वडशिंगेची दुर्गा – काजल अशोक जाधव


गायनात घराणी जशी असतात, तशी काही कुस्ती घराणी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. कुस्तीचा छंद घराण्यात पिढ्यान् पिढ्या चालत येतो.

कुर्डुवाडी (जिल्हा सोलापूर) पासून आठ-दहा किलोमीटर अंतरावरील वडशिंगे गावातही बबन गणपत जाधव हे पैलवान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांचा मुलगा अशोक बबन जाधव यानेही इयत्ता दहावीपर्यंत आजुबाजूच्या गावांतील, जत्रांतील फडांत कुस्तीगीर म्हणून भाग घेतला होता. अशोकला त्याचा स्वत:चा कुस्तीतील सक्रिय भाग शेतीच्या व कुटुंबाच्या जबाबदारीमुळे कमी करावा लागला. मात्र अशोकने वडिलांचा वारसा त्यांच्या मुलामार्फत पुढे चालवायचा अशी जिद्द बाळगली.

पण अशोक-सुरेखा यांना लागोपाठ दुसरी मुलगी झाली! तिचा जन्म 15 ऑगस्ट 2001 चा. तिचे नाव, राशीप्रमाणे ‘द’ हे अक्षर आल्यामुळे ‘दुर्गा’ असे ठेवले, पण नेहमीसाठी ‘काजल’ हे आधुनिक नावही ठेवले. पहिलीचे नाव तेजस्वी. अशोकला कुस्ती खेळायला मुलगा हवा होता. त्यामुळे अशोकला त्याच्या या मुलीला जवळ घ्यावे, तिचे लाड करावेत असे वाटेना. लहानग्या काजलला त्यातील काहीच समजत नव्हते. तीच जरा चालू-बोलू लागल्यावर ‘बापू बापू’ करून हट्टाने बाबाच्या मांडीवर बसू लागली; त्याच्या गळ्यात हात घालून अशोकला प्रेम देत राहिली.

अशोकचा कुस्ती हाच ध्यास असल्यामुळे तो गावच्या तालमीत जायचा; कुस्ती शिकू इच्छिणाऱ्या मुलांना कुस्तीचे काही डाव शिकवायचा. तो त्याचे कुस्तीशी, लाल मातीशी असलेले नाते  अशा रीतीने जपत होता. लहानगी काजल ‘बापू’बरोबर बाहेर जाण्याचा हट्ट धरे. ‘बापू’ तिला ‘तू पोरगी, तू काय तालमीत येऊन करणार? कंटाळशील बघ’ असे सांगून तिला न्यायचे टाळायचा, पण एके दिवशी, त्याला काजलला नाही म्हणवेना आणि अशोक लहानग्या काजलला उचलून वडशिंगे गावच्या तालमीत गेला!

काजलपण नवीन वातावरणाला बुजण्याऐवजी, ती जणू काही जन्मापासून आखाडे बघते इतकी तेथील वातावरणाशी तन्मय झाली. मुले उभी कशी राहतात, ती खेळणारा कुस्तीगीर कुठला पाय पुढे टाकतो, ते एकमेकांना कसे धरतात हे जाणत्या माणसाच्या आविर्भावात बघतेय हे पाहून अशोकला नवल वाटले. पण धक्का पुढेच बसायचा होता. तिसऱ्या दिवशी काजल अशोकला म्हणाली, ‘बापू, मी खेळू का कुस्ती?’

काजलच्या प्रश्नाने अशोकला आशेचा किरण दिसला! त्यानेही तिला आखाड्यात उतरवले. कोणीही न सांगता ती एकदम पैलवानाच्या पवित्र्यात उभी राहिलेली पाहून अशोकला व त्याच्या मित्रांना आश्चर्य वाटले. पोरगी रक्तातूनच कुस्ती शिकण्याचे गुण घेऊन आली आहे असे त्यांना वाटू लागले आणि अशोकही समाजाची पर्वा न करता त्याच्या मुलीला कुस्ती शिकवावी असे ठरवून बसला. अशा प्रकारे, बाप-लेकीच्या कुस्तीपर्वाची सुरुवात झाली.

काजल कुस्ती खेळण्यात खूप मेहनत घेत असे. त्यासाठी लवकर उठे. अशोकला हुरूप आला. काजल ही एकटीच मुलगी तालमीत असल्यामुळे तिला सरावासाठी फक्त मुलगे सोबत होते. पहिल्या एक-दीड वर्षांचे कौतुक संपल्यानंतर अशोकच्या कानावर कुजबूज येऊ लागली. ‘पोरीला कोन कुस्ती शिकवतंय होय?’ ‘पोरीला मिरवून फक्त पैसे कमावनार दिसत्योय त्यो’ ‘आपल्या समाजात पोरी कुस्ती खेळत नाहीत. ही पोर कुस्ती खेळली तर समाजाचे काय?’ ‘अशोकला काय याड-बिड लागलंय का काय?’ ही आणि अशी अनेक वाक्ये आडून-आडून अशोकच्या कानी येऊ लागली. गावच्या तालमीत पोरांबरोबर या पोरीला घेऊन येऊ नये असेही अशोकला सुचवण्यात आले. पण आता अशोकला काजलमधील सुप्त गुणांची चाहूल लागली होती. त्याने गावातील हायस्कूलच्या आखाड्यात लाल माती टाकून काजलसाठी नवीन आखाडा तयार केला. अशोक काजलला ‘बांगडी’, ‘ढाक’, ‘एकलंगी’, ‘डुंब’ असे कुस्तीचे डाव शिकवत राहिला आणि काजल शिकत राहिली. वर्षभरानंतर काजलची तयारी पूर्ण झाल्याची खात्री पटल्यावर अशोकने त्याच्या गावातील वस्तादाला आव्हान दिले. त्या कुस्तीत काजल जिंकली आणि गाववाल्यांनी अशोकच्या जिद्दीला व काजलच्या मेहनतीला स्वीकारले. काजल गावाची ‘वाघीण’ दुर्गा ठरली!

काजल परिसरातील कुस्त्यांमध्ये भाग घेऊ लागली. प्रतिस्पर्धी अर्थातच मुलगे. काजल नेहमी जिंकत राहिली. स्थानिक वर्तमानपत्रांनी ‘वडशिंगेची वाघीण’ असे तिचे नामकरण केले. काजलचा कुस्तीतील सहभाग जाहीर झाला, की हौशे-नवशे-गवशे ‘पोरगी कसली भारी खेळते, तिला बघुया’ म्हणून कुस्त्यांना उपस्थित राहू लागले. हळुहळू काजलची लोकप्रियता वाढू लागली. त्या भागातील कुस्ती समालोचक पुजारी सर यांच्याही लक्षात काजलची गुणवत्ता आली आणि तेही तिच्यामागे खंबीरपणे उभे राहिले. तिचे नाव कुस्त्यांसाठी सुचवू लागले. वडशिंगे, इंदापूर, सांगोला, जामखेड, सराटी, करमाळा तालुक्यातील साडे, मोहोळ तालुक्यातील नागनाथ येथे काजल आखाड्यात उतरली, की जिंकणारच याची प्रेक्षकांनाही खात्री वाटू लागली. प्रतिस्पर्ध्यांशी खेळताना त्याचा कस अजमावून, त्याला कुठल्या डावाने खाली घेऊन आसमान दाखवायचे याची समज काजलला आहे.

अशोकचे ध्येय त्याच्या मुलीने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळावी गावाचे, देशाचे नाव मोठे करावे हे आहे.

वेगवेगळ्या स्पर्धांमधून काजल मुलींच्या गटातून तिच्या शाळेचे प्रतिनिधीत्व करते. अडतीस किलो वजनी गटात चौदा वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत 2012-13 मध्ये विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग येथील सामन्यात काजलला दुसरा क्रमांक मिळाला तर 2013-14 साठी कोटोली (कोल्हापूर) येथील स्पर्धेत काजल पहिली आली. औरंगाबाद येथील राष्ट्रीय स्तरावर त्याच गटात काजल तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे. ‘अखिल भारतीय राजीव गांधी कुस्‍ती स्‍पर्धे'मध्‍ये काजलने गोल्‍ड कप मिळवला. त्या स्पर्धेत तिला देशात अग्रगण्य असलेल्या हरयाणाच्या कुस्ती खेळणाऱ्या मुलींशी सामना करावा लागला. त्या स्पर्धेच्या निमित्ताने अशोक जाधव व काजल यांना तत्कालिन कृषीमंत्री शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेता आली. तसेच, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, हिंदकेसरी पैलवान सत्पाल, ऑलिंपिक पदक विजेते पैलवान सुशीलकुमार आणि पैलवान योगेश्वर दत्त यांचे आशीर्वाद लाभले.

अशोक व काजल यांचे ध्येय आहे, राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीस्पर्धेत भाग घेणे व 2016/2020 च्या ऑलिंपिक पथकासाठी प्रयत्न करणे. अशोक काजलच्या आहारावर दरमहा पाच हजार रुपयांचा खर्च उचलत आहे. गायीच्या दुधाने वजन वाढत नाही व फॅट कमी असते, म्हणून काजलसाठी सांगोल्यातून देशी खिल्लारी गाय आणून जाधव कुटुंबीय सांभाळत आहे. काजल शाकाहारी आहे. बदाम, थंडाई, आटवलेले गायीचे दूध, तूप, फळांचे रस, केळी, मोसंबी असा काजलचा दिवसभराचा आहार आहे. काजलच्या कसरतींना सकाळी पाच वाजता सुरुवात होते. काजल कुर्डुवाडी येथील ‘छत्रपती शिवराय व्यायाम शाळा’ येथे पैलवान उस्ताद अस्लम काझी यांच्या तालमीत शिकत आहे. त्या तालमीत पोचण्यासाठी अशोक-काजल पहाटे पाचला उठून मोटारसायकलने आठ-दहा किलोमीटर दूर कुर्डुवाडीला येतात. अशोक काजलला तालमीत सोडले, की शेतातील कामे करण्यासाठी परत गावी जातो व नऊ वाजता काजलला आणण्यासाठी परत कुर्डुवाडीला तालमीत पोचतो. मग काजलची शाळा-अभ्यास आणि संध्याकाळी तालमीत परत सराव!

‘कुस्तीच्या सामन्यात उतरले, की मला कसलीच भीती वाटत नाही. फक्त कोठला डाव वापरायचा आणि जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे हेच विचार डोक्यात असतात’ असे काजल सांगते. काजल फक्त चौदा वर्षांची आहे.

अशोक मुलाच्या जन्माची वाट पाहत होता. तो मुलगाही त्याला झाला आहे. अशोक लहानग्या आदर्शलाही काजलच्याच वाटेने कुस्तीक्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

अशोक बबन जाधव
मु. पो. वडशिंगे, ता. माढा, जि. सोलापूर
08379092334/ 09730981072

- प्रसाद गोविंद घाणेकर

Last Updated On - 27th Dec 2016

लेखी अभिप्राय

प्रेरणादायी काजल आणि तिच्या विषयीचे लिखाणही...
दुर्गा नावाचे सार्थक झाले असे वाटते. खूप शुभेच्छा!

श्रुती संकोळी16/03/2015

लिबरलिझमच्या पुस्तकी बाता मारणारे आमच्यासारखे खुर्चीबहाद्दर फर्डे विचारवंत शहरात बक्कळ फोफावत असतात. पण जिथे पुरुषप्रधानता हे एक जिवंत, दाहक वास्तव आहे, अशा समाजात राहून, वाढूनही स्त्रीपुरुषसमानता समजून उमजून (आणि कसलाही तोरा न मिरवता) अंगीकारणारे जाधव बापलेक हे समाजाचे खरे पथदर्शी म्हटले पाहिजेत.

संजीव पटवर्धन16/03/2015

नवनवीन क्षेत्रात प्रवेश करु इच्छिणा-या अनेक मुलींसाठी प्रेरणा देईल अशी ही ' वडशिंगेची वाघिण'. अशा वाघिणीला प्रोत्साहन देणा-या अशोक जाधवांचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे. अशा या वाघिणीची ओळख करुन दिल्याबद्दल 'थिंक महाराष्ट्र' चे आभार.

आसावरी बर्वे16/03/2015

Preranadai.

अज्ञात17/03/2015

वडशिंगेच्‍या वाघिणीला सलाम. अशा वाघिणीची ओळख प्रसाद दादांनी करून दिल्याबद्दल त्यांना लाख लाख धन्यवाद. पुरुषसत्ताक समाजात अशोक सारखे पुरुष घराघरात असतील तर अशा अनेक वाघिणी मैदान गाजवतील. थिंक महाराष्ट्रला थँक्स.

अस्मिता रुग्गे 19/03/2015

Durga waghinila & pita Ashok waghala triwar salam

Bankar dasharath 22/03/2015

chan Abhinandan.

ganesh 26/03/2015

दुर्गा छान

राजपूत भुषण रत…06/07/2016

लय भारी खुपच च्छान

निलेश रायकर 19/09/2016

Sultan of Maharashtra....well done KAJAL...keep it on....we proud of you .

Akshay Pawar Nanded 27/12/2016

महाराष्ट्रात कुस्तीसारख्या परंपरागत मर्दानी खेळाला पुरूषांचा खेळ मानले गेले.परंतु आता या खेळात महिलांचा सहभाग वाढत आहे.ही आनंदाची गोष्ट आहे.काजल जाधव व तीचे वडील,प्रशिक्षक यांचे अभिनंदन,व पुढील वाटचालीस शुभेच्छा..!!

हंबीरराव नलवडे27/12/2016

Very good.
In case of any help i am ready.
Go ahead.

Subhash borate…28/12/2016

अभिनंदन काजलचे पप्पा व काजलचे मी पण माझी मुलगी आर्या हिला प्रशिक्षण देत आहे

योगेश पवार30/01/2017

Abhinandan.
Shabbas Jijauchya leki.

Pratik Tarate…30/03/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.