लोककलेची मस्ती-गस्ती-वस्ती


     पाखरांच्या किलबिलाटाची मधुर धून, पानाफुलांची सळसळ, अवखळ धावणारा फेसाळलेला झरा, अंगाला झोंबणारा पहाटवारा… एक ब्रह्मनाद उमटतो, लय साधते, स्वर जुळतो, आपसूक गीत रंगते,  ताल धरला जातो, पाय थिरकतात. अशाच तालावर गीतनृत्य विकसित झालं असावं! निसर्गातून अंकुरलं ते टिकलं आणि पुढच्या पिढ्यांना भावलं.  हीच लोककला म्हणायची. माणसाचा स्वाभाविक, जगण्यामधून घडून आलेला आविष्कार...

     ह्याची अनुभुती मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात गेल्या महिन्यात पार पडलेल्या पहिल्या अखिल भारतीय लोककला संमेलनात आली. संमेलनाचं आयोजन आदिरंग, भक्तिरंग आणि लोकरंग अशा तीन विभागांत करण्यात आलं होतं. प्रत्येक दिवशी, त्या त्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. त्यामध्ये तत्संबंधित लोककलेचा आविष्कार आणि जाणकारांची चर्चा ह्यांचा समावेश असायचा.

तारपा नृत्य     पहिल्या दिवशी तारपा, बोहाडा, ढोलकच, गौरी नाच आणि ‘काज’ ही एकांकिका असे आविष्कार सादर करण्यात आले. तारपा नृत्यात त्यातील लांबलचक वाद्य लक्ष वेधून घेतं. वाद्यात वादक तोंडानं हवा फुकतो. त्यातून उमटणार्‍या आवाजाच्या तालावर स्त्री-पुरुष तालबद्ध नृत्य करतात. स्त्री-पुरुषांच्या साखळीत अग्रभागी असलेल्या पुरुषाच्या हातात काठी असते. तो जमिनीवर काठी आपटत समुहाला दिशा देतो. त्यानुसार साखळीचे विभिन्न आकार तयार होत जातात, ते प्रेक्षणीय असतात. नर्तकांच्या अंगात लय मुरलेली असते. त्यावर प्रेक्षकही ताल धरू लागतात, एवढी तन्मयता साधते.

कीर्तन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे     दुसर्‍या दिवशी भक्तिरंगात ह.भ.प. ज्ञानेश्वर वाबळे ह्यांचं कीर्तन म्हणजे आगळा अनुभव होता. ते निरूपण करताना समाजातील अनिष्ट प्रवृत्तींवर आसूड ओढत होते. ते नामाचा गजर करताना, तल्लिन होऊन नाचत होते. त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर इतका प्रभाव पाडला, की त्यांना आवश्यक वाटायचं, तेव्हा तेव्हा ते प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यास उद्युक्त करू शकत होते! कीर्तनकाराचं हे कौशल्य श्रेष्ठपणे प्रतीत झालं.

     भक्तिरंग खुलवणार्‍या इतर कार्यक्रमांत गोंधळ, सप्तखंजिरी, दशावतार, भारूड आणि जांभूळ-आख्यान ह्या लोककलांचा समावेश होता. राजारामभाऊ कदम हे शतायुषी कलाकार लालित्यपूर्ण, मनमोहक पद्धतीनं भारूड सादर करायचे. त्यांचे पुत्र राधाकृष्ण त्यांची परंपरा चालवत आहेत. थट्टा, मस्करी करत उपदेशाचा कडू डोस पाजणार्‍या आणि एकाच वेळी सात ते नऊ खंजिरी वाजवणार्‍या सत्यापाल शिरसोलीकर ह्यांना प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळाली.

     खडीगंमतचंदाबाई तिवाडी ह्यांचं भारूड लोकप्रिय आहे. त्यांनी ‘बुरगुडा’ हे भारूड गीत नेहमीच्या सुंदर शैलीत सादर केलं.

     दशावताराच्या सादरीकरणाचा परिचय करून देताना डॉ. तुलसी बेहरे ह्यांनी गणपती, संकासूर आदी प्रसंग हुबेहूब उभे केले. त्यानंतर मोचेमाडकर मंडळींनी आख्यान सादर केलं. मदालसा राणीची भूमिका करणार्‍या ओमप्रकाश चव्हाण ह्यांना ‘आजचे बालगंधर्व’ का म्हणतात ह्याचं प्रत्यंतर आलं.

     विठ्ठल उमप ह्यांचं ‘जांभूळ आख्यान’, विदर्भातील ‘खडीगंमत’ व रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर ह्यांचा तमाशा पाहून मन प्रसन्न झाल्यानंतर प्रेक्षकांना अकलूज लावणी स्पर्धेतील यशस्वी कलावंतांच्या लावण्यांनी खूष केलं. छाया-माया खुटेगावकर ह्या भगिनींच्या लावण्यांनी त्यावर कळस चढवला. पांडुरंग आणि कृष्णा घोटकर ह्यांच्या ढोलकी त्यासोबत कडाडल्या.

     संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक विषयांवरील परिसंवाद. ह्या परिसंवादांना श्रोत्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे फलनिष्पत्ती उत्तम झाली.

     ‘लोककलांचे रंगतत्त्व, सामर्थ्य आणि मर्यादा’ ह्या परिसंवादात मुंबई विद्यापीठाच्या नाट्यकला अकादमीचे संचालक वामन केंद्रे ह्यांनी लोककलेला सशर्त राजाश्रय मिळावा असा रास्त मुद्दा मांडला, लोककलाकारांची ऊर्जा म्हणजे मस्ती, समाजातील दोष हेरून प्रबोधन करणं म्हणजे गस्ती आणि स्थळ-काळाचं भान म्हणजे वस्ती- असा दाखला देत त्यांनी लोककलेतील ‘मस्ती-गस्ती-वस्ती’ असं प्रमेय मांडलं.

     त्यांनी लोककलेच्या लोकप्रियतेचं रहस्य सांगताना उत्तर प्रदेशातील रामलीलेचं वर्णन केलं. रामलीला उत्कर्षबिंदूकडे सरकत जाते तसतशी प्रेक्षकांची संख्या वाढत जाते. ती किती व्हावी? तब्बल पंधरा लाख! रामलीलेचे कलाकार आणि प्रेक्षक नव्या प्रसंगाच्या सादरीकरणासाठी नव्या ठिकाणी जातात. हे ‘तांडा चालला’ प्रकरण मनोवेधक असावं. प्रेक्षकांत पांढरी लुंगी नेसलेली माणसे दिसतात. ती प्रतीकात्मक वानरे असतात. ह्या कृतीने पुण्यलाभ होतो असा त्यांचा विश्वास.

     संमेलनाच्या संयोजकांचा इतर राज्यांतील लोककलावंतांशी देवाणघेवाण व्हावी असा विचार असावा. पहिल्या संमेलनात फक्त ‘पंडवानी’चा (मध्यप्रदेश) कार्यक्रम आयोजित केला गेला होता. पुढील काळात ह्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

     पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोककला-अभ्यासक डॉ. गणेश देवी ह्यांनी लोककलांचं संवर्धन करताना आदिवासींची जमात नष्ट होणार नाही ह्याची दक्षता घेण्याचं आवाहन केलं. नागर संस्कृतीपासून दूर असणारी ही माणसं लोककलेची संरक्षक आहेत. त्यांचा हा विचार चिरकाल टिकणारा वाटला नाही. कारण आदिवासी जमातीचा विकास आणि ग्रामीण भागाची प्रगती हे कार्यक्रम प्रत्येक राज्यात राबवले जातात. ते आवश्यकही आहेत. त्या अर्थाने आदिवासी शहरी होणार, ग्रामीण विभागांचं शहरीकरण होणार!

     मराठी लोककलांच्या भव्य, दिव्य आणि विचाराला खाद्य देणार्‍या या संमेलनाचं आयोजन पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान, लोकरंग सांस्कृतिक मंच ह्यांनी केलं होतं. संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश खांडगे आणि सरचिटणीस प्रशांत पवार ह्यांच्या संकल्पनेला आणि परिश्रमाला दाद द्यायला हवी. पवार ‘लोकसत्ते’मध्ये लोककला विषयाचे प्रमुख आहेत.

     खांडगे अमेरिकन फोकलोअर सोसायटीच्या वार्षिक परिषदेत 'भारतीय संदर्भातून लोकरंगभूमीचे भूत, वर्तमान, भविष्य' ह्या विषयावर शोधनिबंध सादर करायला ह्या महिन्यात निघत आहेत, ही बातमी ह्या सुमारासच प्रसृत झाली. खांडगे ह्यांच्या हाती विद्यापीठाचा लोककला विभाग आहे, त्यांच्या पाठीमागे सरकारचं सांस्कृतिक खातं आहे आणि आता, ते आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मान्यता मिळवण्यास निघाले आहेत. त्यांना शुभेच्छा देतानाच, लोककलांच्या क्षेत्रात भाबडेपणा पुरे; आता चिकित्सक दृष्टीने ह्या वारशाकडे पाहुया असं सुचवावंसं वाटतं.

-अदिनाथ हरवंदे
भ्रमणध्वनी : 9757104560
adharwande@gmail.com

 

दादर-माटुंगा कल्चर सेंटरमध्ये...

- राजेंद्र शिंदे

पोवाडा सादर करताना शाहीर सुरेश जाधव     दादर-माटुंगा कल्चर सेंटरमध्ये रविंद्रनाट्य मंदिराच्या पाठोपाठ लोककला संमेलन घडून आले. त्यामागेही प्रेरणा प्रकाश खांडगे यांचीच. खरेतर, ‘दादर-माटुंगा...’ २००३ सालापासून वेगवेगळे महोत्सव योजत असते.  त्याच्याशेजारीच यशवंत नाट्यमंदिर झाल्यामुळे ‘दादर-माटुंगा’चे सांस्कृतिक महत्त्व झाकोळले गेले आहे. त्यातून उभारी घेण्यासाठी स्त्रीसाहित्य संमेलन, प्रभात चित्र मंडळाबरोबर नियमित चित्रपट प्रदर्शन असे विविध कार्यक्रम ‘दादर-माटुंगा’मार्फत होत असतात. त्यांतलाच एक ‘अध्यात्म रंग’. अध्यात्म या व्यापक संज्ञेखाली कीर्तन, भजन, भारुड, प्रवचन, गोंधळ, गवळणी असे कार्यक्रम दरवर्षी होत. त्यामध्ये व्याख्यान सत्राचाह समावेश असे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर, सदानंद मोरे, यशवंत पाठक, सु.ग. शेवडे, तारा भवाळकर असे मातब्बर त्यांत बोलून गेले. मात्र यावर्षी त्याला ‘लोकरंग महोत्सव’ असा लोककला संमेलनाचा बाज दिला गेला आणि त्यामध्ये पोवाडा आणि कला, कलगी-तुरा व दशावतार असे तीन दिवस तीन कार्यक्रम झाले. पैकी पहिल्या दोन्ही दिवशी प्रकाश खांडगे यांनीच पोवाडा व कलगीतुरा यांचे विवेचन केले. दोन्ही दिवशी प्रेक्षकांचा प्रतिसाद अगदीच कोमट होता. परंतु तिसर्‍या दिवशी मात्र तुलसी बेहरे यांनी सादर केलेल्या दशावताराला लोक मोठ्या संख्येने जमले. कोणत्या कार्यक्रमाला जायचे आणि कोणत्या कार्यक्रमाला जायचे नाही हे लोक काय विचाराने ठरवतात याचा शोध घ्यायला हवा!

कलगीतु-र्याचा खेळ सादर करताना...     मात्र या तिन्ही दिवशी ‘दादर-माटुंगा...’ मध्ये जी भाषणे झाली ती माहितीपूर्ण होती आणि त्याहूनही सरस असे त्या त्या कार्यक्रमाचे सादरीकरण होते. उदाहरणार्थ, औरंगाबादचे शाहीर सुरेश जाधव यांचा पोवाडा झकास, खणखणीत होता, तर पुरेसावळी येथील कलगीतुरा मंडळाने सादर केलेला सवाल-जबाबाचा नमुना भेदक वाटला. त्यावरून हा कार्यक्रम रात्रभर कसा रंगत असेल याची सहज कल्पना आली. खांडगे यांनी कलगी-तु-र्या संबंधात विवेचनही झकास केले. त्यांचा विषय होता ‘कलगीतु-र्याची आध्यात्मिक शायरी. ते म्हणाले, कलगीतु-र्यामध्ये कलगीवाले व तुर्रेवाले असे दोन गट असतात. ते परस्परभिन्न अशा शिव व शक्तीचा पुरस्कार करतात. कलगीवाले जग हे माया म्हणजेच शक्ती पार्वतीपासून निर्माण झाले आहे असे मानतात. त्यांच्यापासूनच आपणास मुक्ती प्राप्त होते असा विचार त्यामागे असतो.

गुरुड जन्म सादर करताना (दशावतार)      कलगीतु-र्याचा सामना होतो तेव्हा ते एकमेकांना सवाल टाकतात व त्यांची उत्तरेही त्यांच्या पद्धतीने देतात. या मंडळींचा अध्यात्मावर अभ्यास असतो. त्यांच्याकडे त्यांच्या वाडवडिलांपासूनच्या, त्यांनी लिहिलेल्या चोपड्या असतात. त्यांचा ते अभ्यास करतात. सवालाला तत्काळ जबाब देण्यासाठीही त्यांना आपल्याजवळ, सामना असलेल्या ठिकाणी चोपड्या बाळगाव्या लागतात व वाचन करावे लागते. त्यांचा गुढविद्या वगैरेंचाही अभ्यास असतो. काही जणांना सिद्धीही प्राप्त झालेली असते. नीळवंती (नीलावती) सारखे गूढ ग्रंथ, की ज्यामुळे पशुपक्ष्यांची भाषा समजते. असे ग्रंथही त्यांच्या संग्रही असतात किंवा ते त्यांना तोंडपाठ असतात. त्या ग्रंथांचे वर्णन करत असताना खांडगे पराविद्येचे अनुभव सांगू लागले. त्यांनी स्वत:ची अनुभूती व्यक्त केलीच, पण त्याबरोबर दत्तोबा तांबे यांच्यासारख्या गाजलेल्या तमासगीराचा हवाला देऊन तसेही अनुभव कथन केले अध्यात्म व गूढविद्या यांची सरमिसळ सहज होत असते असे त्यांचे भाषण ऐकताना वाटून गेले.

     ‘दशावतार- एक ग्रामविधी’ यावर डॉ.तुलसी बेहरे यांनी व्याख्यान दिले. तसेच, ‘गरुड जन्म’ दशावतारही त्यांच्या पार्टीतर्फे सादर करण्यात आला.

‘लोकरंग’महोत्सवाची सांगता तिस-या दिवशी झाली. ‘दादर-माटुंगा कल्चर सेंटर’चे अध्यक्ष नाटककार सुरेश खरे यांनी महोत्सवाला दोन दिवस लाभलेला रसिकांचा अत्यल्प प्रतिसाद पाहून खेद व्यक्त केला. ते म्हणाले, की याला महोत्सव का म्हणायचे हा तर साधा उत्सव! असा जर रसिकांचा प्रतिसाद असेल तर असे कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय नाखुशीने घ्यावा लागेल. मात्र तिस-या दिवशी ‘दशावतार’ या लोककलेला आलेली रसिक प्रेक्षकांची उपस्थिती पाहून खरे सुखावले व आपण आदल्या दिवशी केलेली ‘कॉमेंट’मागे घेत ‘असे महोत्सव चालूच ठेवू’ असे संस्थेतर्फे जाहीर केले!

     खरे यांचे म्हणणे खऱेच आहे. पण एखाद्या कार्यक्रमाचे, कला प्रकाराचे अजीर्ण तर होत नाही याचेही भान संयोजकांनी ठेवले पाहिजे.

- राजेंद्र शिंदे
भ्रमणध्वनी : 9324635303

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.