नवदुर्गेची रूपे

प्रतिनिधी 28/04/2015

हिंदु संस्कृतीत नऊ या संख्येला विशेष महत्त्व आहे जसे नवविधा भक्ती, नवग्रह, नवरस, नवरात्री आणि नवदुर्गा! नवदुर्गा हे दुर्गा देवीचे नऊ अवतार. दुर्गेच्या नऊ रुपांतील शक्तीची उपासना यांतील प्रत्येक रूपाचे वैशिष्ट्य आहे. यांस मातृदेवतांचा समूह असेही म्हटले जाते. आगम ग्रंथामध्ये नवदुर्गेची नावे दिली आहेत.

1. शैलपुत्री - हिमालयाची कन्या. पूर्वजन्मीची दशपुत्री-सती.

2. ब्रम्हचारीणी – शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करणारी.

3. चंद्रघण्टा/ चंडा – डोक्यावर घंटेप्रमाणे चंद्र धारण करणारी.

4. कुष्मांडा/कूष्मांडी – आपल्या मंद हास्यातून विश्वाची निर्मिती करणारी.

5. स्कंदमाता – कार्तिकेयाची माता.

6. कात्यातयनी - असुरांच्या वधासाठी हाती चंद्रहास तलवार धारण करणारी काव्ययन ऋषींची पुत्री.

7. कालरात्री – रौद्र स्वरूप. उग्र संहारक अशी तामसी शक्ती असलेली - काळालाही भय निर्माण करणारी.

8. महागौरी – गौर वर्ण असलेली.

9. सिद्धिदात्री/ सिद्धदायिनी - आपल्या सर्व भक्तांना सिद्धी प्राप्त करून देणारी ती.

स्कंदयामलात व अग्नीपुराणात नवदुर्गेची पुढील नावे दिलेली आहेत. रुद्रचंडा, प्रचंडा, चंडोग्रा, चंडनायिका, चंडा, चंडवती, चंडरुपा, अतिचंडिका व उग्रचंडिका.

नवदुर्गेची भविष्यपुराणातील नावे पुढीलप्रमाणे - महालक्ष्मी, नंदा, क्षेमकरी, शिवदूती, महारुद्रा, भ्रमरी, चंडमंगला, रेवती व हरसिद्धी.

याव्यतिरीक्‍त नवदुर्गेची नीलकंठी, रुद्रांशदुर्गा, वनदुर्गा, अग्निदुर्गा, जयदुर्गा, विंध्यवासिनीदुर्गा व रिपुमारीदुर्गा इत्यादी नावे आढळतात.

नवदुर्गांच्या उपासनेने साधकाला तप, सदाचार, शांती, आरोग्य, शौर्य तसेच अनेक सिद्धीची प्राप्ती होते असे मानले जाते.

गोव्यामध्ये मडकाई येथे नवदुर्गेचे मंदिर असून तेथे तिची पाषाणमूर्ती महिषासुरमर्दिनीच्या रुपात आहे.

(ऋषत-आर्यही यांचा ‘साहित्य मंदिर ऑक्टोबर 2014’चा अंक आणि भारतीय संस्कृतिकोश, खंड चार यांवरुन)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.