गुजरात : 1 मे - 1960 ते 2010


 

एक मे 1960 रोजी सकाळी उठल्यावर, एकाच क्षणी गुजरातेतले मराठी आणि महाराष्ट्रातले गुजराती आपापल्या जागी परप्रांतीय झाले! दोन्हीकडची संबंधित माणसं कावरीबावरी झाली. महागुजरातचंही आंदोलन झालं होतं. पण ते महाराष्ट्रातल्यासारखं उग्र नव्हतं. मुंबईकर गुजरात्यांना मुंबई हवी होती, पण भाषा व भौगोलिक संलग्नता या निकषांपुढे ते जमलं नाही. त्यामुळे त्यांचीही तगमग झाली. नंतर शिवसेनेचा उग्र अवतार पाहून कित्येक गुजरात्यांनी गुजरातेत जमीनजुमला विकत घेण्यास सुरुवात केली होती. पण शिवसेनेने हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला तेव्हा मुंबई-महाराष्ट्रातील गुजरातीही निर्धास्त झाले. काही तर शिवसेनेला अनुकूल झाले व तेही शिवसेना-भाजप यांच्या आंदोलनात सामील झाले. काळाचा महिमा मोठा असतो! शिवसेनेचे आंदोलन दाक्षिणात्यांविरुध्द होते. (यंडुगंडू). ते मुंबईत आता सुखासमाधानाने नांदतात. राजसेनेच्या आंदोलनात त्यांचे नावदेखील निघत नाही! राज ठाकरे युपी-बिहारवाल्यांविरूध्द उठले.
 

जेव्हा एका प्रांताचे दोन विभाग होतात तेव्हा त्यानंतर कोण किती प्रगती करतो हे सहजपणे पाहिलं जातं. गुजरात स्वतंत्र राज्य झाल्यानं गुजरात्यांचा फायदा झाला. त्यांना प्रत्येक निर्णयासाठी मुंबईला धाव घेण्याची गरज उरली नाही. गांधीनगर ही नवी राजधानी झाली. गुजरातच्या प्रगतीस हातभार लावण्यात सरदार वल्लभभाई पटेल, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी स्थापणारे आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्थापण्यास मदत करणारे कस्तुरभाई लालभाई आणि विक्रम साराभाई यांचं योगदान मोठं आहे. कुरियन हे दक्षिण भारतीय असून त्यांनी गुजरातेत श्वेतक्रांती केली. तेथील तेरा हजार खेडयांतील अठ्ठावीस लाख कुटुंबं दूध उत्पादन करताहेत. 'अमूल' ही पिशवीतून दूध वितरित करणारी जगातली अव्वल संस्था आहे. त्यामुळे एकाही शेतकऱ्यानं गुजरातेत आत्महत्या केली नाही. हे सगळं उद्यमी गुजराती लोकांनी केलं. त्यात सरकारचा काही संबंध नव्हता. पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळ अशीच घडून आली. पण त्यातून राजकारण्यांची धन झाली आहे. त्या प्रदेशांचा विकास झाला. पण जनतेला तो लाभ वाटत नाही.

 

कोणत्याही राज्याचा विकास हा कृतिशील नागरिकांमुळे होतो. शासनानं साथ दिली तर दुधात साखर. महाराष्ट्राचे किंवा गुजरातचे जे 'आयडॉल्स' आहेत त्यांतल्या एकाच्याही कर्तृत्वात राज्य सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा हात नाही. ना व्यवस्थेचा त्यांच्या घडणीत हात आहे. सगळे स्वयंभू आहेत. व्यक्तीचा विकास व्यक्ती करते. पण व्यक्तिसमूहाच्या गरजा भागवण्यासाठी राज्यसरकार कारणीभूत ठरते. सरकारनं वीज, रस्ते, पाण्याची पुरेशी सोय केली तर लोक सचिवालयाची वा पालिकेच्या वॉर्ड ऑॅफिसची पायरीसुध्दा चढणार नाहीत.

 

गुजरात राज्याच्या स्थापनेपासून आजवर काँग्रेस, जनतादल व भाजप यांचे एकवीस मुख्यमंत्री झाले. सध्या नरेंद्र मोदी आहेत. यशवंतराव चव्हाणांसारखे प्रांताच्या विकासाबाबत दूरदृष्टी लाभलेले जीवराज मेहता, बळवंतराय मेहता आणि बाबुभाई पटेल व हितेन्द्रभाई देसाई यांच्यासारखे सिध्दांतवादी व प्रामाणिक मुख्यमंत्री सुरुवातीची वीस वर्षे मिळाले. यांतील बाबुभाई पटेल विद्वान होते. त्यांना गुजरातचे प्रश्न पाठ होते व ते भाषणात ठासून मांडणी करत असत. त्यांनी नर्मदा योजना कार्यान्वित केली.

 

त्यानंतर माधवसिंह सोलंकी, अमरसिंह चौधरी, केशुभाई पटेल, चिमणभाई पटेल या मुख्यमंत्र्यांच्या कामाबाबत लोक फारसे समाधानी नव्हते. गेल्या दहा वर्षांत गुजराती माणसांनी नरेंद्र मोदी यांच्यावर दोन वेळा पूर्ण विश्वास टाकला आहे. मोदी खंबीर असून कोणालाही धूप घालत नाहीत. ते राज्याच्या विकासाच्या निर्णयांबाबत कोणाही श्रेष्ठीचा सल्ला घेण्याच्या फंदात पडत नाहीत. त्यांना गुजरातचा विकास साधायचा आहे. हे त्यांच्या प्रत्येक कृती-विचारामधून दिसतं. तेच त्यांच्यावरील जनतेच्या विश्वासाचं अधिष्ठान आहे.

 

ते अनिवासी गुजरात्यांना विकासात सामावून घेणं, गुंतवणुकदारांना राज्यात आमंत्रित करणं यांसारखे विकासास उपयुक्त निर्णय घेत आहेत. त्यांचं नाव गुजरात राज्याच्या निर्मितीनंतर झालेल्या चांगल्या मुख्यमंत्र्यांमध्ये घेतलं जातं. ते प्रामाणिक आणि खंबीर असल्याचा लोकांना विश्वास वाटतो. गेल्या आठ-नऊ वर्षांत जातीय दंगा झाला नाही. मुलींना शिक्षण सक्तीचं केलं गेलं आहे. आरोग्य सेवेच्या बाबतीत 108 नंबरचा फोन लावला की पाच मिनिटांत रूग्णवाहिका दारात हजर होते. अशा चारशे रूग्णवाहिका गुजरातेत आहेत. गंमत म्हणजे गेल्या वर्षापर्यंत दोन हजार मुलांचा जन्म रूग्णवाहिकांत झाला! बाईकवरून कोणी पडलं-आपटलं की जाणारे-येणारे 108 नंबर फिरवतात. पाच मिनिटांत एक डॉक्टर व परिचारिका असलेली रूग्णवाहिका त्या स्थळी हजर होते.

 

गुजरातेतील रस्ते भारतात उत्तम आहेत, हे इतर प्रांतियांचं मत आहे. वीजनिर्मितीची बारा केंद्रे आहेत. त्यामुळे चोवीस तास वीजपुरवठा मिळतो. इन्व्हर्टरची गरज पडत नाही. गेल्या पन्नास वर्षांत गुजरातनं केलेली प्रगती महाराष्ट्रापेक्षा उजवी आहे. गुजरात रिफायनरी, गुजरात स्टेट फर्टिलायझर, हेवी वॉटर, रिलायन्स रिफायनरी (जामनगर) या मोठया संस्था आहेत. गौतम अदाणी. निरमा यांच्यासारखे कारखाने निर्माण करणारी माणसं आहेत. मुळात गुजरातेतील पटेल, बनिया आणि जैन या प्रमुख जातींत भविष्याची स्वप्नं पाहण्याची वृत्ती आहे. तीच त्यांना अणि इतरांना पुढे घेऊन जात असते. मुंबईतही त्यांचंच प्राबल्य आहे. कोणत्याही प्रांताची प्रगती ही शासकांइतकीच नागरिकांच्या उद्यमशील वृत्तीवर अवलंबून असते आणि नेमकी तीच गोष्ट गुजरातला पुढे पुढे नेत आहे.

 

गुजरात राज्य स्थापनेपासून पन्नास वर्षं सर्व व्यवहार गुजराती भाषेतून चाललेला आहे. बडोद्यातल्या मराठी माणसांचं दोन्ही भाषांवर सारखंच प्रभुत्व आहे. बृहन्महाराष्ट्रात बडोद्याची स्वतंत्र ओळख आहे. 1950 ते 1960 च्या काळात खोखो आणि कबड्डीत बडोदे, मुंबई राज्यात पहिल्या स्थानावर होती. आज तसं नाही.

 

बडोद्यात नगरपालिकेच्या एकोणीस मराठी शाळा होत्या. त्या कमी कमी होत गेल्या. महाराणी चिमणाबाई हायस्कूल ही मराठी माध्यमाची प्रतिष्ठित शाळा. तसंच हर्षदराय मेहता या गुजराती गृहस्थांनी 1951 साली मराठी माध्यमाची शाळा सुरू केली होती. या शाळांमधे शिक्षण घेतलेले मुंबई-पुणेकरांसारखे मराठी भाषेत प्रवीण आहेत.

 

पण जमाना बदलला. या शाळेने 1980 साली पालकांची एक सभा घेतली, तेव्हा तेथील बहुसंख्य पालकांनी आम्हाला गुजराती किंवा इंग्रजी माध्यम हवे अशी मागणी केली. या शाळेतल्या शिक्षकांनीही आपली मुलं गुजराती व इंग्रजी माध्यमात घातली.

 

स्वविकासासाठी स्थलांतर करणं ही सहज प्रवृत्ती असते. जो प्रांत बाहेरच्यांना आत येऊ देत नाही त्याचा विकास चांगला होत नाही. संस्थानिकांच्या काळात हुन्नरी लोकांना जरूर त्या सोयी उपलब्ध करून देऊन आमंत्रित केलं जात असे. आता जो तो स्वत:च्या आकांक्षेनुसार स्थलांतर करतो. परदेशी जातो. आज तीन लाख गुजराती अमेरिकेत आणि एक लाख कॅनडात आहेत, तर फक्त पस्तीस हजार मराठी अमेरिकेत आहेत. महाराष्ट्रात तेवीस लाख गुजराती आहेत तर गुजरातेत साडेसात लाखांहून थोडे जास्त इतकेच मराठी बोलणारे आहेत.

 

बडोदा सोडून महाराष्ट्रात जाऊन मानमरातब मिळवलेले बरेच आहेत. त्यात दशरथ पुजारी, श्रीनिवास खळे, शबीर कुमार, सुषमा शाळिग्राम; दिलीप व शोभा चित्रे (अमेरिका), बालाजी तांबे, सु.ग.शेवडे, सतारिये शमीम अहमद, पार्श्वगायक शब्बीरकुमार, गजल गायिका किरण आणि प्रसन्न शुक्ल, टाऊन प्लॅनर पिंपळस्कर, द.ग. गोडसे, पद्मजा फाटक, स्मिता भागवत (कॅनडा) अशी काही नावं घेता येतील. पन्नास-साठ वर्षांपूर्वी बडोदा सोडून मुंबई-पुण्यात येऊन स्थायिक झालेल्यांची संख्या दोन हजाराच्या आसपास असेल. त्यांनी 'बडोदे मित्र मंडळ' स्थापन केलं आहे. ते झकास चालतं. एके काळी, दादासाहेब फाळके यांना शिकवणाऱ्या कलाभवन संस्थने अनेक मोठी माणसं निर्माण केली. पण प्रत्येकाच्या प्रतिभेला वाव देण्याची क्षमता आज नाही. जे बडोदा सोडून गेले, त्यांना त्या काळात आपल्याला फारसं भविष्य नाही असं अंतर्मनातून वाटलं असेल.

 

गुजरातेतील आमजनतेनं बडोद्याला 'संस्कारनगरी' हे बिरूद दिलेलं आहे. त्याचं कारण एक गुजराती बुजूर्ग म्हणाले होते, की एके काळी शिक्षण व इतर सांस्कृतिक क्षेत्रांत बरीच मराठी माणसं होती. त्यांनी अनेक पिढयांवर चांगले संस्कार केले. म्हणून 'संस्कारनगरी' म्हटलं जाऊ लागलं. ते बिरूद आजही जाहीर कार्यक्रमात न विसरता उल्लेखलं जातं. मराठी माणसाची खरी ताकद काय आहे हे ह्या एका उल्लेखावरून देखील स्पष्ट होतं.

 

गेल्या वीस वर्षांत बऱ्याच मराठी तरुणांनी सुरत, बलसाड आणि सेल्व्हास या जिल्ह्यांत स्थलांतर केलं आहे. स्थलांतर करणारा माणूस स्थानिकांशी जुळवून घेतो किंवा स्थानिकांच्या फंदात फारसा पडत नाही. तो आपलं काम बरं व संसार बरा अशी वृत्ती धरतो. टीव्हीचा कोणत्याही भाषेतला चॅनल कुठल्याही गावी पाहता येत असल्यानं त्याचं विरंगुळा, माहिती व करमणूक या बाबतीत अडत नाही.

 

तरीही त्याच्या आठवणी मात्र त्याच्या मागेमागे असतात. काही जणांच्या आठवणींना कृतीचं अधिष्ठान मिळतं. ते स्वप्रांतावर कोरडं प्रेम दाखवण्यापेक्षा ते प्रत्यक्षात आणतात. अर्थात उंटावर बसून शेळया हाकता येत नाहीत. त्यासाठी जमीनीवर उतरावं लागतं. म्हणून ते नेमानं आपल्या मुलुखात येतात. काही अनिवासी गुजराती नागरिक तशी कामं करताहेत. त्यांनी आणंद गावाजवळ 'थामणा' नावाच्या खेडयाला स्वायत्त बनवलं आहे. त्या खेडयातले सगळे रस्ते-गल्ल्या सिमेंटच्या आहेत. ते वीज, पाणी इत्यादी कोणत्याही प्राथमिक सुविधांसाठी सरकारवर अवलंबून नाहीत. सौर वीज निर्माण केली जाते.

 

महाराष्ट्राप्रमाणे गुजरातही पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यात मग्न आहे. तसंच, बडोद्याचे काही साहित्यप्रेमी 'ईप्सित' नावाचा विशेषांक काढत आहेत. यात लिहिणारे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. देशविदेशातील मूळ बडोदेकरांनी त्यासाठी आस्थेनं लेख धाडले आहेत. बडोद्यातून मराठीतून निघणारा तो शेवटचा 'ईप्सित' नावाचा विशेषांक असेल असं वाटतं. या अंकातील बहुतेक लेखांना स्मरणरंजनाची डूब आहे.

 

ज्यांच्या हाती आर्थिक शक्ती असते त्यांची भाषा इतरांना शिकावी लागते किंवा ते आदर्श गिऱ्हाईक असल्यानं त्यांची लहर सांभाळावी लागते. हल्ली हिंदीतील काही टीव्ही मालिकांमधे मराठी पात्रांच्या कथा असतात. ती पात्रं काही वाक्यं मराठीत बोलतात. कारण टीव्ही पाहणाऱ्यांत मराठी लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे. तसंच, कुठेही मिळणारे जैन खाद्य पदार्थ हे त्याचं उदाहरण आहे.

   

- प्रकाश पेठे
(094277 86823)

 

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.