चित्रसप्तमा


     डिजिटल कॅमेरा बाजारात आल्यापासून तो पुष्कळांच्या हाती दिसू लागला. शिवाय, मोबाईलने छायाचित्रे घेण्याची सोय झाल्यामुळे सर्वांकडे हजारो चित्रांचा संग्रह झाला असणार! पाच-सात वर्षांची लहान मुलेही फोटो काढताना दिसतात. एकेकाळी स्त्रियांनी छायाचित्रे काढण्याची प्रथा नव्हती. होमीबाई व्यारावाला यांच्यासारखी एकादीच. त्यांनी नव्वदी ओलांडली आहे. त्यांनी व छायाचित्रणास सुरूवात केली होती. आज मात्र सहज उपलब्धतेमुळे तरूण-तरूणींच्या हाती कॅमेरे दिसतात.

     छायाचित्रणकला शिकण्यासाठी महाविद्यालयांत, तसेच खासगी वर्ग चालतात. त्याशिवाय, स्वतः शिकून छायाचित्रणात प्राविण्य मिळवलेले बरेच असतात. चांगली छायाचित्रे कशी घ्यावीत याविषयी असंख्य पुस्तके आहेत. 'बेटर फोटोग्राफी'सारखी मासिके मिळतात. 'नॅशनल जिओग्राफी'ने फिल्ड गाईड छापले आहे. चित्रपट किंवा दूरदर्शन मालिका यांमधे काम करू इच्छिणारे दर्जेदार छायाचित्रकारांकडून हजारो रूपये मोजून आल्बम बनवून घेतात. पशू-पक्षी-निसर्ग यांची छायाचित्रे काढणारे विशेषज्ञही आहेत. पण त्या मानाने वास्तूंची आणि नगरांची छायाचित्रे घेणारे कमी आहेत. चांगली छायाचित्रे काढता यावीत असे प्रत्येकाला वाटते. छायाचित्रण शिकणार्‍यांना ‘रूल ऑफ थर्ड’ शिकवला जातो. हा नियम दृश्यकला क्षेत्रातही  लोकप्रिय आहे. खालील रेखाचित्रात दाखवल्यानुसार इच्छित दृश्याचे छायाचित्र घेत असताना डिजिटल किंवा फिल्म कॅमेर्‍यात दिसणार्‍या चित्राचे उभे तीन आणि आडवे तीन असे नऊ भाग मानायचे असतात. त्यात इच्छित छायाचित्रातील गोष्टीचा केंद्रबिंदू उभ्या-आडव्या रेषा जिथे एकमेकांना मिळतात तिथे धरायचा असतो.

     छायाचित्र काढताना नऊ चौकटी डोळ्यांसमोर आणून, योग्य रेषाछेदावर फोकस करून क्लिक केल्यास उठावदार चित्र तयार होण्याची शक्यता वाढते. सोबतच्या चित्रात ते स्पष्ट दिसू शकेल. हे छायाचित्र कुठूनही घेता आले असते. पण दिसणार्‍या होड्या बंदराचा किनारा व समुद्राचे पाणी, डोंगर व आकाश हे सगळे त्यात असणे आवश्यक होते. त्यामुळे चित्राला विषय मिळून त्यात जिवंतपणा आला.

नेपल्सचे बंदर

     सोबतच्या छायाचित्रातील माणसे ‘रूल ऑफ थर्ड’मनात कल्पून मधल्या तीन चौकटींपैकी डाव्या चौकटीत माणसांचा घोळका एकत्र पकडून चर्चच्या बांधकामाच्या कलात्मकतेचे वैशिष्ट्यही दर्शवता आले आहे.

 

 

 

 

 

फ्लॉरेन्समधील चर्च

     या चित्रात डावीकडील पहिली उभी रेषा व खालून पहिली रेषा जिथे मिळतात तिथे फोकस केल्यामुळे इतर गोष्टींची मांडणी केल्याने त्रिमिती चित्र जास्त परिणामकारक वाटून रस्त्याचे वास्तवचित्र डोळयांसमोर उभे राहते. यात रस्त्याची डावी अथवा उजवी बाजू स्पष्ट दिसावी, पण फोकस मात्र दोन उभ्या रेषांच्या छेदावर ठेवावा असे 'रूल ऑफ थर्डस्' सुचवतो.

     चित्रकला, शिल्पकला या विषयांत भूमिती आणि गणितशास्त्राचा आधार घेऊन चित्रण करणारेही आहेत. उदाहरणार्थ, लिओनार्दो याचे चित्र-शिल्पकलांखेरीज इतर काही विषयांमध्ये प्राविण्य होते. त्याने मोनालिसाचे जगप्रसिध्द चित्र काढताना 'गोल्डन रेक्टॅंगल'चा वापर केला होता. ग्रीक आणि इटालियन कलावंतांनी देखील प्रमाणबध्दतेसाठी अनेक वेळा गणिताचा आधार घेऊन आपल्या कलाकृती जगन्मान्य केल्या आहेत. या बाबतीत ग्रीक कलावंत सगळ्यांच्या पुढे होते. सोबतचे फिल्मस्ट्रिपचे रेखाचित्र इंटरनेटवरून घेतले आहे.

     या रेखाचित्रात दर्शवल्यानुसार 35 एमएमची फ्रेम ही गोल्डन रेक्टॅंगल असे. त्यामुळे तिचा वापर करून काढलेल्या छायाचित्रातील ते तंत्र थोड्या अभ्यासानंतर सहजपणे लक्षात येत असे. अनेक जाणकार छायाचित्रकारांनी त्यानुसार चित्रमांडणी केलेली आहे. तसेच, गोल्डन ट्रँगल, गोल्डन स्पायरल यांचा आधार घेणारेही आहेत. इजिप्तमधील पिरॅमिडच्या निर्मितीत तर गणित आणि भूमिती ठासून भरलेली आहे. त्याचीही सविस्तर आणि सचित्र माहिती ‘इंटरनेट’वर उपलब्ध आहे.

     पण आता डिजिटल कॅमेर्‍यातील एलसीडी चौरसाकारही असते. त्यामुळे प्रमाणबध्द छायाचित्र घेणे जास्त अवघड झाले आहे. दुसरे असे, की आजचा कॅमेरा छायाचित्रे घेण्यास अतिशय सोपा झाल्याने आणि वाजवी भावात उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर वाढला आहे. दिसणारे दृश्य क्लिक करताना डोळयांसमोर कोणत्या चौकटी असाव्यात हे ठरवणे बाजूला गेले आहे. मात्र क्लिक करायचे इतकेच काम उरले आहे.

     छायाचित्रणात 'रूल ऑफ थर्ड' या सर्वमान्य नियमाचा आधार घेऊन काढलेल्या चित्रांची कल्पना यावी म्हणून या छायाचित्रांचा समावेश केला आहे.

     त्याशिवाय वास्तू व अन्य गोष्टींसह रस्त्याचे स्वरूप स्पष्टपणे कळावे म्हणून मी माझ्या 'रूल ऑफ सेव्हन्थ'ची म्हणजे 'चित्रसप्तमा'ची मांडणी करत असतो. या नियमाचा वापर करणे जास्त सोपे आहे. यात चित्रचौकटीचे आठ सारखे भाग कल्पून सातव्या  भागावर लक्ष केंद्रित करावे. त्याचे दोन नमुने सोबत दिले आहेत.

     वरचे चित्र घेताना फ्रेमचे आठ भाग कल्पून पर्स्पेक्टिव्हची तिरकी रेषा सातव्या उभ्या रेषेला जिथे मिळते असे मनात धरून कंपोझिशन केल्यास चित्राला उठाव येतो. पार्क केलेल्या गाड्या, उजव्या बाजूच्या इमारती, लाल छपराची शेड वगैरे चित्राला रंगतदार बनवण्यास मदत करतात. रोममधे फुटपाथ आपल्यापेक्षा वेगळ्या जागी असतात ते चित्रावरून कळेल.

     खालील चित्रात वृक्षाला पाणी देण्यासाठी केलेली सोय दाखवण्याची होती. त्याशिवाय समोर दिसणारा रस्ता व इमारतीही असायला हव्या होत्या. तसेच, फुटपाथच्या डाव्या बाजूलाही पार्किंगची सोय करण्याची कल्पना वाटल्याने तिचा रस्त्याशी असलेला संबंध दाखवून चित्र अर्थपूर्ण करण्याचा मानस होता. म्हणून मांडणीत फोकस झाडाच्या बुंध्यावर केलेला असला तरी पर्स्पेक्टिवमधील रेषा माझ्या कल्पनेतील सातव्या रेषेत जाऊन मिळते. चित्राच्या एकूण मांडणीत सातवे घर महत्त्वाचे आहे. उजव्या बाजूचे चित्रही माझ्या त्याच नियमात बसवले आहे.

     खालील चित्रात कलोझियममधील खांबांचे भग्नावशेष व खांबांची हारमाळेसह दिसणारी दोन माणसे दाखवायची होती, म्हणून सातव्या रेषेवर फोकस करून संपूर्ण चित्र 'चित्रसप्तमा' या कल्पनेत बसवले आहे. ही सगळी छायाचित्रे इटालीतील रोम, व्हेनीस, फ्लॉरेन्स व नेपल्स नगरांतील आहेत.
 

    

     दुस-या छायाचित्रांत व्हेनीसमधील सेंट मार्क स्क्वेअरमधील  इमारतीच्या कॉरिडॉरमधे लहान मुलगी कबुतराच्या मागे हळुहळू जात असताना कॅम्पनाईल अर्थात घंटामिनार; तसेच, मोकळ्या जागेतील माणसेही चित्रीत करायची होती. पण फोकस सातव्या घरातील मुलीवर करून चित्रात 'लहान मुलीची पक्षाबाबत असलेली सहज उत्सुकता' हा  विषय मांडायचा होता.

     ‘रूल ऑफ थर्ड’ आत्मसात करायला पुष्कळ सरावाची गरज असते. गोल्डन रेक्टँगल, गोल्डन स्पायरल वा ‘गोल्डन ट्रँगल’मध्ये समोरचे दृश्य बसवणे त्याहून अवघड आहे. या सर्व नियमांचे पालन करण्याआधी माझ्या 'चित्रसप्तमा' या नियमानुसार सराव केल्यास नवख्या छायाचित्रकारांना सोयीचे होईल.

     चित्रे सादर करताना कॅमेर्‍याच्या वापराबाबत माहिती देण्याचा संकेत आहे. त्यानुसार, मी येथे माहिती देतो. मी आग्फाच्या साध्या बॉक्स कॅमेर्‍यावर सुरूवात करून मित्राच्या रोलिकॉर्ड रोलीफ्लेक्स या कॅमेर्‍याचा उपयोग केला. पैसे मिळवू लागल्यावर बहात्तर फ्रेम देणारा 'फुजिका' कॅमेरा घेतला. यात छत्तीस फ्रेमच्या ऐवजी बहात्तर छायाचित्रे टिपता येत. तसा कॅमेरा कालबाहय झाला आहे. तो बाजारातही मिळत नाही. पुढे कॅनन कॅनोनेट बरीच वर्षे वापरला. त्यानंतर 'कॅनन इओएस रिबेल' हा एसएलआर कॅमेरा माझी छायाचित्रणाची हौस पुरवण्यासाठी आमच्या मुलाने दिला. तोही अनेक वर्षे वापरला. त्याच्या सोबत टेलिलेन्स असल्याने फुलपाखरे वा पक्षी यांचे छायाचित्रण सोपे झाले. आज आमच्याकडे कॅनन डिजिटल पाच मेगापिक्सेलसह दहा ऑप्टिकल झूम तसेच कॅनन दहा मेगा पिक्सेलसह चार ऑप्टिकल झूम असे दोन कॅमेरे आहेत.

     मी हौशी छायाचित्रकार असून फ्लॅशचा वापर कधीही करत नाही. मात्र सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या सूर्यप्रकाशावर फ्लॅशचा वापर अवलंबून असतो. रोममधे जून महिन्यात सूर्य सकाळी साडेपाचला उगवून रात्री पावणेनऊला मावळतो. त्यामुळे छायाचित्रणास भारतापेक्षा तीन तास जास्त वेळ मिळतो. माझा स्टुडिओ नाही. येथील सर्व छायाचित्रे मी व माझ्या पत्नीने दोन डिजिटल कॅमेर्‍याने घेतली आहेत.

प्रकाश पेठे,

भ्रमणध्वनी : 094277 86823, दूरध्वनी: (0265) 264 1573

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.