गजीढोल - धनगरी नृत्‍यप्रकार


सांगोला तालुक्यात गजीढोल नृत्य लोकप्रिय आहे. धनगर लोक गजी नावाचे नृत्य बिरोबाच्या प्रसादासाठी करतात. ते त्यावेळी जोरजोराने ढोल वाजवतात. नृत्य करणाऱ्यास गजी म्हणतात. ढोल वाजवणाऱ्यास ढोल्या म्हणतात. त्यामुळे ते लोकनृत्य तालुक्यात गजीढोल या नावाने प्रसिद्ध आहे. तालुक्यात गजीढोलाची दीड-दोनशे वर्षांची परंपरा आहे.

बिरोबा, खंडोबा, भैरोबा,सिध्दनाथ, वेताळ या ग्रामदेवतांचा उपासनाविधी, कुळाचार म्हणून, नवसफेडी म्हणून गजीढोल घालण्याची प्रथा आहे. देवता गावावर प्रसन्न व्हावी -तिचा कोप होऊ नये, पाऊस चांगला पडावा, धनधान्याची समृद्धी व्हावी, गावावर संकटे येऊ नयेत हे नृत्याचे प्रयोजन असते. शेळकेवाडी, शिवणे, महूद, जुनोनी, घेरडी, मंगेवाडी, अजनाळे, कटफळ, बलवडी, कोळा, वाकी, नरळेवाडी, बंडगरवाडी असे एकूण पंधरापेक्षा अधिक गजीढोल ताफे तालुक्यात अस्तित्वात आहेत.

गजीढोल नृत्यामध्ये गजी वर्तुळाकार नाच करतात. सर्व नर्तक डावा पाय पुढे टाकून एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून किंवा कंबरेवर हात लपेटून वर्तुळात उभे राहतात. रंगीत रुमाल किंवा पटक्याचा शेमला उडवत डाव्या-उजव्या बाजूला वळत तालबध्द नृत्य करतात. नृत्यात पंचवीस ते तीस लोकांचा सहभाग असतो. त्यांचा पोषाख गुडघ्यापर्यंत विजार घातलेली असते. अंगात नेहरु शर्ट, डोक्यावर तुरा काढलेला फेटा, दोन्ही हातांत रुमाल, कमरेलाही रंगीत रुमाल खोचलेला असा असतो. तालुक्याच्या काही भागांत त्यास चुळण असे म्हणतात.

नर्तक लोक अनेक प्रकारे गजीनृत्य करतात. नृत्यात पदन्यासाशी संबंध अधिक असतो. नृत्य करताना गुणगुणणे चालू असते. त्याला ढोलाची साथ असते. ढोलवादक समुहाचा नायक असतो. ढोलवादक ज्याप्रमाणे ढोलावर टिपरी मारतो त्याप्रमाणे नृत्याचा प्रकार चाल बदलतो. ढोलवादकाचा हावभाव, त्याच्या पायांची हालचाल महत्त्वपूर्ण असते. तो आवाजामध्ये चढउतार करतो, त्याक्षणी नृत्याला गती आणि हळुवारपणा आपसूक येत असतो. सनई, सूर, तुतारी नृत्यास ताल निर्माण करतात. नृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात त्यामुळे उत्साह निर्माण होतो.

ढोल, सनई, सूर, शिंगतुतारी, कोटंबा, झांज, परडी इत्यादी साहित्य (अथवा वाद्ये) नृत्यासाठी वापरले जाते. नृत्याच्या एकूण पन्नास ते पंचावन्न प्रकारांपैकी उपलब्ध असलेल्या नऊ-दहा प्रकारांना घाय असे म्हणतात. धनगरी घाय, कापसी घाय, थोरली घाय, गळा मिठी घाय, रिंगन घाय, घोड घाय, टिपरी घाय, कोंडीबाची घाय, दुपारतीची घाय, इत्यादी. एक घाय बारा ते पंधरा मिनिटे चालते. नृत्य तीन तास चालत असते. शेवटी, गजीनृत्य करणाऱ्यांसाठी भोजन होते.

गजीढोल नृत्यात विविध जातींतील लोकांकडे वाद्याचा मान असतो. ढोलवादन रामोशी समाज, सूर होलार समाज, झांज धनगर समाज इत्यादी, मात्र सांगोला तालुक्यात गजीनृत्य करण्याची संधी विविध जातींतील लोकांना मिळते. फक्त ती व्यक्ती त्या नृत्यासाठी पारंगत असणे आवश्यक असते. हे तालुक्याचे वेगळेपण आहे.

गजीढोल हा नृत्यप्रकार फार जोशपूर्ण असा आहे. तो फक्त पुरुष मंडळी सादर करतात. ग्रामीण संस्कृतीतील यात्रा, जत्रा स्पर्धांमध्ये त्याचे सादरीकरण केले जाते. आधुनिक हिंदी, मराठी चित्रपटांतील विविध गाण्यांच्या चालींद्वारे लोकांचे मनोरंजन करणे चालू असते. चपळता, कल्पकता, बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक रचनाबद्ध असा तो नृत्यप्रकार असल्याने गजीढोल या नृत्याची रचना वैशिष्‍ट्यपूर्ण आहे.

'गजीढोल'मध्ये नृत्य आणि संगीत याचा वापर असला तरी त्यास लिखित अशी संहिता नसते. त्यामुळे श्रोत्यांना म्हणावे तसे मनोरंजन होत नाही ही त्या नृत्याची मर्यादा दिसून येते. नृत्याद्वारे विनोद अथवा बोध करणे  हे उद्दिष्ट नसते तर मनोरंजनास प्राधान्य असते. इतर विधिनाट्यांप्रमाणे परमेश्वराचे स्तवन अथवा वंदन नसते तर 'बिरोबाच्या नावाने चांगभले, यळकोट यळकोट जय मल्हार' असा मुक्त जयघोष केला जातो. गजीढोल लोकनृत्य लय, ताल, गती, गीत यांमुळे अर्थवाही बनले आहे.

तालुक्यातील अनेक गजीढोल संघांनी म्हसवड, सातारा, बारामती, चौंडी, आटपाडी अशा ठिकाणी वादन करुन अनेक बक्षिसे मिळवली आहेत. शिवणे येथील गजीढोल संघास 'मी अहिल्या होणार' या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. लोकसंस्कृतीतील माणदेशाचे हे वैभव आणि त्याचा वारसा जोपासणे ही काळाची गरज आहे.

- प्रा. लक्ष्मण भानुदास साठे

लेखी अभिप्राय

परंपरेनुसार चालणारे गजिढोल ही अतिशय चांगली परंपरा आहे. धनगर समाजाचे प्रतिक आहे.

Akshay vagare07/05/2015

अप्रतिम डोळ्याचे पारणे फेडणारी कला........Thanks think Maharashtra & team.

Er.Tanaji gorad14/07/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.