लेकास निरोप


जागतिक पुस्तक दिनानिर्मित्ताने....

शेक्सपीयरचा जन्मदिन २२ एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन म्हणून मानला जातो. त्या निर्मित्ताने, तळेगावच्या इंग्रजीच्या प्राध्यापक अपर्णा महाजन यांनी शेक्सपीयरच्या एका उता-याचा अनुवाद सादर केला आहे. तो आहे लेकास निरोप या स्वरुपाचा त्याचे महत्त्व आजच्या काळात प्रत्येक आईला व तिच्या लेकाला वा लेकांना स्वाभाविकपणेच कळून येईल..

लेकास निरोप

अरे, लिऍंटर्स, अजून इथेच तू?

आवर, आवर, प्रवासाची वेळ झालीय...

बोटीत बसायची वेळ झालीय...

बघ, तुझ्या बोटींच्या शिडांवर... वारं आरूढ झालंय...

तू निघालायस, ...आशीर्वाद आहेतच माझे... पण थांब...

बाहेर देशी जातोयस... वागण्याच्या काही रीतीभाती

सांगतो तुला... स्मृतीमध्ये कोरून ठेव त्या तुझ्या...

ऐक...

तुझ्या विचारांना शब्दरूप देण्याच्या फंदात कधीसुध्दा पडू नकोस...

आणि अस्थिर, वेडयावाकडया विचारांना कृतीत कधीच आणू नकोस...

सगळयांशी समरसून वाग... पण वागताना, हीनतेकडे झुकू नकोस...

तुला नवनवे मित्र मिळतील...

त्यांची मैत्री पारखून घे...

अशा मित्रत्वाला बांधून ठेव पोलादी कणखर साखळी...

सारख्या भावबंधनानं...

आकर्षणांना भुलू नकोस...

अननुभवानं नाही त्या गर्तेत पडू नकोस...

क्षणकाल मोहात टाकणारे प्रसंग येणार नाहीत, असं नाही पण सावधानतेनं वाग...

संयमानं वाग...

भांडणांमध्ये उगाच व्यर्थ वेळ घालवू नकोस...

भांडणांना सामोरं जाण्यापूर्वी सावध राहा...

आणि जर का कधी केलंसंच धाडस, तर अशी जिरव त्या शत्रूची...

की पुढच्या वेळेस तोच सावध होईल... तुला सामोरी यायला...

आजुबाजूच्या सर्वांचाच कान देऊन ऐक...

मात्र तुझा आवाज फार थोडयांसाठी जपून ठेव...

भेटणाऱ्या प्रत्येकाचं मत विचारांत घे...

पण तुझा निर्णय हा तुझाच असायला हवा.

तुझ्या खिशातल्या पैशांना विचारून, तुझ्या छंद-सवयींचे तू लाड कर...

त्या छंदांनाही विविधता हवी, संपन्नता हवी मात्र भडकपणा नको...

चोखंदळ राहा, चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी...

कारण जिथे तू चाललायस, त्या देशातले, फ्रान्समधले खरे दर्जेदार लोक चांगल्या गोष्टींबद्दल फार चोखंदळ असतात, बरं...

अगदी तुम्ही घातलेल्या पोषाखापासून...

पैशांच्या बाबतीत...

मित्रांकडून पैसे कधी उसने घेऊ नकोस...

अथवा उसने देऊही नकोस...

अशाने गमावशील तू ते पैसे आणि तो मित्रही...

उसने घेण्याच्या सवयीने...

बेदरकार खर्च करायला लागशील दुसऱ्यांच्या पैशांवर...

आत्ताच तर शिकायचे आहे तुला...

आहे त्या पैशांत नीटनेटकेपणाने भागवण्याचे कसब...

हे तर लक्षात ठेवच, पण या सगळयापेक्षा महत्त्वाचे...

तू प्रामाणिक राहा, तुझ्या स्वत:शी... तुझ्या आत्म्याशी...

रात्रीनंतर दिवस; या सत्याइतकेच सत्य तू सतत ठेव तुझ्या आचरणात...

असे वागलास, तर कधीच धाडस होणार नाही अपयशाचे...

तुझ्या वाटेला येण्याचे...

अच्छा, तर मग...

चल निघ आता बाळा...

माझे खूप खूप आशीर्वाद...

आहेतच तुझ्याबरोबर...

- आई

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.