ताठरे कुटुंब - छांदिष्टांचा मळा


बंडू ताठरे आणि त्यांनी करवंट्यांपासून बनवलेला कलश. कुटुंब म्हणजे प्रेमाच्या धाग्यात गुंफलेली मोत्यांची माळ! अशी, एकमेकांच्या आधाराने गुंफलेली माळ म्हणजे ताठरे कुटुंब. रायगडच्या ताठरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे मोती आहे. तो प्रत्येक मोती स्वत:त वैशिष्ट्यपूर्ण आहे. बंडू ताठरे हे कुटुंबप्रमुख. ताठरे अडसष्ट वयाचे असले तरी त्यांना काहीना काही उद्योग करत राहणे हे जिवंतपणाचे लक्षण वाटते. ताठरे प्लंबर म्हणून नोकरी करत असताना त्यांना करवंट्यांपासून निरनिराळ्या गृहोपयोगी व शोभेच्या वस्तू तयार करण्याचा छंद लागला. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या छंदाला जास्त वेळ दिला. सुरुवातीला, ते करवंट्यांची रिंग काढून त्यापासून रंगीत बांगड्या तयार करत. पुढे, त्यांनी करवंट्यांपासून सायकल, फुलदाणी, करवंट्यांचा कलश, कमळ, हळदी-कुंकवाचा करंडा, मंदिर, कमंडलू, परडी, बाहुली, घर, आकाशपाळणा अशा अनेक आकर्षक वस्तू तयार केल्या. त्यांनी त्या विविध वस्तू ठिकठिकाणी प्रदर्शनात मांडल्या. ताठरे यांच्या वस्तूंची रायगड, रोहा, पनवेल, नवी मुंबई येथे तसेच रायगड येथील शाळांमध्ये प्रदर्शने भरली आहेत.
 

त्यांनी या कलात्मक छंदासोबत त्यांनी विनामूल्य सेवा हे व्रतदेखील पाळले आहे. बंडू ताठरे यांचे वडील राजाराम ताठरे घरातील आणि परिसरातील लोकांच्या गाईगुरांना मोफत वनौषधे द्यायचे. बंडू ताठरे यांनी ते सेवाव्रत पुढे सुरू ठेवले आहे. ताठरे काविळीवर औषधोपचार करतात. ताठरे यांच्याकडून काविळीवर औषध घेण्यासाठी रायगड , रत्नागिरी , कोल्हापूर , खानदेश या प्रदेशांतून लोक त्यांच्या घरी येतात.
 

फुलांची परडी

 

करवंट्यांचा सुरेख चौफुलाtathare parivar 13 .jpg

त्यांना बीएमसीत नोकरी करत असताना काविळीचा त्रास झाला. ते नोकरी सोडून गावी गोरेगावला (रायगड) निघून गेले. मात्र, त्यांना सुरू असलेल्या औषधांचा गुण येईना. एकदा असेच एस.टी.स्टॅण्डवर उभे असताना त्यांच्या मित्राच्या मामाने तब्येतीची चौकशी केली. त्यांना काविळीने त्रस्त केले असल्याचे कळताच तो किंचित हसला, त्याने समोरच बोट केले आणि- ‘हे बघा, हे ते झाड. ते काविळीवर गुणकारी आहे.’ -असे सांगून तो घाईत निघून गेला. ताठरे यांनी समोर पाहिले तर तिथे बरीच झाडे होती. आता यांतले नेमके कोणते झाड औषधासाठी वापरायचे हे त्यांना समजेना. ताठरे यांनी वडिलांची पोतडी काढली आणि अभ्यास सुरू केला. अखेर, यश आले आणि त्यांना काविळीवरचे औषध असलेले झाड मिळाले. कडू शिरोळे. ताठरे यांनी स्वत:वर उपचार सुरू केले. शिरोळ्याच्या फळांचा रस काढून चहामधून घेतला. मात्र, हवा तितका परिणाम दिसला नाही. मग त्यांनी त्या फळाचा काढा तयार केला. त्या औषधाचा गुण ताठरे यांना आठवड्यातच जाणवू लागला. ताठरे यांची कावीळ पूर्ण बरी झाली.

  

ताठरे कुटुंबीय करवंट्यांच्या वस्तू तयार करताना.कमलेश ताठरे यांनी डिझाईन केलेल्‍या एका हॉलचे दृश्‍य

ताठरे यांनी तयार केलेले औषध अशा प्रकारे उपयुक्त ठरल्यानंतर जवळच्या डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी कावीळ झालेल्या रोग्यांवर उपचार सुरू केले. त्या लोकांची कावीळ बरी झाली. काविळीमध्ये दिसणारी लक्षणे- पोटात दुखणे, डोळे पिवळे होणे, लघवी करताना झोंबणे यांसारख्या लक्षणांवर ताठरे यांच्या औषधाने चोवीस तासांतच फरक पडू लागला. ऐंशी टक्के दुखणे एका दिवसातच कमी होऊ लागले, तर कावीळ पूर्णपणे बरी आठवड्यात होऊ लागली. जिल्ह्यातील आरोग्य खात्याकडेही त्यांनी त्यांचे औषध गुणकारी असल्याचे सप्रमाण सिद्ध केले. ताठरे यांनी पंधरा हजार रुग्णांवर उपचार केले आहेत. रुग्णांनी पूर्णत: बरे झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाठवलेली पत्रे ताठरे यांनी जपून ठेवली आहेत. लायन्स क्लब (रोहा) यांनी ताठरे यांचे काम बघून त्‍यांचा सत्कार केला. काविळीवर यशस्वी उपचार करतात म्हणून आरोग्य खात्याच्या सरसंचालकांचे शिफारसपत्रही त्यांच्याकडे आहे.
 

ताठरे यांचा जन्म ४ ऑगस्ट १९४४ ला गोरेगाव (रायगड) येथे झाला. मॅट्रिकनंतर नोकरीसाठी त्यांनी मुंबई, ठाणे, पनवेल व रोहा प्रवास केला. ते निवृत्तीनंतर पनवेल येथे स्थायिक झाले. बंडू ताठरे व मालती ताठरे यांना तीन अपत्ये. मोठा मुलगा किरण व त्याची पत्नी कल्पना, दुसरा मुलगा कमलेश व त्याची पत्नी अश्विनी, मुलगी (आता) सौ. कामिनी नथुराम बेंडखळे. असे त्यांचे कुटुंब. केतकी, यश, रुद्राक्ष, जुई ही चार नातवंडे. ताठरे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या परिस्थितीत मुलांना उच्च शिक्षण देता येईल, की नाही, याबाबत ते थोडे साशंक होते. तरी त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवले. ताठरे कुटुंबातील मोती विविध क्षेत्रांत चमकत आहेत.
 

किरण ताठरे यांना घरच्या परिस्थितीमुळे बारावीनंतर शिक्षण सोडावे लागले. त्यांनी नोकरी करून भावंडांना शिकवले. पुढेही ते डगमगले नाहीत. भावंडांची नोकरी सुरळीत झाल्यावर नोकरी करताना शिकत राहिले. त्यांनी बी.कॉम.ची पदवी घेतली. त्यानंतर एमबीए केले. ते स्व-कर्तृत्वावर ग्लेनमार्क फार्माशुटिकल कंपनीत अॅडमिनेस्ट्रिव्ह मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्याची पत्नी कल्पना ही शिक्षक व सध्या गृहिणी आहे.
 

कमलेश ताठरे मोठ्या भावाच्या पाठबळामुळे शैक्षणिक प्रगती करत गेले. त्यांनी बॅचलर ऑफ आर्किटेक्चरची पदवी संपादन केली. त्यांचे आर्किटेक्ट म्हणून रोह्यात नाव आहे. तेथे त्यांनी इंडस्ट्रियल व रेसिडेण्सियल, लॅण्डस्केपिंग, इंटिरिअर यासारखी डेकोरेशनची कामे केली आहेत.
 

कमलेश यांनी रोह्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी त्यांच्या कल्पक डिझाईनमधून राहती घरे, बिल्डिंग, सरकारी इमारतीचे रुक्ष, उदासवाणे स्वरूप पालटले आहे. नेत्रसुखद व जास्तीत जास्त उपयुक्त इमारती त्यांनी तयार केल्या. येथील फॉरेस्ट ऑफिसच्या इमारतीत त्यांनी जंगलाचा देखावा उभा केला आहे. अशा प्रकारे कुटुंबात उच्च शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ औत्सुक्याच्या जोरावर कमलेश यांनी आपले लक्ष्य गाठले व ते यशस्वी आर्किटेक्ट झाले. कमलेश यांचे लग्न नुकतेच झाले असून पत्नी अश्विनी ठाणे येथे नोकरी करतात.
 

कामिनी बेंडखळे आणि पती नथुराम बेंडखळे हे कलासक्त दाम्पत्य आहे. नथुराम बेंडखळे उत्तमोत्तम, मनमोहक चित्रे काढतात. त्यांना लहानपणापासूनच त्यांना फावल्या वेळात चित्रे काढण्याचा छंद होता. त्या सवयीचे रूपांतर रेखाचित्रे काढण्यामध्ये झाले. नथुराम यांनी चित्रकलेचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. नथुराम सुंदर सुंदर रांगोळ्या काढून त्या प्रदर्शनांमधून प्रदर्शित करतात. त्यांच्या त्या कलेचे परिसरात कौतुक होते.

बेंडखळे यांनी काढलेली रांगोळी.शिवाजी महाराज आग्र्याला कैदेत असतानाचा प्रसंग बेंडखळे यांनी रांगोळीतून हुबेहुब साकारला आहे.tathare parivar 20 .jpgनथुराम बेंडखळेकामिनी व नथुराम यांची मुलगी जुई. हीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. टी.व्ही.वर कोणतेही गाणे, संगीत लागले की ती नाचायला सुरुवात करायची. तिची नृत्यातील आवड ओळखून कामिनीने तिला नृत्याच्या क्लासला घातले. जुई सध्या भरतनाट्यम, फ्रि-फॉर्म हे नृत्याचे प्रकार शिकत आहे. जुईने नृत्यात काही पारितोषिके मिळवली आहेत. जुईने ‘बुगी वुगी’, ‘शाब्बास इंडिया’, ‘हिंदुस्तान के हुनरबाज’ आणि ‘एका पेक्षा एक’ यांसारख्या  टीव्ही वाहिन्यांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश संपादन केले आहे. जुई अॅथलिटिक्सची राज्यस्तरीय खेळाडूसुद्धा आहे.

बंडू ताठरे-
पहिला मजला, के टाईप बिल्डिंग, एकविरानगर, दत्त लॉन्ज जवळ
वरसे गाव, तालुका रोहा, जिल्हा रायगड ४०२११६
९२२६९४४८७०

कमलेश ताठरे ९४२२०९६१०८,
designersden04@gmail.com

- नारायण पराडकर

Last Updated On 17th Nov 2018

लेखी अभिप्राय

He mazya vadliche mitra ahet. Khup chan. Me tyna olkhto.

yogendra arun gangal12/04/2016

खूपच प्रेरणादायी कुटुंब. त्या मार्गे गेलो तर अवश्य भेट देऊ.

डाँ.दिलिप के.म…12/04/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.