संपादकीय


संपादकीय

आषाढी एकादशीबरोबर चातुर्मास सुरू होतो. चार महिने व्रतस्थ, नेमस्त जीवन. हा पावसाळ्याचा काळ. त्यामुळे अनारोग्य फार. त्यावर उपाय आला उपवासाचा, अल्प सेवनाचा, काही कर्तव्यकर्म पाळण्याचा, त्याचाच धर्म बनून गेला. ही भारतीय जीवनरीत आहे. सा-या आवश्यक कर्मांचे भारतीय लोक कर्मकांड बनवून टाकतात. ते निर्बुद्धपणे अवलंबत राहतात.

नव्या जमान्यात त्याला ‘सेलिब्रेशन’ची डूब आली. त्यामुळे चातुर्मासातील कर्तव्यकर्माचा अर्थ लावणे सोडून दिले गेले रूढी-परंपरा जपण्याचा ठेका असलेल्या देवळादी संस्थांवर आणि कांदेनवमी  साजरी होऊ लागली हॉल घेऊन. मुंबईतील विलेपार्ल्याला घैसास हॉलमध्ये कांदेनवमीची पार्टी झाली. तेथे विलेपार्ल्यातले अवघे (ब्राह्मण) elite जमले होते. उद्योगजगतापासून सुगमसंगीत विश्वापर्यंत विविध क्षेत्रांतले अनेक लोक. नाना पाटेकर-विनय आपटे वगैरेंनी सुरू केलेली फाल्गुन अमावस्येची (वर्षअखेरीची) भारतीय पार्टी रूजू शकली नाही, परंतु घैसासांची ‘कांदेनवमी’ नक्की लोकप्रिय होईल. हे असे का घडतं आहे?

ब्राह्मण गेल्या काही वर्षांत संघटित व परंपरानिष्ठ होऊ पाहात आहेत. परंपरेचे पुनरूज्जीवन करत असताना आधुनिकतेचे मूल्य महत्त्वाचे मानले पाहिजे. ते जसे कलाव्यवहारात संदर्भाचे आहे तसे रोजच्या जीवनातही. नाहीतर ती रूढीनिष्ठता होते. रूढी-परंपरा हे शब्द एकत्र उच्चारले गेले तरी, रूढी त्याज्य असते, परंपरा श्रेष्ठ ठरू शकते-नवा अर्थ लावत गेले तर! तीन वर्षांपूर्वी एक लक्ष ब्राह्मण पुण्यात जमले, त्यानंतर बहुभाषिक ब्राह्मण संमेलने नित्य होऊ लागली. त्यांमधून जीवनार्थाचा शोध घेण्याची व्यवस्था लागणार नसेल तर संमेलने हा वृथा खर्च ठरेल.

शिक्षण-संस्कृतीची दीर्घ परंपरा असलेल्या ब्राह्मण समुदायावर या समाजात ज्ञानप्रसाराची, प्रबोधनाची विशेष जबाबदारी आहे. त्यासाठी आषाढापासून सुरू होणारा चातुर्मास (त्यानंतर येणारे दिवाळी ते शिमगा हे सण) हा उत्तम मुहूर्त समजायला हरकत नाही, ब्राह्मण समाज असे आत्मपरीक्षण करू इच्छितो का?

आषाढी एकादशी आणि विठ्ठलभेट ही मराठी संस्कृतीची खूण झाली आहे. या निमित्ताने, या शुक्रवारच्या नव्या प्रसारणात ज्ञानदा देशपांडेने जसा विठ्ठल दर्शनाचा नवा आत्मसाक्षात्कार मांडला आहे, तसे सुरेंद्र चौधरी याने अवनत होत चाललेल्या परंपरांचे वर्णन केले आहे, तर राजेंद्र शिंदे याने कीर्तन परंपरेची माहिती दिली आहे.

विश्वास काकडे यांच्या ‘मूल्यविवेक’ या स्तंभात नियमित होत असलेले त्यांचे लेखन हा आधुनिक व्यवहारामधील मूल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. अरूण निगुडकर इतिहासाचे हौशी अभ्यासक आहेत. त्यांचे नद्यांचे पाणीवाटप व भारत-पाकिस्तान संबंध याविषयातील लेखन विचारप्रवृत्त करील असे आहे.

भालचंद्र नेमाडे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणात, हवेतील मान्सून पावसाच्या ढगांइतके भरून राहिले आहेत. यंदा मान्सून जसा प्रेमाने बरसत आहे, तसे नेमाडेही त्यांच्या पद्धतीने पागोळ्या पाडत आहेत. त्यांची ‘चाळेगत’ला दिल्या गेलेल्या अनुष्टुभ पुरस्कार समारंभातील वक्तव्येही अशीच आहेत.

दिनकर गांगल

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.