गाजलेले जळगाव अधिवेशन !

प्रतिनिधी 15/04/2010

संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या प्रतिनिधी सभेचे अधिवेशन 13 व 14 एप्रिल 1947 रोजी जळगाव इथे भरले. त्या अधिवेशनात व-हाडचा मुद्दा खूप गाजला. अधिवेशन महाराष्ट्रातली तीन संस्थाने गुजरातमधील संस्थानांच्या गटात समाविष्ट करण्याच्या मुंबई सरकारच्या निषेधानेही गाजले.

या अधिवेशनाच्या सुमारास व-हाड प्रांत निजामाला परत देण्याच्या गुप्त वाटाघाटी ब्रिटिश सरकार व हैदराबादचा निजाम यांच्यात सुरू असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या. त्यामुळे सगळे वातावरण ढवळून निघाले. संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे कार्यकर्ते आणि पुरस्कर्ते अस्वस्थ झाले.

नागपूर उच्च न्यायालयाचे सरन्याधीश (तत्कालीन) फ्रेडरिक गिल यांनी 'व-हाड निजामाच्या ताब्यात दिला जाण्याचा संभव अधिक आहे' असे मत व्यक्त केले, त्यामुळे चर्चेत अजूनच भर पडली. तशात, निजाम पंजाबराव देशमुखांनी अमरावतीत सुरू केलेल्या महाविद्यालयाला दोन लाखांची देणगी देणार असून, त्यांची कोनशिला बसवण्यासाठी दिवाण सर मिर्झा इस्माईल येणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांत प्रसिध्द झाल्या.

या घटनाक्रमामुळे जळगाव अधिवेशनात व-हाडचा प्रश्न महत्त्वाचा ठरणे हे क्रमप्राप्त होते.

व-हाडच्या मुद्यावर बोलताना स्वागताध्यक्ष ह.वि.पाटसकर यांनी 'व-हाड परत मिळवण्याचे निजामाचे सारे प्रयत्न हाणून पाडले जातील' असे स्वच्छ व स्पष्ट शब्दांत सुनावले.

शंकरराव देव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, सर मिर्झा इस्माईलच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. 'व-हाडात आमचे निशाण, आमचा कायदा आणि आमचं राज्य सुरू झाले पाहिजे' ही मिर्झांची मागणी फेटाळून लावली. आणि व-हाड किंवा विदर्भ हा महाराष्ट्राचा अवयव असल्याचे जाहीर केले.

धनंजयराव गाडगीळ यांनी व-हाडासंबंधीचा ठराव ब्रिजलाल बियाणी व पंजाबराव देशमुख यांच्याशी विचारविनिमय करून तयार केला. या ठरावावर बोलताना, ''व-हाड नष्ट झाला तरी चालेल पण संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आलाच पाहिजे'' अशी गर्जना बियाणींनी केली. याच बियाणींची कृती पुढे, अकोला कराराच्या वेळी किती विपरीत झाली हे बघण्यासारखे आहे.

मुंबई सरकारने जंजिरा, जव्हार आणि सुरगाणा ही मराठी भाषिक संस्थाने गुजरातमधल्या संस्थानांच्या यादीत घालून मोठा गोंधळ उडवून दिला, त्याचा निषेध करून ती दक्षिण महाराष्ट्रातल्या संस्थानांच्या संघामध्ये सामील करावीत अशी मागणी करणारा ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात आला.

जंजिरा संस्थानाचा समावेश गुजरात संस्थानांच्या गटात करणे हा धडधडीत अन्याय होता. जंजिरा संस्थान मुंबईच्या दक्षिणेस आहे. या संस्थानाच्या दरबाराची भाषा तीनशे वर्षे मराठी होती. या संस्थानात अडीचशे खेडी होती व तेव्हा त्या संस्थानांची लोकसंख्या एक लाख होती. या संस्थानांची छोटेखानी जहागिर जाफराबाद ही काठेवाडच्या किना-यावर म्हणजे जंजि-यापासून चारशे मैलांवर, मुंबईच्या उत्तरेला असतानाही सबंध संस्थान गुजराती संस्थानांच्या गटात ढकलले जात होते -- कारण मुंबईत अधिकारात असलेले बाळासाहेब खेर ह्यांचे मंत्रिमंडळ गुजराती भाषिक मंत्र्यांच्या मुठीत होते आणि बाळासाहेब खेर यांची मातृभाषा मराठी असली तरी त्यांना महाराष्ट्रापेक्षा गुजरात व कर्नाटक यांच्याबद्दल विशेष आपुलकी वाटत असे.

जळगाव अधिवेशनानंतर लगेच, म्हणजे 16 मे 1947 च्या 'टाइम्स
ऑफ इंडिया'त सरदार वल्लभभाई पटेल यांचे पुत्र डाह्याभाई यांचे एक पत्र प्रसिध्द झाले. त्यांनी 'मुंबई नागरिक मग ते कोणत्याही धर्माचे असोत, कोणत्याही प्रांतातून मुंबईत स्थायिक झालेले असोत किंवा अन्य कोणत्याही भाषा बोलणारे असोत, मुंबई शहराचा महाराष्ट्रात किंवा अन्य कोणतीही प्रांतात समावेश करण्याचे प्रयत्न हाणून पाडतील'' असा इशारा दिला होता आणि शंकरराव देव यांनी त्याची नोंद घ्यावी असेही सुचवले होते.

मुंबईचा गुजरातमध्ये किंवा महाराष्ट्रात समावेश न करता तिचे अस्तित्व स्वतंत्र ठेवण्याचा जो विचार आगामी काळात पुढे आला त्याचा उगम या पत्रात आहे. डाह्याभाईंच्या या पत्रावरून एक स्पष्ट झाले, ते म्हणजे वल्लभभाई व डाह्याभाई या पितापुत्रांचे मुंबई शहराचे स्वतंत्र राज्य करण्याबद्दल एकमत होते!

- नरेंद्र काळे

 

Last Updated On - 1 May 2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.