किल्‍ले पुरंदर!


सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यांपैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा तसाच पूर्वेकडे अदमासे चोवीस किलोमीटर जाऊन भुलेश्वरजवळ लोप पावतो. त्याच डोंगररांगेवर पुरंदर किल्ला वज्रगडाच्या सोबतीने वसलेला आहे.

पुरंदर हा किल्ला पंधराशे मीटर उंच असून तो गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. किल्ला पुणे जिल्ह्यातील विस्तीर्ण डोंगररांगेत आहे. तो ट्रेकिंगसाठी सोपा आहे. पुरंदरला चौफेर माच्या आहेत. पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे वीस मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला सहा मैलांवर असलेला हा किल्ला 18.98 अंश अक्षांश व 74.33 अंश रेखांशवर स्थित आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला प्रदेश डोंगराळ आहे. किल्‍ल्‍याच्या वायव्य दिशेला चौदा मैलांवर सिंहगड आहे, तर पश्चिमेला वीस मैलांवर राजगड आहे.

पुरंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे. तो एका दिवसांत पाहून होणे कठिणच. किल्ला मजबूत असून शत्रूच्या आक्रमणापासून बचावाला उत्तम जागा हेरून बांधण्यात आला आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. पूर्वी दारुगोळा व धान्य यांचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. गडावर चढायला असलेली एक सोपी बाजू सोडली तर इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. पायथ्यावरून गडावर एका कच्‍च्‍या वाटेसह एक पक्का रस्ताही जातो. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.

‘अल्याड जेजुरी पल्याड सोनोरी |
मध्ये वाहते क-हा |
पुरंदर शोभतो शिवशाहीचा तुरा ||

क-हे पठाराच्या या काव्यात पुरंदर किल्ल्याचे असे सुरेख वर्णन केले आहे. पुरंदर म्हणजे इंद्र, ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच पुरंदरगड. पुराणात त्या डोंगराचे नाव आहे इंद्रनील पर्वत. इंद्राचे अस्त्र 'वज्र', म्हणून पुरंदरचा सोबती असलेल्या  किल्‍ल्‍याला नाव देण्यात आले 'वज्रगड'! पुरंदर किल्‍ल्‍याच्या नावाविषयी एक वेगळी उत्पत्ती आहे. पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. त्याचे मूळ नाव 'पूर'. त्या पूर गावाचा आधार म्हणून किल्‍ल्‍याला 'पुरंधर' आणि कालांतराने अपभ्रंशित होत 'पुरंदर' असे नाव पडले असावे.

बहामनी काळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास आरंभ केला. निजामशाही सरकार मलिक अहंमद याने 1489 च्या सुमारास किल्ला जिंकून घेतला. तो पुढे, सन 1550 मध्ये आदिलशाहीत आला. आदिलशहाने शहाजीराजांना 1649 मध्ये कैदेत टाकले. त्याचवेळी शिवाजी महाराजांनी त्यांच्या ताब्यात काही आदिलशाही किल्ले घेतले, म्हणून आदिलशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती बिकट होती. एकीकडे वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी त्यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली; मात्र त्यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. तो महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात होता. महाराजांनी त्यांच्या भावा-भावांमधील भांडणाचा फायदा उठवून किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. मराठ्यांनी फत्तेखानाशी पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना त्या पहिल्या लढाईत मोठे यश प्राप्त झाले. शिवाजीराजांनी नेताजी पालकर यांस 1655 मध्ये पुरंदर किल्ल्याचा सरनौबत नेमले. संभाजीराजांचा जन्म पुरंदर किल्‍ल्‍यावर 16 मे 1657 गुरुवार या दिवशी झाला.

सडकेने किल्‍ल्‍यावर आले, की बिनी दरवाजातून आपण पुरंदर माचीवर प्रवेश करतो. त्या माचीला पूर्वी पाच दरवाजे असल्याचे मानले जाते. आता फक्त एक दरवाजा उरला आहे. गडाभोवती पूर्व-पश्चिम एक किलोमीटरभर फिरलेल्या त्‍या माचीवर अनेक वास्तू दिसतात. त्यात पुरंदरेश्वर-रामेश्वरची मंदिरे, पद्मावती-राजाळे तलाव, छोटे-मोठे आड, पेशवेकालीन इमारतीच्या जोत्यावर ब्रिटिशांनी बांधलेले बंगले, चर्च, बराकी अशा अनेक वास्तू आहेत. या वास्तूंमधून हिंडतानाच दोन्ही हातात समशेरी घेतलेला मुरारबाजींचा आवेशपूर्ण पुतळा समोर येतो.

पुरंदर किल्ल्याच्या इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडेने दिलेरखानाला अखेरच्या‍ श्वासापर्यंत दिलेला लढा. मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी 1665 च्या आषाढात पुरंदरला वेढा घातला. मुघलांच्या अफाट फौजेला मुरारबाजी त्याच्या  मोजक्या मावळ्यांसह निकराची टक्कर देत होता. वज्रगड पडल्यानंतर मुरारबाजी निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेला. त्याने दिलेल्या लढ्याचे सभासदखानाच्या बखरीत रोमांचक वर्णन करण्यात आले आहे -

‘सात हजार पठाण आणि मुठभर मावळे. पण पहिल्या हल्ल्यातच पांचशे पठाण लष्कर ठार जाहालें. खासा मुरार बाजी परभू माणसांनिशी मारीत शिरला. तेंव्हा दिलेरखान बोलिला ‘अरे तूं कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नांवाजितों.’ त्यावर मुरार बाजी बोलले, ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजीराजाचा शिपाई, तुझा कौल घेतो कीं काय?’ असे म्हणत तो खानावर चालून गेला. हातघाईचे युद्ध जहाले. तोच खानानें आपले आगें कमाण घेऊन तीर मारून काम पुरा केला. मग तोंडात अंगोळी घालत म्हणाला ‘असा शिपाई खुदाने पैदा केला!’ मुरारबाजीबरोबर तीनशें माणूस ठार जाहालें’

त्यानंतर 19 जून 1665 रोजी इतिहासप्रसिद्ध पुरंदरचा तह झाला.

पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.

पुरंदर माचीवरील एकमेव दरवाजा नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना लागतो. दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. तेथून समोरच पुरंदरचा खंदककडा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात. एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. माचीची लांबी एक मैल आहे तर रुंदी शंभर फूट आहे. बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी मंदिर आहे. त्याचे नाव ‘पुरंदरेश्वर’.

पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. ते पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिराच्या थोडे वर गेल्यावर पेशव्यांच्या दुमजली वाड्यांचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथांनी तो बांधला. त्या वाड्यातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. वाड्याच्या मागे विहीर आहे. ती चांगल्या अवस्थेत आहे. तेथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते. दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या वाटेने वर गेल्यावर पंधरा मिनिटांतच पर्यटक दिल्ली दरवाजापाशी पोचतो.

या तिसऱ्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे कडा थेट गेलेला दिसतो, तोच तो खंदककडा. कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत तिसऱ्या दरवाज्यापाशी यावे. तेथून एक वाट पुढे जाते. वाटेतच आजुबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. तेथेच अंबरखाना होता. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात. वाटेवरून पुढे गेल्यावर पाण्याचे हौद लागतात. वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. त्या वाटेवरून खाली गेल्यावर केदार दरवाजा लागतो. पडझडीमुळे तो दरवाजा वापरात नसला तरी पूर्वी त्या दरवाजाला फार महत्त्व होते.

पुणे, हडपसर, सासवड, नारायणपूर किंवा पुणे-कापूरहोळ - नारायणपूर अशा दोन मार्गे या गडाकडे येता येते. यापैकी कुठल्याही मार्गे आलो तरी पायथ्याच्या नारायणपूर आणि पुढे पेठ नारायण गावापर्यंत यावे लागते. नारायणपूर किंवा पुरंदरला जाणाऱ्या एसटी बस आपल्याला किल्‍ल्यापर्यंत आणून सोडतात. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदर किल्याच्‍या पायथ्याशी जाता येते.

- आशुतोष गोडबोले

Last Updated On - 19th May 2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.