‘उडान- एक झेप’


 कर्जंतमधल्या कोकण ज्ञानपीठ इंजिनीयरिंग कॉलेज मध्ये शिकणारे काही मित्रमैत्रिणी आणि काही बायो-टेक, कॉमर्स पदवीधर व डॉक्टर (B.A.M.S.) अशा वेगवेगळ्या शाखांचे विद्यार्थी-मित्र एकत्र आले. ‘समाजासाठी काहीतरी करायचं, काही अंशी समाजाचं ऋण फेडायचं’ ही भावना, हा त्यांच्यामधला समान दुवा होता. समाजसेवा, समाजसुधारणा ह्या फक्त बोलायच्या गोष्टी नसतात तर स्वत:ला जमेल त्या प्रमाणात काही केलं तर त्यांतून आनंद निर्माण होतो हे त्यांना समजलं आहे. ह्या तरुणांनी त्यांच्या कॉलेजच्या आसपास जी खेडी, पाडे आहेत तिथल्या मुलांच्या जीवनाचा थोडाफार अनुभव ‘रिसर्च वर्क’च्या काळात घेतला होता. त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी करुया असं वाटत होतं, पण दिशा सापडत नव्हती. एका ट्रेकमध्ये ती दिशा सापडली.

 

उडान टीम  नेरळजवळच्या पेठ गडावरून परतताना ओंकार आणि कंपनीला कोठिंबा गाव लागलं. ते सत्तर-ऐंशी घरांचं गाव. कर्जतपासून एकोणीस किलोमीटर दूर. तिथं जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा (सातवीपर्यंत) आहे. त्या शाळेनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. शाळेचे मुख्याध्यापक किसन दरवडा यांच्‍याशी बोलल्यावर लक्षात आलं, की तिथं बरंच काही करण्यासारखं आहे आणि मग वेगवेगळ्या छोट्या –छोट्या उपक्रमांना सुरुवात झाली. ‘उडान-एक झेप’ हे नावही ठरलं.

कोठिंबा गावातील शाळा  ‘उडान- एक झेप’ असे शब्द उच्चारले की डोळ्यांसमोर येतात ते पंख पसरून आकाशात उंच भरारी घेतलेले पक्षी. त्या पक्ष्यांसारखीच आपण व आपल्या छोट्या बांधवांनीही भरारी घ्यावी म्हणून, त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी हे तरुण-तरुणी एकत्र येऊन प्रयत्न करत आहेत.

 प्रथम, शाळेतल्या मुलांशी संवाद व्हावा म्हणून त्यांनी चित्रकला स्पर्धा घ्यायची असं ठरवलं. ओंकार, शिल्पा, स्वप्नाली व अमेय असे चौघेजण स्पर्धेसाठी साहित्य घेऊन तिथं पोचले. मुलांना तल्लीन होऊन चित्रं काढताना पाहून जे समाधान मिळालं ते हे काम पुढे जोमानं चालू ठेवण्यासाठी उत्साहवर्धक ठरलं! त्यानंतर मैदानी खेळांची सामग्री देणं आणि चित्रकला स्पर्धेची बक्षिसं देणं अशा कार्यक्रमांसाठी त्या मुलांकडे ‘उडान’चा ग्रूप जात राहिला.मुलांना नकाशावाचन शिकविताना

मुलांना विशेष आवडलेली ‘अॅक्टिव्हिटी’ (हा ‘उडान’वाल्यांचा खास शब्द) म्हणजे प्रोजेक्टरच्या साहाय्यानं गुगल मॅपवरून केलेला भूगोलाचा अभ्यास. मुलं आणि शिक्षक, सगळ्यांनाच हे सगळं खूप आवडलं. समाधान मिळवून देणारा दुसरा असाच उपक्रम म्हणजे मुलाना स्कॉलरशिपची पुस्तकं वाटणं हा होता. मुलांनी पुस्तकांचा छान उपयोग केला. स्कॉलरशिप मिळवणार्‍या मुलांची संख्या वर्षभरात दोनवरून सातावर गेली. ‘उडान’ सदस्यांनी कोठिंबा शाळेत प्रत्येक महिन्यात दोनतरी ‘अॅक्टिव्हिटी’ करण्याचा निश्चय केला आहे. कोठिंब्याची शाळा हा त्यांचा पहिला प्रोजेक्ट होता.

 त्यांनी कोठिंब्याच्या शाळेत जम बसल्यावर दुसरा प्रकल्प हाती घ्यायचं ठरवलं. त्यांना बदलापूरच्या ‘सत्कर्म अनाथाश्रमा’ची माहिती मिळाली. ‘उडान’ची ‘टीम’ तिथं पोचली तेव्हा पहिल्याच भेटीत सर्वंजण तिथल्या मुलांच्या प्रेमात पडले. ‘आपल्याबरोबर कोणीतरी खेळायला आलंय’ या भावनेनं उंडारलेल्या त्या छोट्या मुलांना पाहून ‘उडान’चा उत्साह द्विगुणित झाला. ‘उडान’वाले आता नियमित तिथं जातात. ‘उडान’ची सदस्य शिल्पा सांगते, की त्यांना आमचा ‘इमोशनल सपोर्ट’ हवाय. मुलं म्हणतात, ‘काहीही आणू नका पण तुम्ही नेहमी येत राहा’. ‘उडान’ त्यांच्यासाठी वेळ काढतं.

कोठींबे गावात भरवण्‍यात आलेले विज्ञानप्रदर्शनपुढचा प्रकल्प होता विज्ञान प्रदर्शन. शाळेतली मुलंही जिज्ञासू आहेत, त्यांना नाविन्याची आवड आहे. म्हणून ‘उडान’च्या ‘टीम’नं शाळेत विज्ञान प्रदर्शन मांडलं. मुलांनी अभ्यासलेले छोटे छोटे सिद्धांत- जसं, मेणबत्ती जळण्यासाठी प्राणवायू लागतो. प्रकाश सरळ रेषेत जातो, आर्किमिडीजचा सिद्धांत वगैरे- प्रयोगांनी सिद्ध करून दाखवले गेले. हा उपक्रम म्हणजे कार्यशाळाच होती. मुलांना सर्टिफिकेटस वाटण्यात आली. त्यामुळे मुलांना आनंद मिळाला आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढला.

 ‘उडान’वाले शहापूरच्या जवळ तीन गावांतही पोचले आहेत. तिथे खराडे, टेंभुर्ली, बेलवली ह्या तिन्ही गावांतील शाळांमधली मुलं एकत्र आली आणि नकाशावाचनाच्या कार्यशाळेत दाखल झाली. ‘या कार्यशाळेमुळे नकाशा-वाचन हा समजण्यास क्लिष्ट असलेला भाग रंजक पद्धतीनं विद्यार्थ्यांसाठी सहजसाध्य झाला असं आम्हाला मनोमन जाणवलं असं प्रशस्तिपत्रक टेंभुर्ली गावच्या शाळेच्‍या मुख्याध्यापकांनी दिलं आहे. जानेवारीमध्ये झालेल्या ह्या कार्यशाळेत सुमारे दोनशेपस्तीस मुलांना प्रवेश मिळाला आणि सर्व मुलं खूष झाली.चित्रकलेच्‍या स्‍पर्धेत

‘उडान’च्या मुलांनी स्वत:हून, रस घेऊन, स्वत: खर्च करून छोट्या-मोठ्या उपक्रमांनी ग्रामीण भागातल्या मुलांशी संवाद निर्माण केला आहे. त्यांच्याशी अनोखं नातं जपायला सुरुवात केली आहे. त्यातून शहर आणि गाव ह्यांतलं अंतर कमी होत आहे.

 ‘उडान टीम’ला भेटणं हा छान अनुभव होता. त्यांच्या उपक्रमाची नोंद नेटवर, ब्लॉगवर होते. त्यांच्यातली उत्स्फूर्तता त्यांच्या ब्लॉग च्या लिखाणातही आहे. आधुनिक तंत्र आणि मंत्र यांचं साहाय्य घेऊन ‘उडान’ पुढे जात राहील.
 अजून लक्षणीय गोष्ट म्हणजे सगळ्यांनाच प्रत्येक उपक्रमाच्या वेळी जाता येणार नाही हा विचार करून ते छोटा ‘ग्रूप’ करून जातात. ज्या चार-पाच जणांना जमेल तेच त्या त्या उपक्रमासाठी जातात. त्यांच्यापैकी एकजण रिपोर्ट लिहितो व इतर सार्‍यांना कळवतो. शिक्षणानं आलेला पद्धतशीरपणा, पोक्तपणा आणि कोणताही अभिनिवेश न आणता सहजतेनं आपल्याला जमेल ते काम करताना आनंद देणं व घेणं हे ‘उडान’ टीमचे गुण मला प्रशंसनीय वाटले.
ज्योती शेट्ये - भ्रमणध्वनी :9820737301, इमेल : jyotishalaka@gmail.com  ओमकार मंद्रे - भ्रमणध्वनी : 9773465286, इमेल : mandre.omkara@gmail.com  किसन दरवडा, मुख्‍यध्‍यापक, कोठिंबे जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, भ्रमणध्‍वनी9850579445

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.