मल्टिनॅशनल वॉर

प्रतिनिधी 16/02/2013

‘मल्टिनॅशनल वॉर’ काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ  कैलास पगारे यांच्या ‘मल्टिनॅशनल वॉर’ या कवितासंग्रहाच्या नशिकमधील प्रकाशन समारंभानंतर एका वेगळ्याच, प्रासंगिक चर्चेला तोंड फुटले. मी समारंभात भाषण करताना कवितासंग्रहाचे कौतुक केले. संग्रह प्रभावी आणि आजच्या दांभिकतेचा भेद करणारा आहे हे खरेच. समारंभातील अन्य वक्ते अविनाश सांगोलेकर व प्रल्हाद लुलेकर यांनादेखील कवितासंग्रह महत्त्वाचा वाटला. पगारे यांच्या कवितेतील विचारांची झेप आणि भाषेची सुगमता ही विशेष प्रत्ययकारी आहे असे त्या दोघांचे म्हणणे जाणवले. तेही खरे आहे. विशेषत: त्यांच्या कविता मंचकविता म्हणून लोकांसमोर सादर झाल्या तर त्यांना उत्स्फूर्त मोठा प्रतिसाद लाभेल याबद्दल संशय नाही.
 

 पगारे ‘मल्टिनॅशनल वॉर’मध्ये आजच्या काळाविषयी बोलतात. ते आजच्या काळाची वर्णने भेदक करतात. ते कलेक्टरला ‘शहेनशहा’ आणि मॅनेजरला ‘मॅन किलर’ असे संबोधतात तेव्हा अंगावर काटा येतो. त्यांना विद्यमान व्यवस्थेचा गळा घोटायचा आहे. समाजातील धर्मांधता नष्ट करायची आहे वगैरे वगैरे. समाजातील धर्मवेडाचे वर्णन करताना ते एके ठिकाणी म्हणतात, की देवांची संख्या एवढी वाढव, की प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला एक देव येईल! असा उपरोध आणि उपहास संग्रहात ठायी ठायी भिडतो.
 

 कैलाश पगारे  आंबेडकरी कवितेने कवितेची नवी व्याख्या केली असे गंगाधर पानतावणे यांनी संग्रहाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. दलित कवितेची रचना निबंधसदृश वाटे पण तिला आरंभी विधानाचे स्वरूप होते. ते विधान त्या काळाचे द्योतक होते. त्यांतीलसुद्धा काही चांगल्या वाटणार्‍या कवितांना अंतर्गत लय असे व त्यामुळे त्यांना व्यक्तिनिष्ठ कवितेचा कलाबाजही लाभे. त्यांत भावनोद्रेक असे. आशानिराशा, अपेक्षा, आकांक्षा, वैफल्य, जिद्द, हतबलता अशा भावभावना आवेगाने येत व वाचकाच्या हृदयास सरळ हात घालत. त्याच बरोबर त्या मेंदूमध्ये खळबळ निर्माण करत त्या त्यामधील विचारगर्भतेने. कवितेमागील वैचारिक बैठक विशेषत: दलित-वंचित समुदायास आत्मभान येण्यास, स्वत:ची ओळख पटवण्यास मदतशील झाली. पगारे यांच्या कवितेत ते सारे गुण आहेत. त्यामुळे ती प्रभावी वाटते.  
 

 तथापी मला त्यांच्या कवितासंग्रहातील व सध्याच्या एकूणच कवितेतील भाव-विचार ऐंशी-पंच्याऐंशीच्या जमान्यात रुतून बसलेले वाटतात. जवळ जवळ सर्व कवी भाषा आजच्या काळाची वापरतात. त्यामध्ये तंत्र वैज्ञानिक संज्ञांची रेलचेल असते. पगारे यांचा दावा असा आहे, की ते नव्वदनंतरच्या काळाचा आढावा घेत आहेत. परंतु सद्यकाल इतका अशाश्वत संकल्पनांनी ग्रासलेला आहे, की कवी-लेखक या काळातील वास्तवाचे यथार्थ वर्णन करू शकतात, परंतु प्रतिभावंताकडून जो भविष्यवेध अपेक्षित आहे तो ते वा अन्य कवीदेखील मांडू शकत नाहीत. पगारे यांची कविता आंबेडकरी विचारांनी भारलेली असली आणि ते स्वत:ला ‘आंबेडकरी विचारांच्या वादळाचा वंशज’ समजत असले तरी प्रत्यक्षात ते आंबेडकरी विचाराच्या ऐंशी-पंचाऐंशीच्या पूर्वजांमध्येच जाऊन बसत आहेत; ते आजच्या काळाला अनुरूप असा आंबेडकरी विचार मांडू शकलेले नाहीत. किंबहुना आजच्या काळाची ती गोची आहे. त्यामुळे कवी-साहित्यिक समाजावर प्रभाव टाकू शकत नाहीत. ते मंचावरून कविता सादर करून प्रक्षोभ निर्माण करू शकतात.
 

 मी माझ्या भाषणात गेल्या दोन दशकांत झालेल्या तंत्रज्ञानाच्या उद्रेकाचा उल्लेख केला; तंत्रज्ञान व्यक्तिस्वातंत्र्याला पोषक कसे आहे ते सांगितले. तंत्रज्ञान नीट जाणून घेऊन समाजाला उपकारक अशा पद्धतीने कसे राबवता येईल याचा विचार व्हायला हवा असे सुचवले. प्रत्यक्षात इजिप्त, ट्युनिशिया आणि अगदी आपले पालघर... येथपर्यंत फेसबुकने कशी हलचल माजवून दिली त्याचे वर्णन केले. माझे म्हणणे असे, की अशा परिस्थितीत ग्लोबलायझेशन हे फायद्याचे ठरू शकेल. ग्लोबलायझेशनने स्पर्धेचे वातावरण आले. त्यामुळे मनुष्याच्या गुणांना आव्हान तयार झाले. त्यासोबत गुणांची गुणवत्ता, त्यांचा दर्जा यांची गरज निर्माण झाली. या गोष्टी ग्लोबलायझेशनमध्ये अटळ आहेत आणि मनुष्याची शक्ती वाढवणार्‍या आहेत. अजून आपण राज्य व देश पातळीवर विचार करू शकत आहोत; आणि म्हणून तेवढ्या संरक्षित जगात आपण आपले हक्क सांगू शकतो. थोड्या लांबच्या भविष्यकाळात देशांच्या सरदद्दींची बंधने नाहीशी होऊन प्रत्येक माणसाला जगामध्ये यश संपादन करण्याचे आव्हान निर्माण होईल. त्यावेळी हक्क, मागण्या यांना फारसा अर्थ राहणार नाही. तर प्रत्येक माणसास त्याच्या क्षमतेने, कौशल्याने सिद्ध करावे लागेल. त्यासाठी प्रत्येक माणसाचे ग्लोबलायझेशनच्या संदर्भात रास्त आत्मभान जागे होणे, त्याला स्वयंप्रेरणा लाभणे याकरता चळवळी व आंदोलने यांचा रोख असला पाहिजे तर ती पुरोगामी ठरू शकतील. केवळ आंबेडकरांचा वारसा, त्यांचे विचार व त्यात रमलेली आपली मनबुद्धी यांमधून समाजाचा विकास साधला जाणार नाही. त्यासाठी आंबेडकरी विचारांचा आजच्या काळाच्या संदर्भात अर्थ लावला जाणे महत्त्वाचे आहे आणि ते काम नव्या कवी-लेखकांनी केले पाहिजे. नामदेव ढसाळ, दया पवार यांच्या काळचा मंत्र विद्रोह हा होता. समाजातील अन्याय व विषमता जेवढे भयानक होते तेवढे ते राहिलेले नाहीत. सामंजस्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दलित या शब्दाच्या मर्यादादेखील कळून चुकल्या आहेत. त्यामुळे ढसाळ-पवार यांच्या काळच्या संकल्पना नव्या कथा-कवितेत नुसत्या नव्या संज्ञांमध्ये मांडून चालणार नाही.
 

 माझ्या भाषणावर सभागृहात असलेला मुख्यत: महार/बौद्ध समाज थोडा चपापल्यासारखा वाटला. परंतु नंतरच्या ग्रूप गप्पांमध्ये जयवंतराव खडताळे यांनी माझ्या प्रतिपादनास पाठिंबा दर्शवला. खडताळे हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात उच्चाधिकारी आहेत. प्रत्येक माणसाचे कर्तृत्व जागे करणे आणि त्याच्यासमोर आव्हान ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे. ग्लोबलायझेशनने तशा संधी आपल्यासमोर आणून ठेवल्या आहेत. त्यांचा लाभ घेऊन व्यक्तीची व समाजाची प्रगती साधणे ही कसोटी आहे असे खडताळे यांचे म्हणणे दिसले. परंतु त्या गप्पांमध्ये सामील चार-पाच अन्य मंडळींना (ती प्राध्यापक, वकील अशी होती) मात्र खडताळे यांचे प्रतिपादन फारसे रुचत नसावे. किंबहुना ते यथार्थपणे त्यांच्यापर्यंत पोचतच नसावे असे वाटले. प्रथम दलित पॅंथर व नंतर रिपब्लिकन पक्ष यांच्याकडून झालेल्या अपेक्षाभंगामुळे सुस्थित दलित समाज संभ्रमावस्थेत आहे. आंबेडकरांना किंबहुना प्रबोधन काळात होऊन गेलेल्या सर्व थोर पुरुषांना त्यांची मान्यता या देशात मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे  मंत्र नुसते जपून फारसे काही साधणार नाही हेही जनांना कळून चुकले आहे. त्यामध्ये दलित जनतादेखील आहे. मग नवीन काय? तर आंबेडकरी विचार म्हणजे समतेचा विचार ग्लोबल वातावरणात कसा राबवता येईल याची मांडणी व्हायला हवी. या नव्या ग्लोबल वातावरणाचा लाभ घेता येणे महत्त्वाचे.  
 

पगारे यांचा कवितासंग्रह अशा वेगवेगळ्या विचारांना आणि कदाचित वादांना चालना देणारा ठरणार आहे असे वाटते.
 

- दिनकर गांगल

 

सशक्त पण संयमी दलित कविता! : ‘मल्टिनॅशनल वॉर’

नाशिक शहराला चळवळींचा इतिहास आहे. मराठीत दलित साहित्याचा प्रवाह १९६० नंतर आला. दलित साहित्याचे प्रणेते म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते, त्या बाबुराव बागूल यांच्यापासून प्रेरणा घेऊन राज्यात काही कवी लिहिते झाले. नाशिक शहरातही अरुण काळे, कैलास पगारे, गंगाधर अहिरे, काशीनाथ वेलदोडे यांच्यासह आणखी काहींनी कवितेच्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकले. कैलास पगारे हे परिवर्तनाच्या चळवळीत अग्रभागी राहिलेले कार्यकर्तेही आहेत. त्यांचा ‘मल्टिनॅशनल वॉर’ हा काव्यसंग्रह ‘सर्व्हे’ आणि ‘याही मोसमात’ या आधीच्या दोन संग्रहांनंतर एकोणीस वर्षांनी सुगावा प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला आहे. हा कालावधी फार मोठा. पण त्यामुळे पगारे यांची कवितासुद्धा त्या ताकदीची झाल्याचे संग्रहातील कविता वाचल्यानंतर जाणवते. पगारे तळागाळातील जनतेशी सातत्याने संपर्कात असल्यामुळे त्यांच्या कवितेत सामाजिक विषमतेचा आशय प्रकर्षाने जाणवतो. पण, तो मांडण्याची त्यांची शैली आक्रस्ताळी नाही, तर त्यांचा विद्रोह संयमी शब्दांत व्यक्त होतो.

 पगारे परंपरा आणि संस्कृती यांनी केलेले शोषण मांडताना मोजुनमापून शब्द वापरतात व त्यातून ते संदेश देतात. विशेषत: त्यांचे शब्द विचारप्रवर्तक असल्यामुळे रसिकांना भावतात. संग्रहातील बहुतांश कविता काळजाला स्पर्श करणार्‍या आहेत. त्यांच्या कवितेत जाणिवा बोथट झालेल्या समाजाला गदागदा हलवण्याचे सामर्थ्य आहे. ती शब्दांच्या क्रांतीतून शोषण व्यवस्थेला सुरूंग लावण्याचा प्रयत्न करते. संग्रहात बावन्न कविता असून त्या विविधांगी आहेत. संग्रहाचे शीर्षक असणारी ‘मल्टिनॅशनल वॉर’ ही कविता आपण कुठे चाललो आहोत, याचे नेमके भान देते.
 

हा कोणता इंस्टंट स्टंट आहे
जो माणसाला पोचवतो तळाला
आणि पाण्यावर बुडबुडाही
उठू देत नाही
डॉगहँडलरची ऐसीतैसी करत...

 

असे विचारगर्भ शब्द असणारी ही कविता कवी किती चिंतनशील आहे याचे भान देते.
 

 पगारे यांचा कवितेतील अनुभव दांडगा आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेत अनेक विषय येतात. विशेषत: कवितांमध्ये कवी इंग्रजी शब्दांचा मोठा वापर करतो. कारण तेच शब्द त्या त्या ठिकाणी अस्खलितपणे बसतात. ‘शहरात दंगा सुरू आहे’, ‘पासवर्ड उद्याच्या जगताचा’, ‘मॅनेजर’, ‘मॉर्निंग वॉकला जाताना’ या व इतर कवितांचा त्यासाठी संदर्भ देता येईल. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परंपरेचा पाईक असणारा कवी उगाच बाऊही करत नाही. तो समाजातील अंतर्गत कलह प्रामाणिकपणे मांडतो. ‘त्यांनी आपल्या वस्तीस नाव दिले’, ही कविता त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे.
 

त्यांनी आपल्या वस्तीस नाव दिले
आंबेडकरनगर
आज तिथे आंबेडकरी
विचारांपासून दूर गेलेले
आंबेडकर घराघरांत दिसताहेत
दिवसागणिक, टना-मनाने वाढताहेत...

 

 या ओळी विमनस्कता व्यक्त करण्यासाठी पुरेशा आहेत. ‘महिलांची होरपळ’, ‘पिचलेल्या समाजाचे दु:ख’ या व इतर विषयांवरील कवितांचा समावेश या संग्रहात आहे. गंगाधर पानतावणे यांची प्रस्तावना, धनंजय गोवर्धने यांचे मुखपृष्ठ आणि प्रमोद अहिरे यांची रेखाटने असणार्‍या या संग्रहातील कविता दलित कवितेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.
 

पुस्तक- मल्टिनॅशनल वॉर (काव्यसंग्रह)
कवी- कैलाश पगारे
२०३५, समतानगर, एमएचबी कॉलनी,
सातपूर, नाशिक ४२२०१२
९३७०२३४९१४
pagare.kailas@gmail.com
 

प्रकाशक-उषा वाघ, सुगावा प्रकाशन
५६३, सदाशिव पेठ, पुणे ३०
पृष्ठे-१०२ 
मूल्य-१५० रुपये

Last Updated On 31st Oct 2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.