शाहीर सुभाष गोरे


शाहीर सुभाष गोरे हे लोककलाकार. त्यांचा जन्म 1 जून 1963 रोजी सोलापूरच्‍या सांगोला तालुक्‍यातील जवळा या गावी झाला. त्यांचे क्षेत्र लोककलालोकनृत्य (पोवाडे, गीते, लावणी, भारूड, गोंधळ, वाघ्या-मुरळी, वासुदेव, तमाशा इत्यादी). सुभाष गोरे यांचे आजोबा कृष्णा ज्योती गोरे, वडील बाबुराव कृष्णा गोरे त्याच क्षेत्रात होते.

गोरे ‘जय भवानी कलापथक व सांस्कृतिक मंडळ, जवळा’ गेल्या पंचवीस वर्षांपासून चालवतात. ऐतिहासिक व समाजप्रबोधनपर पोवाडे ही त्यांची खासीयत. त्या जोडीला गीते, गोंधळ, भारूड, वाघ्या-मुरळी, वासुदेव, तमाशा, लावणी आदी लोककला व लोकनृत्ये ते सादर करतात. त्‍यांचे कार्यक्रम भारतभर झाले आहेत.

त्यांनी  शासनाच्या ‘व्यसनमुक्ती अभियान’ (1996-2000), ‘संपूर्ण साक्षरता अभियान’ (1996-99), ‘मुली वाचवा अभियान’, गाव हागणदारीमुक्त करा, स्वच्छतेचे महत्त्व (2011-12) आदी अभियानांत ठिकठिकाणी कार्यक्रम केले आहेत. त्यांना सर्व प्रकारची चामडी वाद्ये (चामड्यापासून बनवलेली) उत्कृष्ट रीत्या वाजवता येतात.

सुभाष गोरे यांनी रशियात झालेल्या ‘भारत महोत्सव - 2004’ कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोककलालोकनृत्ये यांचे सादरीकरण केले. त्यांना 2008 सालचा राज्यव्यापी गोंधळी-वाघ्या-मुरळी कलावंत स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी सांगली आकाशवाणी केंद्रावर लोकसंगीताचा कार्यक्रम 1996 साली केला. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा कलावंत पुरस्कार, ‘अण्णाभाऊ साठे फाउंडेशन, पुणे’ पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

गोरे म्हणतात, की लोककलेत बदल झाला आहे. उदाहरणार्थ, जागरण हा प्रामुख्याने कुलाचाराचा धार्मिक विधी होता. त्याच्या जोडीला कथाकथनाद्वारे थोडी करमणूक, मनोरंजन होत असे. त्यातून लोककला व लोकसंस्कृती जोपासली जाई. माणसे पहाटेपर्यंत कथा ऐकत असत. आता तीन-चार तासच कार्यक्रम चालतो. पूर्वी साधने मर्यादितच (टिमडी, घाटी, तुणतुणे, टाळ) होती. पण आता साउंड, लाइट, इलेक्ट्रिक वाद्ये, भरपूर नव्या चाली, ऐकणाऱ्यांची आवड बदलली. जागरणात लोकांनी तमाशाप्रमाणे अश्लील गाण्यांची पसंती व्यक्त करण्यास सुरवात केली. परिणामत: छचोर गाण्याच्या मागणीद्वारे या संस्थेला धंदेवाईक स्वरूप प्राप्त झाले आहे.

- प्रा. महेश तानाजी घाडगे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.