मानसीश्वराची दिवाबत्तीतील जत्रा


मानसीश्‍वराचे मंदिरवेंगुर्ले-शिरोडा येथील मानसीश्वराचे स्थान आहे श्री देव मानसीच्या देवचाराचे. म्हणून त्याला मानसीश्वर असे म्हणतात. तेथे भाविकांचा महापूर असतो, पण कानठळ्या बसणारे आवाज नसतात आणि डोळे दिपून टाकणारी रोषणाई केली जात नाही.

शिरोड्यातील सागरकिनारी फडकणारी असंख्य भगवी निशाणे लक्ष वेधून घेतात. मंद सुवासासह कमळांची दाटीवाटी पाहायला मिळते आणि नकळत ‘वाहऽऽ फारच सुंदर’ अशी दाद देऊन हात जोडले जातात.

‘मानसी’ म्हणजे जन्मदात्री देवता. पश्चिम बंगालमध्ये मानसी देवतेची मोठी ख्याती आहे. त्या देवचारासमोर कुणीही आकांडतांडव करू नये, जल्लोष साजरा करताना मर्यादा पाळावी असा तेथील अलिखित संकेत आहे. त्या स्थानी होणाऱ्या जत्रेसाठी ग्रामस्थांकडून पेट्रोमॅक्सच्या गॅसबत्ती देण्याबरोबरच मानसीश्वराच्या नावाने ‘शिड’ (भगवे निशाण) उभे केले जातात. देवाची यात्रा फेब्रुवारी महिन्यात अत्यंत शांततेत भरते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकमधून भक्त यात्रेला उपस्थित असतात.

मानसीश्वराची जत्रा संपूर्ण शांततेत होण्यामागची आख्यायिका अशी: एका स्वारीवेळी ग्रामदेवता रामेश्वर वाजतगाजत त्या भागातून निघाले होते. त्या वेळी रामेश्वराची यात्रा मानसीच्या देवचाराने अक्राळविक्राळ स्वरूप प्रकट करून अडवली. पुढे जायचे असल्यास सर्वानी ‘त्याच्या पायाखालून जावे’ असा त्याचा आग्रह होता. रामेश्वराने त्याला हरतऱ्हेने समजावून पाहिले. परंतु तो ऐकेना. त्या वेळी ‘आजच्या घडीला तू बाजूला हो, मी स्नान करून परत येताना तुला दहा पायांचा वारू (घोडा) देईन’ असे आश्वासन दिले. मानसीचा देवचार खूश झाला. त्याने रामेश्वराला वाट मोकळी करून दिली. यात्रा पुढे निघाली. ग्रामदेवतेकडून काही तरी अद्भुत असे मिळणार म्हणून देवचार खुशीत होता. सर्व देव स्नान करून परत निघाले. त्यांपैकी कोणालाच देवचाराने अडवले नाही, कारण रामेश्वराची स्वारी यायची होती. देवचाराने रामेश्वर त्या स्थानावरून जात असताना त्यांचे स्वागत केले आणि स्नानावेळी जातानाच्या आश्वासनाची आठवण करून दिली. रामेश्वराने इकडे-तिकडे पाहिले. त्याच्या पायाशेजारील वाळूतून भलामोठा खेकडा पुढे सरकत होता. त्याने ती कुर्ली (खेकडा) देवचाराला भेट दिली. ‘हे काय?’ देवचाराने देवाला प्रश्न केला, ‘हा घे तुझा वारू. त्याला दहा पाय आहेत की नाही बघ! ते तुझे वाहन... ’ असे सांगून रामेश्वर पुढे निघाला. देवचार हातात खेकडा घेऊन रामेश्वराकडे पाहतच राहिला! मानसीश्वर रागावला. ‘मला फसवलेस काय, आता यापुढे येथून तुला कधीच जाऊ देणार नाही. जायचंच असेल तर ‘माझ्या पायाखालून जावं लागेल’ असे त्याने बजावले. तेव्हापासून वेंगुर्ल्याचा रामेश्वर परबवाडा मार्गे सागरेश्वर किनारी समुद्रस्नानास जातो. त्यानंतर सर्वजण ‘न जाणो आपल्यालाही तो अडवू शकतो’, या भावनेने मानसीश्वराच्या स्थानावरून जाताना इतर सर्व गावच्या देवदेवतांच्या पालख्याही वाद्ये न वाजवता जातात. जेणेकरून मानसीश्वराला त्या जात आहेत, याचा थांगपत्ता लागणार नाही.

दिवाबत्‍तीच्‍या उजेडात सादर केला जाणारा दशावतारत्यातून शांततेची प्रथा सुरू झाली. स्थानिक ग्रामस्थ तेथे पोचल्यावर आवाज न करता शांतता बाळगण्याची सूचना करतात. तेथे कुणी हॉर्न वाजवत नाहीत, उलट, त्या भागातून जाताना आपल्या गाडीचा आवाज कमीत कमी येईल याची दक्षता घेतली जाते. लग्नाची वरात असो अथवा अन्य कोणताही उत्सव... त्या स्थानावरून जाताना सारे जण चिडीचूप होतात. वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वराची पालखी वाजत-गाजत जात असताना त्या भागातून मात्र शांततेने पुढे सरकते.

जत्रेत कोकणातील दशावताराचा खेळ हा पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात सादर केला जातो. दिवाबत्तीच्या उजेडात सादर केला जाणारा दशावताराचा खेळ पाहण्याचा आनंद काही औरच! जत्रेत मानसीश्वराकडे देवाच्या नावाने जिवंत खेकडे सोडले जातात. कुरमुरे आणि शेंगदाणे यांच्या लाडूंचा नवस बोलला जातो. हजारोंनी फडकणारी निशाणे दृष्टीस पडतात. ती निशाणे म्हणजे देवदेवतांचे झेंडे. भक्ताच्या इच्छापूर्तीनंतर मानसीश्वराच्या स्थानावर निशाण रोवण्याची परंपरा आहे. काही भाविकांकडून नवसपूर्ती होण्यासाठी देवाला बत्तीही दिल्या जातात.

(प्रहार, ०५ फेब्रुवारी २०१४)

छायाचित्रे - दाजी नाईक

किशोर राणे
मु. पो. हरकूळ खुर्द,
ता. कणकवली, जिल्हाद सिंधूदुर्ग ४१६६०१
९४२२०५४६२७
kishorgrane@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.