सांगोल्याचा गुरांचा आणि कातडीचा आठवडा बाजार


सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील आठवडा गुरांचा बाजारा. त्‍या बाजारात खिल्लार बैल, विविध जातींच्‍या गाई आणि म्‍हशी विकण्‍यासाठी आणल्‍या जातात. त्याचबरोबर तेथे शेळी-मेंढी बाजारही भरतो. त्‍यास पुरक म्‍हणून शेळी आणि मेंढी यांच्‍या कातडीचा बाजार चालतो. सांगोल्‍याच्‍या बाजारात दर आठवड्याला लाखो-कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते.

सांगोल्‍याचा गुरांचा बाजार दर रविवारी भरतो. तो बाजार पिढ्यानपिढ्या सुरू असल्‍याचे लोकांकडून सांगितले जाते. सांगोल्‍यातील 'कृषी उत्‍पन्‍न समिती'च्‍या मोठ्या मैदानातवर हा बाजार भरतो. त्‍याकरता राज्याच्या अनेक भागांतून आणि राज्‍याबाहेरूनही त्या बाजारात खरेदीदार, विक्रीदार आणि दलाल येतात. तो बाजार शनिवारी दुपारपासूनच गजबजण्‍यास सुरूवात होते. विविध ठिकाणचे गुरांचे मालक स्‍वतः किंवा एखाद्या विश्‍वासू माणसाकरवी गुरे बाजाराच्‍या मैदानावर आणून ठेवतात. त्‍यांचा दुस-या दिवशी, अर्थात रविवारी दुपारपर्यंत तेथे तळ असतो. रात्रीपर्यंत ते मैदान जनावरांनी फुलून जाते. सांगोला परिसरात धनगरांचे प्रमाण मोठे आहे. ते शेतीला पूरक म्हंणून शेळी आणि मेंढी पालनाचा व्यवसाय करतात. त्या अनुषंगाने त्‍या बाजारात शेळ्या आणि मेंढ्या विकण्‍यासाठी आणल्‍या जातात. शेळ्या आणि मेंढ्या सांगोला परिसरातूनच आणल्‍या जात असल्‍याने त्‍या रविवारी पहाटे मैदानावर दाखल होतात. मैदानावर जमलेल्‍या बैलांचा, गाईंचा, म्‍हशींचा, शेळ्या-मेंढ्यांचा आणि त्‍यांच्‍या कातडीचा असे वेगवेगळे बाजार एकाच ठिकाणी भरतात. ज्‍यांना ग्राहक मिळते ते काही जनावरांची विक्री शनिवारीच करतात. मात्र विक्रीचा खरा दिवस हा रविवारचा!

रविवारी पहाटेपासूनच उरलेली जनावरे बाजारात येतात. ज्‍या मालकांनी गुरे त्‍यांच्‍या माणसासोबत पुढे पाठवली आहेत तीही बाजारात पोचतात. जनावरांची विक्री पहाटे पाचपासून सुरू होते. बाजारात दलालांची संख्‍या मोठी असते. त्‍यांचे महत्‍त्‍वही मोठे, कारण दलालांना टाळून मालक-खरेदीदार असा थेट सौदा केला जात नाही. तो त्‍या बाजाराच्‍या परंपरेचा भाग आहे. आधी दलाल ग्राहकाला कोणते आणि कसे जनावर विकत घ्‍यायचे आहे, त्‍याची माहिती घेतो. मग तो तसे जनावर बाजारात फिरून शोधतो. त्‍या जनावराच्‍या मालकाशी तात्‍पुरता सौदा करून, त्‍यात स्‍वतःची दलाली समाविष्‍ट करून ग्राहकाला तेथे घेऊन येतो. मग ग्राहक आणि दलाल त्या जनावराची परिक्षा करतात. ते गाय कशी चालते, तिचे वशिंड कसे आहे, तिची कास, कासेजवळील शिरा, तिचे कान या गोष्‍टींची तपासणी करतात. बैल असल्‍यास त्‍यास पळवूनही पाहिले जाते. तपासणीच्‍या वेळी जनावर ताजे टवटवीत दिसावे याकरता प्रत्‍येक मालक जनावरांना चांगला खुराक खाण्‍यास देत असतो. बाजारात आातानाही गुरांना स्‍वच्‍छ आंघोळ घालून आणले जाते.

जनावराची तपासणी झाल्‍यानंतर सर्वांसमक्ष सौदा होतो. सौदा होण्‍याचा भाग थोडा मजेशीर आहे. सौदा करताना जनावरांची किंमत सांगणे, ती कमी करून मागणे, त्‍यास नकार देत पुन्‍हा नवी किंमत सांगणे किंवा नकार-होकार देणे या सर्व गोष्‍टी तोंडाने सांगितल्‍या जात नाहीत. ग्राहकाला किती रुपयांत जनावर घ्‍यायचे आहे ते दलालाला ठाऊक असते. मग तो मालकाच्‍या शर्टखाली घालून त्‍याचा हात पकडतो आणि फक्‍त खुणांनी त्‍याला ग्राहकांने सांगितलेली किंमत खुणवतो. मग पुढचा सर्व सौदा शर्टखाली एकमेकांचे हात पकडून खाणाखुणांनीच होतो. जनावरांचे व्‍यवहार सर्वांसमक्ष होत असले तरी शेजारच्‍या व्‍यक्‍तीलाही तो सौदा कितीचा झाला ते कळत नाही. तेथील परंपरेनुसार प्रत्‍येक जनावराचा व्‍यवहार तशाच पद्धतीने होतो. कदाचित त्‍यामुळेच तेथील दलालांचे महत्‍त्‍व अबाधित राहिले असावे.

जनावरांचा सौदा पक्‍का झाला की पैसे घेऊन जनावर लगेच ताब्‍यात घेतले जात नाही. त्‍यावेळी विसार (अनामत रक्‍क्‍म) म्‍हणून काही रक्‍क्‍म मालकाला दिली जाते. मग ग्राहक पुन्‍हा बाजारात फिरू लागतो. तो इतर ठिकाणी असे विसार देऊन जनावरे पक्‍की करतो. त्‍याच्‍या मनाजोगती खरेदी झाली की, मालक बाजारात फिरून जनावरांची रर्वरित रक्‍कम देऊन विकत घेतलेली जनावरे गोळा करू लागतो. म्‍हणूनच जनावरांची विक्री पक्‍की झाल्‍यानंतरसुद्धा मालकांला रक्‍कम हाती येईपर्यंत बाजारात थांबावे लागते.

जनावरांच्‍या बाजारामुळे सांगोल्यातील वाहतूक उद्योगालाही चांगला व्यवसाय लाभतो. त्‍या बाजारात दर आठवडी लहानमोठी हजार-बाराशे वाहने येतात. जनावरे बाजारपेठेत नेण्या-आणण्यासाठी रिक्षा, मिनी टेम्‍पो अशा छोट्या वाहनांचा वापर होतो. ती वाहने बाजारतहाबाहेर उभी असतात. ती जागच्‍या जागी ठरवता येतात.

बाजारात शेळी-मेंढींसोबत पंधरा ते वीस हजार कातडी नगही बाजारात येतात. त्‍या दिवशी केवळ कातडीची सरासरी वीस लाखांची उलाढाल होते.

गावात आठवडाभर कापल्या गेलेल्या बोकडांची कातडी मीठ लावून साठवण केलेली असते. ती दर रविवारी विक्रीसाठी सर्व तालुक्यातून आणली जातात. ती कातडी शनिवारी संध्याकाळीच येतात. रविवारी सकाळी आठ ते दहा या दोन तासांत सर्व खरेदी विक्री व्यवहार पूर्ण होतो. खरेदीदार सांगली, मिरज, कराड, आटपाडी, पंढरपूर, सोलापूर या परिसरांप्रमाणे दूरच्यां प्रदेशातूनही येतात. रोख, उधार असे दोन्ही व्यवहार होतात. एका कातड्याचा भाव पन्नास रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत मिळतो. तयांचा दर प्रामुख्‍याने त्‍यांचा आकार, लांबी-रुंदी आणि पोत यांवर ठरवला जातो. त्या बाजारातही दलाल काम करतात. ते कातड्यामागे पन्नास रुपये इतके कमिशन मिळवतात. बोकडाच्या कातडीस जास्त दर तर मेंढ्यांच्या कातडीस कमी दर मिळतो.

दलालांच्यात सांगण्याप्रमाणे कातडीवरील प्रक्रिया फक्त चेन्नई येथे होते. त्यामुळे मध्यस्थ खरेदीदार सर्व माल मिरजमार्गे प्रक्रियेसाठी चेन्नईस पाठवतात. कातडे काढल्यापासून एक महिनाभर (मीठ लावून) व्यवस्थित राहते. अनेकांना त्यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार व त्याचा फायदा मिळतो. ‘सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती’सही नगामागे उत्पन्न मिळते.

शेळी, मेंढी बाजार हा सांगोला येथील महत्त्वाचा आठवडा (रविवार) बाजार आहे. बाजार सकाळी 8:00 ते 12:00  या वेळेत भरतो. तालुक्यात मेंढपाळ व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. तो घरगुती व मुख्य व्यवसाय म्हणून अशा दोन्ही पद्धतींनी केला जातो.

प्रत्येक बाजारी चार हजार शेळी-मेंढी (मेंढा-मेंढी आणि शेळी-बोकड) नग विक्रीसाठी येतात. सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, कोकण भागातून खाटीक तसेच इतर एजंट खरेदीदार वाहनांसह (सत्तर ते ऐंशी वाहने) खरेदीस येतात. मोठे एजंट लॉट पद्धतीने (लहानमोठे नग ) एकाच दराने मेंढे (बकरी) खरेदी करतात तर स्थानिक खाटीक आठवडाभर मटण विक्रीसाठी बोकड खरेदी करतात. विक्रीसाठी बकरा (मेंढा) अधिक प्रमाणात म्हणजे पंचवीसशे नग येतात. बोकड सातशे नग, मेंढ्या दोनशे नग तर शेळी पाचशे ते सहाशे नग येतात. त्यामध्येच पाळण्यासाठी शेळ्या विकत घेतल्या जात असतात. त्यांना पिलाप्रमाणे वयानुसार दहा ते पंधरा हजारापर्यंत दर मिळतो. भाकड शेळ्यांना मेंढीप्रमाणे अंदाजे वजनानुसार (दोनशे रुपये किलो) दर मिळतो. हा बाजार वर्षभर दर रविवारी भरतो. मांसाहारी जेवणाच्या सणानुसार बाजारातील आवक होते. तसेच त्याप्रमाणे दरही कमीजास्त होतात. इद, लग्नसराई, आषाढ या काळात मागणी वाढते. दरही चढे मिळतात.

शेळी-मेंढी बाजार हा चांगल्या उलाढालींचा आहे. साधारणपणे आठवड्यास एक कोटी ते दोन कोटींपर्यंत उलाढाल होते. सध्या अनेकजण वाढत्या मागणीमुळे बंदिस्त शेळीपालन व्यवसाय करत असल्याचे आढळते. ‘सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती’स या बाजारातून नगापाठीमागे (आवक) व विक्रीनुसार उत्पन्न मिळते.

- डॉ. एस.एल. पाटील/प्रा. बनकर एस.आर.

डॉ. एस.एल. पाटील, अर्थशास्त्र विभागप्रमुख, सांगोला कॉलेज सांगोला.
(माहितीसंकलन साह्य - राजाराम आवड, अकलूज)

लेखी अभिप्राय

very good information.

mali d s21/03/2015

chan mahiti dili ahe

Gore matola30/03/2015

आजच्या युगात बेरोजगार तरुणांनाना बंदिस्त शेळी पालना सारखे शेतीपुरक व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे

Govinda Shrira…02/08/2015

उत्तम. माहितीपूर्ण लेख.

देवेंद्र भगत07/01/2016

जनावरची माहिती

मंगेश भुजबळ25/11/2016

जनावराची माहीती किमंत

मंगेश भुजबळ12/03/2017

chan

Dilip Ruggi 07/04/2018

sunder bazar

Dilip Ruggi 07/04/2018

khup chan aahe

Dilip Ruggi 07/04/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.