कॅन्सरसाठी प्रतिकारसज्ज राहणे हाच उपाय - डॉ. पटेल

प्रतिनिधी 20/11/2013

डॉ. चंद्रकांत पटेल यांची मुलाखत घेताना चंद्रशेखर नेनेकॅन्सर आपल्याभोवती वातावरणात, पर्यावरणात आहे. त्याला रोखण्याचा उपाय एकच. तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढवणे. एकदा त्या रोगाने ग्रासले, की त्याला व्यक्ती विविध उपायांनी काबूत ठेवू शकते, पण त्या रोगाची टांगती तलवार सतत डोक्यावर राहते, तेव्हा उत्तम उपाय म्हणजे रोगास दूर ठेवणे, असे उद्गार डॉ. चंद्रकांत पटेल या ज्येष्ठ कॅन्सरतज्ज्ञाने ‘माधवबाग कृतार्थ मुलाखतमाले’मधील त्यांच्‍या प्रकट संवादात काढले. कॉर्पोरेट सल्लागार व अभ्यासक चंद्रशेखर नेने यांनी त्यांची मुलाखत घेतली.

ते म्हणाले, की कॅन्सर किंवा आधुनिक वाटणारे रोग नव्याने निर्माण झालेले वा पसरलेले नाहीत. पूर्वी माणसांचे सरासरी आयुष्य पंचवीस-तीस वर्षे असे. बालमृत्यूच प्रचंड असत, त्यामुळे त्या रोगांचे अस्तित्व जाणवत नसे. आधुनिक काळात माणसाचे सरासरी आयुर्मान पन्नास-साठच्या पुढे गेले आहे, त्यामुळे रोग  दृगोचर होतात, इतकेच.

डॉ. पटेल यांनी बोलण्याच्या ओघात व श्रोत्यांच्या प्रश्नांना अनुलक्षून एकूण आरोग्यसेवेबाबत, विशेषत: कॅन्सरबाबत बरीच माहिती दिली. ते म्हणाले, की वैद्यकीय शिक्षण स्वस्त झाल्याखेरीज उत्तम आरोग्यसेवा सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात येणार नाही; अर्थात अनेक सेवाभावी संस्था व तशाच वृत्तीचे डॉक्टर गरिबांसाठी तऱ्हतऱ्हेने वैद्यकीय मदत करत असतात हेही त्यांनी नमूद केले.

डॉ. पटेल यांनी सांगितले, की त्यांच्या डोळ्यादेखत त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झाला, म्हणून त्यांनी डॉक्टर व्हायचे ठरवले. त्याच कारणाने, त्यांनी जरी इंग्लंड-अमेरिकेत शिक्षण घेतले, तेथे नोकरी-व्यवसाय केला तरी भारतात परत येण्याचे ठरवले.

डॉ. चंद्रकांत पटेलडॉ. पटेल मूळ सावंत-भोसले. त्यांचे आडनाव त्यांच्या आजोबांच्या काळात बदलले गेले. आजोबांना ब्रिटिश सरकारात पुरस्कार मिळाला. ते तो स्वीकारण्यास गेले तेव्हा ब्रिटिश अधिकारी म्हणाला, की सावंत म्हटले की खंडीभर लोक उभे राहतील, त्यातून तुम्हाला ओळखणार कसे? तर चंद्रकांत पटेल यांचे आजोबा म्हणाले, मग मला पटेल म्हणा! डॉ. पटेल यांनी ऐतिहासिक आढावा घेताना असेही सांगितले, की ते मूळ राजपूत. त्या प्रदेशातून सावंतवाडीला चार शतकांपूर्वी स्थलांतरित झाले.

डॉ. पटेल डॉ. बावडेकर यांच्या समवेत गोंदवल्याच्या ब्रम्हचैतन्य संस्थानात वैद्यकीय सेवा करण्यास जात. ते म्हणाले, की आरंभी तो उपक्रम सेवाभावी रीतीने उत्तम चालला. नंतर तेथे देणग्या मिळू लागल्या व शहरभागातील श्रीमंत रुग्णदेखील विनामूल्य सेवा घेऊ लागले. सुरूवातीला तेथे डॉक्टर उपलब्ध नसत, परंतु आता तेथे मानसेवी डॉक्टरांची 'वेटिंग लिस्ट' आहे. एवढे ग्लॅमर उपक्रमास लाभले आहे. तरीदेखील परिसरातील गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचा तो चांगला उपक्रम म्हटला पाहिजे.

डॉ. पटेल यांनी पडद्यावर दाखवलेला हाच तो टेट्रापॉड... प्रत्‍यक्षातला मूतखडा!डॉ. पटेल यांनी गडकिल्ल्यांना भेटी देण्याचा व तेथील छायाचित्रे टिपण्याचा छंद जोपासला. त्यांनी प्रतापगड, सिंहगड ,रायगड ,पाचाड येथील विविध स्वतः घेतलेल्या slides मधून , रोचक माहिती देत, श्रोत्यांना शिवकालीन इतिहासात नेले  त्यांच्या अशा जुन्या ट्रान्स्परन्सीज कार्यक्रमात पडद्यावर दाखवल्या तेव्हा प्रेक्षक नॉस्टॅल्जियाने मोहरून गेले. डॉ. पटेल यांनी गडकिल्‍ल्यांच्‍या प्रत्‍येक फोटोची माहिती आणि त्‍यांची आठवण उपस्थितांना कथन केली. पडद्यावर काटेरी आकाराची एक वस्‍तू दाखवून ते म्‍हणाले, की शिवाजींच्‍या काळात शत्रूवर हल्‍ला करण्‍यासाठी लोखंडाची काटेरी आकाराची  वस्‍तू वापरली जात असे. त्‍याचे काटे धोत्र्याच्या विषात बुडवून शत्रूच्‍या मार्गात टाकले जात. ती वस्तू म्हणजे टेट्रापॉड. तो काय असतो, हे लोकांना समजावे म्‍हणून तो पडद्यावर दाखवला गेला. डॉ. पटेल पुढे म्हणाले, की प्रत्यक्षात तो टेट्रापॉड नसून एका डॉक्‍टरने काढलेला किडनी स्‍टोन आहे. ते ऐकताच एवढा वेळ उत्‍कंठेने तो फोटो पाहणा-या प्रेक्षकांमध्‍ये हास्‍याची खसखस पिकली.

डॉक्‍टरांनी फोटोंची माहिती देताना, अशा तर्‍हेने थोड्याफार मिश्किल शैलीने प्रेक्षकांची करमणूक केली. अनेक दशकांपूर्वी घेतलेल्‍या त्‍या फोटोंबद्दल बोलत असताना डॉक्‍टरांच्‍या वयाच्‍या एकोणऐंशीव्‍या वर्षीही शाबूत असलेल्‍या दांडग्‍या स्‍मरणशक्‍तीचा प्रत्‍यय येत होता. डॉक्‍टरांनी कार्यक्रम संपल्‍यावर उपस्थितांकडून विचारण्‍यात आलेल्‍या प्रश्‍नांची उत्‍तरे दिली.  कर्मयोगी वृत्ती , साधेपणा आणि विनम्रता, तसेच गरीबांचा कळवळा ह्या डॉ. पटेल यांच्या स्वभाव गुणांचे  या मुलाखतीमधून श्रोत्यांना दर्शन झाले.

‘माधवबाग कृतार्थ मुलाखतमाले’च्या संयोजक संध्या जोशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पटेल यांच्या हस्ते अनुराधा गोरे यांच्या 'अभ्यासाची भीती कशाला?' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले (प्रकाशक ग्रंथाली). किरण क्षीरसागर यांनी 'थिंक महाराष्ट्र' प्रकल्पाची माहिती निवेदन केली.

‘माधवबाग कृतार्थ मुलाखतमाले’चा पुढील कार्यक्रम १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता होईल. त्‍या कार्यक्रमात आकाशवाणीवरील ‘पुन्‍हा प्रपंच’ आणि तत्‍सम कार्यक्रमांमधून श्रोत्‍यांवर स्‍वतःच्‍या आवाजाची मोहिनी टाकणा-या बाळ कुडतरकर यांच्‍याशी संवाद साधला जाणार आहे.

info@thinkmaharashtra.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.