टिक्केवाडीची गुळं काढण्याची प्रथा


जंगलात राहणारे टिक्‍केवाडीचे ग्रामस्‍थकोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात टिक्केवाडी हे दोन-अडीच हजार लोकवस्तीचे गाव. टिक्केवाडीचे ग्रामस्थ श्रद्धेपोटी तीन वर्षांतून एकदा काही दिवस देवीचा कौल घेऊन घरे-दारे सताड उघडी ठेवून, गाव सोडून गावाजवळील जंगलात राहण्यास जातात. ते त्यांची जनावरेही सोबत नेतात. त्‍या काळात गावात घरे-दारे उघडी असूनही चोरी होत नाही अशी ग्रामस्थांची भावना आहे. त्या काळात गावातील कोणत्याही घरात चूल पेटवली जात नाही. दिवा लावला जात नाही. केर-कचरा काढला जात नाही. ती परंपरा गावातील अष्टभुजाई देवीच्या श्रद्धेपोटी अनेक वर्षांपासून जोपासली गेली आहे. त्या प्रथेला तेथे ‘गुळं काढणे’ असे म्हणतात.

गावात ‘गुळं काढण्या’च्या प्रथेविषयी वेगवेगळे तीन मतप्रवाह दिसून येतात. गावातील जाणकार आणि महसूल विभागातील कोतवाल तुकाराम रामाणे व त्यांचे सहकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामदैवत भुजाई देवी धनगरी वेशातील आहे. देवीने काही पूर्वजांच्या स्वप्नात येऊन, साऱ्या गावाने धनगरी जीवनशैली आचरणात आणावी असे सांगितल्याची आख्यायिका आहे. गावातील प्रल्हाद ढेकळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मिटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी गावात प्लेगसारखे साथीचे रोग पसरत. त्यापासून बचाव करण्यासाठी गाव सोडून जंगलात राहण्याची प्रथा सुरू झाली असावी. मात्र संजय गुरव, सरपंच रणजीत गुरव यांनी ते मान्य केले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या काळी साथी तर सर्वच गावांतून होत्या. तरीही त्या परिसरातील हा एकच गाव प्रथा पाळत आला आहे.

प्रथेनुसार, गावकरी गाव सोडून जाण्यापूर्वी आणि गावात परत येताना अशा दोन्ही वेळा देवीचा कौल घेतात. त्यास प्रथेचे पूर्वी खूप कठोर नियम होते, अलिकडे, लोकांनी आपण होऊन त्यात शिथिलता आणली आहे. मात्र प्रथा मोडण्याचे धाडस कुणी दाखवत नाही. प्रथा अघोरी असेल व समाजावर तिचा विपरीत परिणाम होत असेल तर तिचे कुणीही समर्थन करणार नाही. मात्र प्रथेतून संस्कृतीची जोपासना होत असेल, गावात एकोपा वाढत असेल, तंटे कमी होत असतील तर प्रथेची जोपासना केली पाहिजे असा मतप्रवाह ग्रामस्थांत दिसून येतो.

गाव सोडण्यासाठी देवीने कौल दिल्यानंतर संसारोपयोगी साहित्य तेथेच ठेवून हवे असलेले साहित्य व पंधरा-वीस दिवस पुरेल एवढे धान्य घेऊन ग्रामस्थ बाहेर पडतात. शिवारात पर्णकुटी, मांडव बांधून वास्तव्य करतात. सर्वजण एकत्रितपणे निसर्गाच्या सान्निध्यात जीवन व्यतीत करतात. सहजीवनासह वनभोजनाचा आनंद लुटतात. काही लोक स्वतंत्र तांडा करून, तर काही चाळीस-पन्नास कुटुंबे एकत्रितपणे एकच मांडव करून राहतात. रात्रीचे जेवण किमान दोनशे ते अडीचशे लोक एकत्र येऊन घेतात.

जेवणानंतर महिलांच्या लोकगीतांचा जागर होतो. त्यामध्ये गौरी गीते, जात्यावरच्या ओव्या, रुखवत, उखाणे यांची मैफल असते. बुद्धिबळ, हिंदी-मराठी गाण्यांची अंताक्षरी, व्याख्यान, कीर्तने व अन्य स्पर्धांचे आयोजन करतात. बदलत्या युगात माणूस माणसापासून दुरावत असताना एकोपा दाखवून एखादा गाव त्याची वेगळी परंपरा, गावाचे वेगळेपण टिकवून ठेवत असेल तर ते कौतुकाचे होय असे पंचायत समिती सदस्य रतिपौर्णिमा कामत यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा रीती-परंपरेत बरीच शिथिलता आल्याचे आढळले. यंदा अनेकांच्या घरात दिवा पेटवलेला दिसत होता. अनेकांच्या घरी रात्रीच्या वेळी टीव्ही सुरू होता. मार्च महिना असल्याने सेवासंस्था, दूधसंस्था यांचे व्यवहार, गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळा गावातच सुरू होत्या. जनावरेही खोपीऐवजी घरांच्या गोठ्यात होती.

टिक्‍केवाडीच्‍या डोंगरातील गुहेत असलेले शंकराचे मंदिरचारशे उंब-यांचे टिक्केवाडी हे गाव सह्याद्रीच्या् दोन डोंगरांमध्ये वसले आहे. अनेक पर्यटक गावाच्या जंगलातील भ्रमंतीसाठी येतात. तेथील भूजाईदेवीचे दर्शन घेतात. गावच्या डोंगरातील गुहेत असलेले शंकराचे मंदिर आणि नजीकचे  ‘भीमाचा अंगठा’ हे पुरातन स्थळ पाहण्यासाठी सुमारे पाच ते सहा किलोमीटरची पायपीट जंगलातून करतात.

कोल्हाूपूरातील दूधगंगा नदीवर आसनगाव येथे काळम्मावाडी धरण उभारण्यात आले आहे. त्याहचे पाणी कालव्याद्वारे टिक्केवाडीला पुरवले जाते. हा कालवा गावाच्या खालच्या अंगाने वाहतो. त्यामुळे त्याजवळच्या जमिनीवर ऊसासारखी नगदी पिके घेतली जातात. गावात आठ दूधडेअरी आहेत. त्या माध्यमातून गावाला उत्पन्न मिळते. गावात एक पतपेढीही आहे.

टिक्केवाडी पर्यटनासाठी प्रसिद्ध असले तरी त्याची दुसरी ओळख ‘सुशिक्षितांचे गाव’ अशी आहे. गावातील प्रत्येक घरात पदवीधर आहे. शिक्षक, इंजिनीयर यांची संख्याही लक्षणीय आहे. गावची लोकसंख्‍या चोवीसशे आहे. मात्र गावात साक्षरतेचे प्रमाण नव्वनद टक्के असल्याचे भिकाजी रामाणे यांनी सांगितले. गावच्या ‘विद्यामंदिर टिक्केवाडी’ या शाळेत वीस वर्षे अध्यापनाचे काम केलेले निवृत्ती नारायण गुरव म्हणाले, की त्यांनी १९८९ साली शाळेत शिकवण्यास सुरूवात केली. तेव्हा गाव शिक्षणाबद्दल जागरूक नव्हते. मात्र गावात शिक्षणाबाबत जागृती घडावी असे गुरव आणि त्यांच्या  सहका-यांना वाटे. त्या शिक्षकांकडून तसे प्रयत्न करण्यात आले. त्याचे परिणाम तालुका, जिल्हा आणि राज्यस्तवरी परिक्षा-स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाच्या रुपात दिसून आले. भुदरगड तालुक्यात घेतल्या जाणा-या ‘भुदरगड तालुका टॅलेन्ट् सर्च’ (BTS) या परिक्षेत टिक्केवाडीतील विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले असल्याचे शाळेतील शिक्षक एकनाथ कुंभार यांनी सांगितले. सध्या गावात दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. अकरा-बारावीसाठी कागल तालुक्यात बिबरी कॉलेज किंवा गारगोटी तालुक्यातील कर्मवीर हिरे कॉलेज येथे जावे लागते.

टिक्केवाडीतील गुळं काढण्याची प्रथा प्रसिद्ध आहे. मात्र ‘गुळ’ या शब्दावरून या प्रथेबाबत काही गैरसमज आहेत. काही नियतकालिकांमधून टिक्केकवाडीचे गावकरी जंगलात जाऊन गु-हाळावर गुळ काढतात असे उल्लेख करण्यात आले आहेत. मात्र ते चुकीचे असल्याचे गावक-यांनी सांगितले. ‘गुळं काढणे’ याचा अर्थ जंगलात मांडव घालून राहणे होय, असे गावचे सरपंच रणजीत पाटील यांनी सांगितले.

टिक्‍केवाडीने सौहार्द चांगले टिकवून ठेवले आहे. गावाला चांगल्या-वाईट गोष्टीची जाण आहे. गावातील गुळं काढण्याच्या प्रथेमुळे गावक-यांमध्ये एकोपा नांदतो. गावात तंटेच होत नाहीत, त्यामुळे गावाला तंटामुक्तीचा विशेष पुरस्कारही मिळाला आहे.

टिक्‍केवाडीत आढळणा-या या परंपरेसारखी 'गावपळणा'ची परंपरा कोकणातील अनेक गावांमध्‍ये आढळून येते.

शांताराम पाटील
मु. पो. कोनवडे, तालुका भुदरगड,
जिल्हा कोल्हापूर, पिन – ४१६ २०९
९९२१२२३८३३
shantaram.kolhapur@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.