षत्रियांनी अपरान्ताचा परिसर – म्हणजे उत्तर कोकणातील दीव-दमणपासून दक्षिणेकडे रायगड, रत्नागिरीपर्यंतचा परिसर विकसित केला, गावठाणे वसवली, वस्त्या निर्माण केल्या.

बिंबराजाबरोबर आलेल्या त्या क्षत्रियांचे वंशज त्या परिसरात वस्ती करून आहेत. बिंबराजाबरोबर आलेल्या क्षत्रियकुळांत सोमवंशी क्षत्रियकुळांची संख्या सर्वांत जास्त सत्तावीस होती. ‘सोमवंश’ हे वंशसूचक नाम आहे. बिंबाच्या राज्यात पराक्रम गाजवण्याबरोबर सोमवंशी क्षत्रियांपैकी काहींनी रयत बनून शेतीवाडीचा व्यवसाय अवलंबला. त्यांनी सुतारकीचा व्यवसायही आत्मसात केला. अलिबाग-उरणपासून पालघर, वसई, डहाणू तालुक्यांतील झाई, बोरीगाव बोर्डी गावांपर्यंत पसरलेले त्यांचे वंशज त्या परिसरात पानवेली-केळी-चिकूच्या बागा निर्माण करून शेतीवाडी उत्तम रीतीने साधतात.

सोमवंशी क्षत्रिय समाज महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी गावापासून उत्तरेकडे रायगड, ठाणे, मुंबई, पालघर व गुजरातमधील बलसाड जिल्ह्यात समाविष्ट झालेले देहरी गाव मिळून सुमारे एकशेसत्तर गावांमध्ये वसलेला आहे. त्यांच्यात चौकळशी व पाचकळशी असे मुख्य भेद आहेत. त्यांच्यात पुन्हा पाच पोटभेद निर्माण झाले. १. पाचकळशी सोमवंशी क्षत्रिय,  २. पाचकळशी पाठारे क्षत्रिय, ३. पाचकळशी पाठारे मळेकर, ४. चौकळशी सोमवंशी क्षत्रिय, ५. चौकळशी सोमवंशी पाठारे क्षत्रिय. ऐतिहासिक परंपरा, भौगोलिक सलगता, चालीरीती, पेहराव व व्यवसायांची समानता या घटकांमुळे त्यांच्यातील एकपणाचे दर्शन होत असे. तरी त्यांच्यात बेटी व्यवहार होत नसे. पोटजातींच्या स्वत:च्या ज्ञातिसंस्था अस्तित्वात होत्या.

देशात स्वातंत्र्याच्या चळवळीबरोबर सामाजिक उत्थापनाचे वारे वाहू लागले. त्या काळात समाजातील विचारवंतांना त्यांच्यातील पोटजातींचे एकीकरण व्हावे असे वाटू लागले. त्या कल्पनेचे बीज सर्वप्रथम अरविंद राऊत यांच्या मनात रोवले गेले. अरविंदभाई बोर्डी येथे शिक्षक होते. आचार्य भिसे यांच्याशी त्यांचे सख्य होते. त्यांची मनोधारणा सामाजिक बदलासाठी उत्सुक होती. त्यांनी ९ ऑगस्ट १९४३ या क्रांतिदिनी एक पत्रक काढून ते ठाणे व रायगड जिल्ह्यातील चौकळशी जातीच्या प्रमुख मंडळींना पाठवले. त्या पत्रकाद्वारे त्यांनी चौकळशी जातींच्या एकीकरणासाठी मंडळींची मते अजमावण्याचा प्रयत्न केला. मंडळींनी एकीकरणाच्या बाजूने अनुकूलता दर्शवली. एकमेकांना समजून घेण्यासाठी ते एकत्र आले. अरविंद राऊत बोर्डीला पाचकळशी सोमवंशी क्षत्रिय समाजातील स्वातंत्र्यसैनिक मुकुंदराव सावे यांच्या घरी राहत असत. मुकुंदराव पुरोगामी विचारांचे होते. मुकुंदरावांनी त्यांचे शेजारी मित्र व स्वातंत्र्य चळवळीतील सहकारी शामराव पाटील यांनाही त्यात सामील करून घेतले. दोघांनी पाचकळशी सोमवंशी क्षत्रिय समाजातील अध्वर्यू गोविंद धर्माजी ऊर्फ अण्णासाहेब वर्तक आणि परशुराम धर्माजी ऊर्फ तात्यासाहेब चुरी यांच्याशी चर्चा करून पाचकळशी व चौकळशी अशा पाचही पोटजातींच्या एकीकरणाची कल्पना पुढे आली.

सर्व पोटजातींतील प्रमुख मंडळींची सभा ४ सप्टेंबर १९४९ रोजी घेण्याचे ठरले. पाचही पोटजातींतील मिळून छपन्न प्रमुख व्यक्तींना त्या सभेचे निमंत्रण होते. सर्वसंमतीने तात्यासाहेब चुरी यांच्याकडे एकीकरणाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली. दादर येथील पिंटोव्हिला हायस्कूलमध्ये ती ऐतिहासिक सभा झाली. निमंत्रित छपन्न व्यक्तींपैकी त्रेचाळीस जण सभेला उपस्थित होते. सभेत चर्चेंअंती एकीकरणाचा ठराव पास झाला आणि एका व्यासपीठाची निर्मिती झाली. ती ‘क्षात्रैक्य परिषद’. तेव्हापासून सभा, संमेलने, वर्धापन दिन, युवक मेळावे, महिला संमेलने, परिषदा, परिसंवाद. अभ्यासदौरे, सहली व अंतर्गत विवाह या साधनांद्वारे कार्यसाफल्याकडे वाटचालीला सुरुवात झाली. पासष्ट वर्षे उलटून गेली; समाजबांधव तितक्याच उत्साहाने त्या कामात आजही सहभागी होत आहेत. एकीकरणाची क्रांतिकारक कल्पना दुराग्रही लोकांच्या सहज पचनी पडणे अशक्य होते. मुंबईत सर्व पोटजातींचे लोक एकत्र येऊ शकत असल्यामुळे एकीकरणाच्या प्रचाराचे केंद्र सुरुवातीला मुंबई हेच राहिले. संपर्कसाधनात जसजशा सुधारणा होत गेल्या, तसतसे ते लोण गावागावांपर्यंत पोचू लागले.

परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तात्यासाहेब चुरी, डॉ. मधुकर ब. राऊत, मुकुंदराव सावे, अरविंद हरि राऊत, पुरुषोत्तम ग. वर्तक, रमाबाई चेंबुरकर, रामचंद्र हिराजी सावे, प्रभाकर पाणसरे, शरद ज. बेडेकर, डॉ. आनंदराव परळकर, विमल राऊत, पुष्पकांत म्हात्रे अशा अनेक मान्यवरांनी पार पाडली. शिक्षणतज्ज्ञ नीलकंठ शं. नवरे, आत्माराम पाटील, डॉ. विठ्ठल प्रभू , संपादक पु.रा. बेहेरे, कवी रमेश तेंडुलकर, डॉ. जयंतराव पाटील, डॉ. रवींद्र रामदास ही मंडळी क्षात्रैक्य परिषदेची हितचिंतक होती. त्यांनी वेळोवेळी परिषदेला आधार दिला, तर्कसांख्यतीर्थ पं. रघुनाथशास्त्री कोकजे, पं. महादेवशास्त्री दिवेकर, भिडेशास्त्री, कृ. वि. सोमणशास्त्री, श्री. के. क्षीरसागर आदींच्या विचारांची संगत क्षात्रैक्य परिषदेच्या वाटचालीला प्रोत्साहक ठरली.

अरविंदभार्इंनी एकीकरणाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. अरविंदभार्इंनी ‘चालना’ मासिक जानेवारी १९५० मध्ये चालू केले. ते जणू ‘क्षात्रैक्य परिषदे’चे मुखपत्रच होते. ‘चालने’च्या पहिल्याच अंकात ‘चालने’चे उद्दिष्ट हे समाजाच्या उत्कर्षाच्या व काही अंशी उत्क्रांतीच्या मार्गाची चुणूक दाखवण्याचे कार्य करेल. प्रेरणा, संघटना व विकास हे तीन टप्पे तिला साधायचे आहेत अशा शब्दांत त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाजाला आधार मिळावा म्हणून ‘चालना’ जन्माला आली. स्वजातींच्या एकीकरणाच्या निमित्ताने कार्याला सुरुवात झालेली असली तरी ते कार्य तितक्याच मर्यादेत न ठेवता त्याला व्यापक स्वरूप द्यायचे आहे हे जणू पहिल्याच दिवसापासून निश्चित झालेले ध्येय होते. ‘समाजाच्या संकुचित कार्यक्षेत्राची मर्यादा हळुहळू ओलांडून त्याच स्वरूपाच्या विशाल कार्यक्षेत्रात पदार्पण करण्याचा किंबहुना विलीन होण्याचा मार्ग ‘चालना’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या समाजसंस्थांच्या हकिगतींमधून सापडेल’ असा विश्वास त्यांनी ‘चालने’च्या पहिल्याच अंकात व्यक्त केला होता. ‘क्षात्रैक्य परिषदे’चे सभासदत्व सोमवंशीयांबरोबरीने सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले. एकीकरणाच्या चळवळीत सर्वांना मुक्त प्रवेश होता. या सामाजिक चळवळीने भेदभावरहित मानव समाज हेच व्यापक उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवेले होते.

अरविंदभाई ध्येयवादी शिक्षक होते. प्राथमिक शिक्षकाला मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात त्यांनी त्यांच्या तीन मुलांच्या सोबतीने ‘चालने’चेही संगोपन केले. त्यांनी ‘चालने’चे कार्यालय दादर येथील काशिनाथ धुरू रोडवरील ‘ठाकूर बिल्डिंग’मधील दोन खोल्यांच्या त्यांच्या बिऱ्हाडात थाटले. ‘क्षात्रैक्य परिषदे’ची दोन कपाटेही त्याच घरात आली आणि ‘क्षात्रैक्य परिषदे’च्या कार्यालयाचा पत्ता ठाकूरवाडी, काशिनाथ धुरू रोड, दादर, मुंबई ४०० ०२८ हाच राहिला. ‘चालने’चे संपादक, मुद्रक व प्रकाशक  - सर्व काही अरविंदभाई! भार्इंनी साहित्य मागवणे, तपासणे, निवड करणे, व्याकरणशुद्ध करून घेणे, अंक छपाईला टाकणे अशी सर्व कामे नोकरी सांभाळून केली. त्या कामात त्यांची मुले व पत्नी सहभागी झाली. परिषदेच्या कामांची माहिती ‘चालने’तून सर्वदूर पोचत असे. भविष्यातील योजनांची वाच्यता ‘चालने’तून होई. अनेकांचे मतप्रवाह ‘चालने’तून व्यक्त होत. त्यांनी तो यज्ञ आयुष्याच्या अखेरीपर्यंत, म्हणजे ११ जून १९९५ ला देहान्त होईपर्यंत धगधगता ठेवला. भार्इंचे २०१५ हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव किरण राऊत पित्याचा वारसा पुढे चालवत आहेत. किरण राऊत यांच्या संपादनाखाली वाटचाल करणारी ‘चालना’ पासष्ट वर्षांची झाली आहे. ‘चालने’च्या कार्यालयाचा पत्ता तोच क्षात्रैक्य परिषदेच्या कार्यालयाचा पत्ता आहे. फक्त त्याचे स्थलांतर किरण राऊत यांच्या ३०९ -१, हरिशंकर निवास, राऊत लेन, जुहू, मुंबई ४०० ०४९ या घराकडे झाले आहे.

नी. शं. नवरे, र.वि. हेरवाडकर, शं. वा. जोशी, य.न. केळकर, पत्रकार पा.वा. गाडगीळ अशा अनेकांचे लेखन ‘चालने’तून प्रसिद्ध झाले. एकीकरणाच्या विचारांबरोबर ‘चालने’ने अंधश्रद्धा, बुवाबाजी, दुष्ट व कालबाह्य चालीरीती यांच्यावर घणाघाती हल्ले केले.

- प्रा. स्मिता पाटील

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.