पेट्रा शेमाखा - फॉरिनची पाटलीण


गोऱ्या कांतीची, हिरवट डोळ्यांची, पिंगट केसांची पेट्रा... गावरान सौंदर्य लाभलेल्या लावण्यवतींच्या घोळक्यात वेगळी उठून दिसणारी ती फॉरिनची मेम. जर्मनीची पेट्रा शेमाखा. मराठी मातीतील ढोलकीफड ही अस्सल कला असते तरी कशी हे जाणून घेण्यासाठी जर्मनीची पेट्रा शेमाखा गेली काही वर्षे महाराष्ट्रात ठाण मांडून होती. लावणी कलावंतांसारखी नऊवारी नेसणे, मेक-अप करणे, पायात चाळ बांधणे असा कलावंतांच्या जगण्याचा अनुभव घेत असतानाच तमाशा फडाचा अभ्यास करणारी, तमाशावर बोलणारी पेट्रा...

ढोलकीफडाचा तमाशा आणि लावणी ही जगभर माहीत असलेली महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख. जर्मनीच्या पेट्रा शेमाखा हिने पीएच.डी.साठी महाराष्ट्रातील ढोलकीफडाचे तमाशे हा विषय निवडला आहे. तिने संदेश भंडारे यांचे ‘लावणी’ या विषयावरील फोटोंचे प्रदर्शन पाहून लावणीविषयी अभ्यास करण्याचे ठरवले.

पेट्रा मराठीत फाड् फाड् बोलते. ती म्हणाली, “जुना तमाशा राहिला नाही अशी ओरड अनेक लेखकांनी, अभ्यासकांनी केलेली माझ्या वाचनात आली. कोणतीही कला जशीच्या तशी राहत नाही. काळानुरूप तीत बदल होतातच!”

पेट्राने दोन वर्षे पुण्यात राहून मराठी शिकून घेतले. जर्मन उच्चारांच्या प्रभावाचे मराठी बोलताना तिच्या ओठांची होणारी हालचाल पाहताना, बोलण्यातील नेमके पुस्तकी शब्द ऐकताना मोठी मौज वाटते. पेट्रा म्हणते, “मला कळत नाही, की जेव्हा मराठी मुले जर्मनीला नोकरीसाठी किंवा अभ्यासासाठी जातात तेव्हा जर्मन भाषा शिकतातच, मग माझ्या मराठी शिकण्याचे एवढे कौतुक कशासाठी?”

पेट्राने महाराष्ट्रातील तमाशा अभ्यासण्यासाठी रघुवीर खेडेकरसह कांताबाई सातारकर या फडाची निवड केली. पेट्रा थंडी-वारा-ऊन सहन करत या गावाहून त्या गावाकडे प्रवास करणाऱ्या फडासोबत राहू लागली. पेट्रा तमाशातील बायकांप्रमाणे कनातीत राहून त्यांचे आयुष्य जगू पाहत होती. रघुवीर खेडेकर यांच्या तमाशाने त्यांच्या खेळाचे दिल्लीच्या कॉमनवेल्थ स्पर्धांच्या उद्घाटनाला सादरीकरण केले होते. खेडेकरांचा तमाशा महाराष्ट्रातील नंबर एकचा तमाशा मानला जातो. त्या तमाशा फडात पेट्राला सुरक्षितता आणि जिवाभावाची मैत्रीण मिळाली... ती मंदाराणी खेडेकर!

मंदाराणी खेडेकर ही रघुवीर खेडेकरांची धाकटी बहीण आणि तमाशा फडाची मुख्य नर्तिका. पेट्रा खेडेकरांच्या तमाशा फडात दोन वर्षे राहत असल्याने तिची आणि मंदाराणी यांची मैत्री घट्ट झाली आहे. पेट्रा मंदाराणीला तिच्या मेक-अपमध्ये मदत करते. खेळ सुरू झाल्यानंतर मंदाराणीच्या एकामागोमाग होणाऱ्या प्रवेशांसाठी बॅकस्टेजला तिचे कपडे घेऊन पेट्रा तत्परतेने असते. इतकेच काय, मंदाराणीने नुकत्याच दत्तक घेतलेल्या मुलीची कायदेशीर बाजू पेट्राने समर्थपणे सांभाळली आहे. “आधी पेट्राताईला आमचे जेवण जायचे नाही. लालेलाल व्हायची नुसती.” मंदाराणीच्या बोलण्यात पेट्राविषयीची काळजी असते. “पण मग हळुहळू तिला सवय लागली. आता ती फडात जे बनेल ते खाते.” पेट्रा फडातील बायकांप्रमाणे आरशासमोर केसांचे दोन भाग करत केस विंचरते, झिरके भाकरी हे अस्सल गावरान जिन्नस खाते, कनातीतील आडोशातच आंघोळ करते, टमरेल घेऊन नदीवर जाते, कोणतेही पाणी पिते. पेट्रा तिच्या वागण्याबोलण्यातून केव्हाच महाराष्ट्राची झाली आहे!

पेट्रा खेडेकरांच्या तमाशासोबत ज्या ज्या गावात जाई, तेथे तेथे तमाशाविषयीचे आकर्षण पेट्रामुळे द्विगुणित होई. प्रत्येक गावात फडाला भेट देणारे गावकरी पेट्राला पाहून डोळे विस्फारत आणि तिचे अस्खलित मराठी ऐकून तिला फॉरिनची पाटलीण म्हणत.

तीस वर्षांची पेट्रा शेमाखा लापशीस नावाच्या जर्मन विद्यापीठात आहे. पेट्रा करत असलेला अभ्यास ती जर्मन, मराठी आणि इंग्रजी भाषांत प्रकाशित करणार आहे. पेट्राने तमाशाचे बदललेले स्वरूप अभ्यासताना तिची पाटी कोरी होती. तमाशातील गण-गौळण आणि मॉर्डन रंगबाजी, आयटम साँग हे सगळे ती नव्या पिढीच्या प्रेक्षकांची गरज म्हणून स्वीकारते. तमाशातील वस्ताद आणि हलगीवाला कसे वाजवतात याचे ती भरभरून वर्णन करते. जुन्या तमाशाद्वारे करमणुकीतून प्रबोधन करण्याची पद्धत होती, मात्र प्रेक्षक बदलला आणि त्याला प्रबोधनाऐवजी करमणूक जास्त प्रिय झाली. परिणामी तमाशाचे स्वरूप बदलले असा निष्कर्ष पेट्राने काढला.

पेट्रा पाच वर्षांपूर्वी (2010 साली) भारतात आली. ती सुरुवातीला मराठी नाटकांचा अभ्यास करत होती. तिने पुण्याच्या मराठी नाट्यचळवळीमध्ये सहभागी होत एक मराठी नाटकही बसवले. मात्र मराठी रंगभूमीवर तितकेसे नवे प्रयोग होताना दिसत नाहीत. मराठी नाटकांत येणारे विषय, प्रेक्षकांचा नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, रंगमंचाची तीच ती पद्धत या सगळ्यांमुळे मराठी नाटक आहे त्याच अवस्थेत अडकणार हे लक्षात आल्यावर पेट्राने त्यातून अंग काढून घेतले. मात्र तिची महाराष्ट्रातील कलेवर पीएच्.डी. करण्याची इच्छा आहे. पेट्राने पुण्यातील पाच वर्षांच्या वास्तव्यात तमाशावरील बरीच मराठी पुस्तके वाचून काढली. ती स्वत:ला आलेले अनुभवही मराठीतून लिहू लागली. पेट्राचा अभ्यास अंतिम टप्प्यात आला आहे. पेट्राच्या हिरव्या डोळ्यांनी पाहिलेला तमाशा आणि तिने काढलेली निरीक्षणे निश्चितच वेगळी असतील.

-  नम्रता भिंगार्डे-वाघमारे

(मूळ लेख - 'पुणे पोस्ट')

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.