खानदेशची कानुबाई


कानुबाईचे आगमन  ‘कानुबाई’ हे खानदेशचे आराध्यदैवत. कानुबाईच्याच नावाने खानदेशाला ‘कानुबाईचा देश’-कानदेश- ‘खानदेश’ असे नाव मिळाले आहे. ‘खानदेश’ नावाची उत्पत्ती तशी सांगितली जाते. कानुबाईचा उल्‍लेख ‘कानबाई’ असाही केला जातो.

कानुबाई ही निसर्गदेवता आहे. तिला प्रकृती मानले जाते. वंशवृद्धी व गोधनवृद्धीसाठी या निसर्गदेवतेची पूजा करण्यात येते. नागपंचमी च्या पहिल्या रविवारी कानुबाईची स्थापना करण्यात येते. कानुबाई ही श्रीफळ म्हणून पवित्र मानल्या जाणार्‍या नारळाच्या रूपाने घरोघरी आणली जाते. बर्‍याच ठिकाणी हे नारळ पिढ्यानपिढ्या तेथील देव्हार्‍यात जतन करून ठेवलेले असतात. कानुबाईची स्थापना ठरावीक घरांतच होत असली तरी शेजारीपाजारी, भाऊबंदकीतले लोक त्या कुटुंबांच्या आनंदात सहभागी होतात. यातून समाजात एकोपा व प्रेम वृद्धिंगत होते व समाज गुण्यागोविंदाने नांदतो.

कानुबाईला पिवळा, लाल अथवा गुलाबी पीतांबर नेसवला जातो. मोत्याची नथ, मंगळसूत्र, हार, हिरवा चुडा आदी सौभाग्यकांक्षिणीची आभूषणे चढवून घरातल्या देव्हार्‍यात अथवा देव्हार्‍यालगतच्या जागी नव्याकोर्‍या साड्यांच्या आडोशात सजावट करून कानुबाईची स्थापना होते. अवतीभवती आंब्याच्या पानांची तोरणे व विविध रानफुलांच्या माळांनी देव्हारा सजवला जातो. घरातल्या स्त्रिया कानुबाईची गाणी म्हणतात. अनेक लोकगीतांच्या ओव्यांमधून कानुबाईच्या सौंदर्याचे, तिच्या प्रेमाचे गुणगान केलेले असते.

‘कानबाई न्हावाले बसली ओ माय, पीव्वा पीतांबर नेसणी ओ माय,
अंगी कंचोळी घाली ओ माय, भांग गुलाल ना भरा ओ माय,
कपाय कुंकना भरा ओ माय, डोया मा काजय झिरमिरी ओ माय’

कानुबाईची स्थापना  अशा गाण्यांबरोबर स्त्रिया अहिराणी व मराठी भाषेतील गीत गाऊन रात्रभर जागरण करतात. डफ वाजवून नृत्य करतात, फुगड्या खेळतात. प्रसाद म्हणून लाह्या अथवा फुटाणे, खडीसाखर वाटले जातात. घरातली स्त्री अथवा दाम्पत्य मिळून उपवास करतात. रात्रभर समई तेवत ठेवली जाते. भक्ती, भाव आणि श्रद्धा यांचा अनोखा संगम त्या उत्सवात पाहायला मिळतो. परगावी गेलेले कुटुंबातील सदस्य या सणानिमित्त गावी परततात. त्यामुळे विभक्त कुटुंबपद्धतीला छेद देत कुटुंबात एकोपा निर्माण करणार्‍या या सणाला खानदेशात महत्त्व कायम आहे. घरात सुख, समृद्धी व शांती नांदावी म्हणून हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.

अहिराणी भाषिक कुटुंबीयांचा हा आवडता सण मानला जातो. या सणात रोजचा प्रसाद दिला जातो. हा प्रसाद फक्त कुटुंबातील व्यक्ती खाऊ शकते.

 कानुबाईचे विसर्जन दुसर्‍या दिवशी वाजत-गाजत होते. रविवारी सायंकाळी कानुबाईची स्थापना होऊन सोमवारी विसर्जन केले जात असल्याने तिला एका रात्रीची पाहुणी म्हणूनही संबोधले जाते. गावातल्या स्त्रिया आपापल्या कानुबाईला चौरंगावर बसवून डोक्यांवर घेतात. गल्लोगल्लीत इतर स्त्रिया औक्षण करतात. स्त्रिया सजूनधजून – नऊवारी साड्या अथवा लुगडि परिधान करून विसर्जनात सहभागी होतात. मार्गांत पाण्याचा सडा टाकला जातो.

‘कानबाई मायनी जतरा दाट. माय..... जतरा दाट
हे दर्शन माले, मिये ना वाट. माय.... मिये ना वाट’

 अशा प्रकारे भान हरपत, गाणे गात-गात भरल्या अंत:करणाने कानुबाईचे विसर्जन नदीत केले जाते.

नवसपूर्तीसाठी रोटांचा नैवेद्य –

उत्सवासमयीचे एक दृश्य  कानुबाई नवसाला पावल्यास गव्हाचे ‘रोट’, त्यासोबत तांदळाच्या गोड खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. अर्थातच देवीच्या नावाने नवस मानलेला असताना रोटांसाठी दळलेले जाडभरडे पीठ संपत नाही तोपर्यंत घरोघरी दोन-तीन दिवस दुसरा स्वयंपाक करत नाहीत. सोबत ‘आलन-कालन’ ही विविध पालेभाज्यांचे मिश्रण केलेली भाजी बनवली जाते.

 सकाळच्या रोटांना ‘उगतभानूचे रोट’ म्हणतात. त्यासाठी घरातील स्त्रीने भल्या पहाटे, सूर्य उगवण्याआधी रोट रांधावे असा संकेत आहे. दरवाज्यात गायीच्या शेणाने गोलाकार सारवून, त्यावर पिठाची व कुंकवाची रांगोळी काढून दुरडी ठेवली जाते. रोटांच्यावर पुरणाचे दिवे पेटवून पूजा केली जाते. रोट संध्याकाळच्या आत संपवायचे असतात. रोट कुणीही खाऊ शकतो, पण संध्याकाळचे रोट फक्त कुटुंबातील सदस्य किंवा भाऊबंदकीतली माणसे खाऊ शकतात. सकाळचे रोट कानुबाईचे तर संध्याकाळचे रोट तानबाईचे मानले जातात.

घरातल्या पुरुष मंडळींच्या संख्येनुसार रोटाचे गहू वेगळे काढले जातात. कुटुंबातून विभक्त झाल्यास त्यानुसार रोटांची वाटणी निम्मी होते. एखाद्या मुलाला मुलगा झालाच नाही तर रोट बंद पडतात. त्याचप्रमाणे बंद पडलेले रोट सुरू होण्यासाठी रोटांच्या दिवशी घरात मूल अथवा गायीला गोर्‍हा होईस्तोवर वाट पाहावी लागते. कानुबाईच्या विसर्जनानंतर उरलेले रोट हरबर्‍याच्या डाळीचे पदार्थ, दही, दूध, खीर आदींसोबत पौर्णिमेच्या आत संपवावे असा संकेत आहे.

कानुबाई ही प्रकृती आहे तर सूर्य हा पृथ्वी, चंद्र आदींचे मूळ आहे, म्हणून कानुबाईचे लग्न सूर्याशी लावले गेल्याची आख्यायिका आहे.

टीप:आलन-कालन’ - श्रावण महिन्यात शेतात सहज उपलब्ध होणार्‍या हिरव्या पालेभाज्या व इतर भाज्यांचे मिश्रण.

 काही ठिकाणी या मिश्रणाला ‘वाणवान’ असेही म्हणतात.

 पाककृती - मेथी, तोराठो, चिल्या-ढोल्या, चिवळ, कुंजरू, पोकळा, चवळीच्या डीर्र्या, अम्बाळी, श्रावण घेवडा, सोयाबीन, गिलके, भेंडी, गंगाफळ, गवार, दोडीची फुले, कर्टूले, व इतर.....या सर्व भाज्या कापून-धुऊन घ्याव्या. तापलेल्या तेलात लसूण-जिरे-कांद्याची फोडणी द्यावी, हळद, मीठ चवीप्रमाणे घालावे. भांड्यावर झाकण ठेवावे व वाफेवर शिजू द्यावे.

 संकलन सहाय्य: मोरेश्वर सोनार, प्रा.रेखा महाजन, प्रा.प्रतिभा पवार 

संकलन व शब्दांकन :
प्रा. नामदेव कोळी,
कडगाव, ता.जि. जळगाव,
भ्रमणध्वनी : 9404051543,
इमेल : pranaammarathi@gmail.com

कानुबाईसंबंधात इतर लेखन
खानदेशची ग्रामदेवता कानुबाईचा उत्‍सव 
कानबाई- खानदेशातील एक प्रथा!

लेखी अभिप्राय

khup sundar aani nawin mahiti milali

ujwala kshirsagar25/06/2013

अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेली उपयुक्त माहिती. धन्यवाद,

मनोज बालकृष्ण जोशी11/08/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.