मराठीतील न्याय


न्याय म्हणजे तर्कशास्त्र किंवा पद्धत. न्याय संस्कृत भाषेतून मराठीत आले आहेत. यासाठी आधार म्हणून  कै. वा.गो. आपटे यांच्या  ‘मराठी शब्दरत्नाकर’ या पुस्तकाचा उपयोग केला आहे.

१. अंधपरंपरा  न्याय :- खूप आंधळे रस्त्याने एकत्र चालत जातात, तेव्हा आंधळ्यांच्या मालिकेत पुढचा मनुष्य जिकडे जाईल तिकडे त्याच्या मागचा मनुष्य जातो हे ठरलेले आहे, त्याप्रमाणे स्वतः विचार न करता दुसरा मनुष्य नेईल तिकडे, त्याच्या मागे काही लोक डोळे मिटून जातात, त्याला ‘अंधपरंपरा न्याय’ असे म्हणतात. (मराठी मध्ये त्याला ‘मेंढरांसारखे वागणे’ असाही वाक्प्रचार आहे.)

२. घूणाक्षर न्याय :- किड्याने कोरलेल्या लाकडावरच्या चित्रविचित्र आकृतीत अचानक एखाद्या अक्षराचे साम्य सहजगत्या आढळून आले तर ती गोष्ट केवळ योगायोगाची असते. अशा स्थितीला ‘घूणाक्षर न्याय’ असे संबोधतात.

३. काकतालीय न्याय :- ताडाच्या झाडावर एक मोठे फळ पिकलेले होते. त्या झाडावर एक कावळा बसायला आणि ते फळ खाली पडायला एक गाठ पडली. त्यावरून जे मूर्ख होते ते म्हणू लागले की कावळ्यानेच ते फळ तोडून खाली टाकले! (काही लोक असेही म्हणतात, की एका झाडाखाली एक गाय उभी होती त्या झाडाच्या एका फांदीवर एक कावळा बसला आणि त्या क्षणी ती फांदी मोडून खाली पडली ) त्यावरून ‘काकतालीय न्याय’ हा शब्दप्रयोग सुरू झाला. म्हणजे खऱ्या कारणाचा शोध न करता केवळ समान काळात घडलेल्या गोष्टींचा कार्यकारण भाव जुळवू पाहणे हा वेडेपणा होय. अशा वेळी ‘काकतालीय न्याय’ असे संबोधण्याची रीत आहे. सविस्‍तर लेख वाचा...

४. अंधहस्ति  न्याय :- काही जन्मांध लोक हत्तीचे अंग चाचपून त्याचे वर्णन करू लागले. ज्याने पाय चाचपले तो म्हणाला, की हत्ती हा प्राणी खांबासारखा गोल आणि उंच आहे.  ज्याने कान चाचपले तो म्हणाला, छे. त्याचा आकार सुपासारखा आहे. तिसऱ्याने सोंड चाचपली होती. तो म्हणाला, तुम्ही दोघेही चुकलात. हत्तीचा आकार सर्पासारखा  आहे. याप्रमाणे त्या हत्तीच्या अंगाचा एकेक भाग घेऊन प्रत्येकाने केलेले वर्णन तेवढ्यापुरते बरोबर असले तरीही ते एकंदर त्या प्राण्याचे वर्णन नव्हे. अज्ञलोक सुद्धा याप्रमाणे विषयाच्या एकाद्या अंगाकडे पाहून हट्टाने त्यांचेच मत प्रतिपादन करत राहतात, तेव्हा त्याला अंधहस्ति न्याय असे संबोधतात.

५. अरुंधतीदर्शन न्याय - अवकाशातील अरुंधतीचा छोटा अस्पष्ट तारा शोधण्यासाठी प्रथम जवळचा वसिष्ठ हा ठळक तारा दाखवावा लागतो. त्यावरून ‘अरुंधतीदर्शन न्याय’ तयार झाला. ‘अरुंधतीदर्शन न्याय’ म्हणजे प्रथम स्थूल वस्तू दाखवून त्याच्या अनुषंगाने सूक्ष्म वस्तू दाखवणे. सविस्‍तर लेख वाचा...

६. गतानुगतिक न्याय :- एक वृद्ध ब्राह्मण वैश्वदेव करत असताना त्याने नेसलेल्या आखूड धाबळीचा काष्टा सुटला. (धाबळी - जाड्याभरड्या लोकरीचे वस्त्र.) त्याच्या मुलाने ते पाहून नीट ध्यानात  ठेवले. त्याला वाटले, की वैश्वदेव करताना काष्टा सोडण्याची रीत आहे. म्हणून तोही वैश्वदेव करताना काष्टा सोडू लागला. सारांश, लोक केवळ दुसऱ्याचे अनुकरण करणारे असतात. आपण अमुक गोष्ट तशी का करतो ते त्यांचे त्यांनाच कळत नसते. अशा वेळी ‘गतानुगतिक न्याय’ हा शब्दप्रयोग वापरतात.

७. घट्टकुटी प्रभात न्याय - घट्ट या शब्दाचा अर्थ जकात असा आहे. कुटी म्हणजे झोपडी. घट्टकुटी म्हणजे जकातनाका. प्रभात म्हणजे पहाट हे आपल्याला माहीतच आहे. जकात चुकवण्यासाठी आताचे व्यापारी जशा अनेक युक्त्या योजतात तसेच पूर्वीचे व्यापारीही करत. पूर्वी व्यापारी त्यांचा माल बैलगाड्यातून वाहून नेत. ते जकातनाका टाळण्यासाठी सहसा रात्री प्रवास करत, ते देखील आडमार्गाने. पण अनेकदा गंमत होत असे. त्यांचा आडमार्गाचा रस्ता चुकायचा. त्यांची गाडी रात्रभर अंधारात भरपूर हिंडल्यावर पहाटेच्या प्रकाशात हमरस्त्याला लागायची आणि नेमका जकातनाकाच समोर दृष्टीस पडायचा. हाच तो घट्टकुटी प्रभात न्याय. मूळ उद्देश फसणे, असफल होणे हा त्या न्यायाचा अर्थ. सविस्‍तर लेख वाचा...

८. दंडापूप  न्याय :- एका काठीला एक अनारसा बांधून ठेवलेला होता. ती काठी अनारशासह चोरीला गेली.  त्यावेळेला जर कोणी म्हणाले, की ती काठी उंदराने खाल्ली तर ती गोष्ट मान्य करण्यापूर्वी काठीला बांधलेला अनारसासुद्धा उंदराने खाल्ला ही गोष्ट मान्य करावी लागते. कारण उंदीर काठीपेक्षा अनारसा खाणे जास्त संभवनीय आहे. सारांश, दुष्कर गोष्टींची संभवनीयता  स्वीकारण्यापूर्वी तिच्याशी संबद्ध अशी जी गोष्ट घडणे सहज शक्य आहे तिची संभवनीयता अगोदर मानावी लागते. तेव्हा ‘दंडापूप’ न्याय होतो.

९. मंडूकप्लुती  न्याय :-  मंडूक म्हणजे बेडूक आणि प्लुती म्हणजे उडी मारत जाणे. रीतीनुसार काम करण्याऐवजी मधील काही भाग गाळून किंवा मधील काही काम न करता पुढील काम करणे अशा कामाला ‘मंडूकप्लुती न्याय’ असे म्हणतात.

१०. बीजांकुर न्याय :- जसे बीज पेरावे तसा अंकुर फुटतो. जसे पेरावे तसे उगवते. त्याशिवाय आणखीही एक अर्थ आहे. बीज आधी की अंकुर आधी हे निश्चयाने सांगता येत नाही. कारण बीजापासून अंकुर ही गोष्ट खरी असली तरी त्या अंकुरापासूनच झाड बनते आणि त्याला फळे येतात. त्या फळातून बीज निर्माण होते, हेही तितकेच खरे आहे. सारांश, परस्पराला परस्पर कारण अशा रीतीने परस्परांशी संबद्ध असलेल्या दोन गोष्टींची कालानुपूर्वता ठरवता येत नाही. तेव्हा ‘बीजांकुर न्याय’ होतो.

११. स्थविरलगुड न्याय :- स्थविर म्हणजे वृद्ध मनुष्य आणि लगुड म्हणजे काठी. वृद्ध मनुष्याने फेकलेली काठी योग्य किंवा नेमक्या जागी पडेल याचा नेम नसतो. कदाचित पडेल - कदाचित पडणार नाही! त्याप्रमाणे कार्यसिद्धी अमुक उपायाने निश्चित होईल असे म्हणता येत नाही, तेव्हा हा ‘स्थविरलगुड न्याय’ लावतात.

असे शेकडो न्याय संस्कृतात आहेत. मराठी भाषेतही ‘गाड्यावर नाव, नावेवर गाडा’, ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’, ‘ हाताच्या कंकणाला आरसा कशाला’  अशा अर्थी कित्येक म्हणी किंवा वाक्प्रचार आहेत आणि ते न्यायासारखे वापरले जातात.

संकलक :  शंभुनाथ दामोदर गानू

(उमेश करंबेळकर यांनी 'थिंक महाराष्‍ट्र'वर लिहिलेल्‍या न्‍यायसंदर्भातील माहितीचा येथे उल्‍लेख केला आहे.)

Last Updated On - 9th May 2016

लेखी अभिप्राय

Good article. Nyaya ia one of the darshan from Indian 6 darshan in philosophy. Nyaya. Viaheshik is pair like sankya.yog.

sandhya 09/05/2016

अतिशय मौलिक माहिती.

Sanjay Wakhare09/05/2016

माहिती रंजक व उद्बोधक आहे,धन्यवाद

अविनाश बर्वे.09/05/2016

अतिशय उत्तम माहिती
धन्यवाद

अमेय जोशी09/05/2016

एक उष्ट्रलकोटी न्याय आहे। उंटावरचे लाकुड घेऊन उंटालाच मारणे अन ते लाकुड उंटावरच ठेवणे!! छान माहीती।। न्यायाचे बरेच प्रकार आहेत। त्यांचीही माहीती मिळावी!! धन्यवाद!!

निलेश पाटील09/05/2016

छान माहीती .

K'sagar09/05/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.