श्री देवी भगवती, मुक्काम कोटकामते!


सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडपासून तीस किलोमीटर अंतरावर कोटकामते हे निसर्गरम्य, टुमदार गाव आहे. पूर्वी त्या गावी एक किल्ला होता. त्याचे अवशेष म्हणून गावात प्रवेश करताना बुरुज व थोडीफार तटबंदी दिसतात. या कोटामुळे गावाचे नाव कोटकामते असे पडले. गावाची वस्ती पंधराशेच्या आसपास आहे. दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी तेथे सुमारे पावणेतीनशे वर्षांपूर्वी स्थापना केलेली श्रीभगवतीदेवी हे त्या गावाचे भूषण. तेथे ‘भल्ली भल्ली भावय’च्या जल्लोषात भावई उत्सव साजरा होतो. श्री देवी भगवतीच्या प्रांगणात ढोलताशांच्या तालावर आबालवृध्द भावईच्या सोबतीने चिखलात रंगून जातात, तर महिला कळश्यांचा नवस फेडण्यात दंगल्या होतात!
 

कान्होजी आंग्रे ह्यानी गोव्यातून वारंवार होणा-या पोर्तुगीज हल्ल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वत:च्या शौर्याच्या लढायांबरोबरच श्री देवी भगवतीला साकडे घातले. त्यानुसार देवी नवसास पावलीदेखील, तेव्हा त्यांनी भगवतीचे मंदिर बांधले. बघता बघता, तिचा लौकिक जागृत व नवसाला पावणारी देवता म्हणून पसरला.
 

मंदिरात प्रवेश करतानाच कान्होजी आंग्रे यांच्या काळामधील कोरीव काम आणि मंदिराची भव्यता डोळ्यांत भरून राहते. तेथील पुरातन वड-पिंपळाच्या वृक्षांचे पार आणि देवीचे वाहन असणारी सिंहप्रतिमा बघून आदर तयार होतो. प्रवेश-पायरीशी उलट्या पुरलेल्या दोन तोफा दिसतात. एकाच वेळी साताठशे जण बसू शकतील असा भव्य सभामंडप, त्याचे लाकडी खांब, त्यांवरील कोरीव काम, महिरपदार कमानी, चिरेबंदी फरशी आणि सहज वाचता येणारा शिलालेख हे या मंदिराचे विशेष आहेत.
 

सहा प्रचंड लाकडी खांबांनी तोललेली तक्तपोशी, प्रत्येक खांबाचा प्रचंड परीघ, वरचा कोरीव भाग, जुन्या घंटा, चार प्रमुख देवतांचे तरंग (तरंग संस्‍कृती हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.) आणि अतिसुंदर सुबक, रेखीव श्री भगवतीची मूर्ती, शेजारचे लामणदिवे.... हे सारे मन लुभावून टाकणारे आहे.
 

श्रीदेव रवळनाथ, श्री देव हनुमान, उंच पाटावर निशाण उभारण्यासाठी असलेली आणखी उंच लाकडी डोलकाठी, मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर असणारी संगमरवरी श्री पावणादेवी, तेथील लाकडी नक्षीकाम, दीपमाळ, कलात्मक बांधणीची पिण्याच्या पाण्याची विहीर, भक्तजनांच्या सोयीसाठी बांधलेली धर्मशाळा या गोष्टी मनाला आणखी भुरळ घालतात.
 

ह्या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जमिनीच्या सात-बारा उता-यावर प्रमुख कब्जेदार इनामदार म्हणून ‘श्री देवी भगवती संस्थान, कोटकामते’ असा ठळक उल्लेख करण्यात आला आहे. इतिहासकालीन संस्थाने खालसा झाली असली तरी हे गाव इनाम म्हणून देवस्थानाला दिलेले आहे.
 

तेथे भावई उत्सव आषाढी पौर्णिमेपासून तीन दिवस साजरा होतो. पहिल्या दिवशी इतलायी देवी (हे राजसत्ता स्थळ) आणि पावणाईच्या स्थळात प्रत्येकी सहा कोंबड्यांचा बळी दिला जातो. बळी द्यायच्या कोंबड्यांना देवीने बघू नये म्हणून केळीच्या किंवा चवईच्या पानांनी झाकतात. श्रीपावणाई ही ग्रामदेवता, ग्रामदेवतेची पूजा ही केवळ भक्तिभावातून निघालेली नसून ती भयातून उगम पावलेली आहे. तिने गावावर कसले विघ्न आणू नये म्हणून तिची पूजा किंवा जत्रा होते. तिला पूजा-नैवद्याची गरज नसते. तिला तहान असते ती कोंबड्याच्या, बक-याच्या किंवा रेड्याच्या रक्ताची! ती वर्षातून एकदा भागवली की ती वर्षंभर गावाच्या वाटेला जात नाही अशी समजूत आहे.

 

उत्सवाच्या दुस-या दिवशी चार मुलांना लुगडी नेसवून त्यांना ‘जोगिणी’ बनवले जाते आणि एका मुलाला पंचा नेसवून ‘काळ’ केले जाते. ‘कापर काठी, कापर काठी उदेव’ असे म्हणत या जोगिणींना देऊळवाडीत फिरवतात. देवळात गा-हाणे झाले की जोगिणी मानकरी पोकम ह्यांच्या घरी जातात. तिथे जोगिणींची पूजा होऊन त्यांना जोगवा देण्यात येतो. त्यानंतर सर्व घरांत जोगवा मागितला जातो. हा जोगवा मग वाटून घेतला जातो. (मुलांना जोगिणी बनवण्याच्या प्रथेबद्दल असे वाचनात आले, की पुरुषाने लुगडे वेढून घेणे ही प्रथा केवळ गंमत म्हणून अनुसरली जात नाही. कोण्या अज्ञात काळी बायका ग्रामदेवतांचे पौरोहित्य करत असत, याची ती साक्ष आहे. स्त्रीचा पौरोहित्याचा अधिकार पुरुषाने बळजबरीने हिरावून घेतला असला पाहिजे आणि मग ग्रामदेवतेला फसवण्यासाठी त्याने धोतरावर लुगड्याचा घोळ घातला असला पाहिजे. किंवा गोवा-कर्नाटकात जोगतिणी, देवदासी ह्या अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात म्हणूनही ही नवीन प्रथा सुरू झाली असेल. देवस्थानाच्या कारभारात काम करताना अग्रक्रम मिळालेल्या कुटुंबांना मानकरी म्हणतात. वंशपरंपरागत हा मान महार (आता बौध्द), गावकार, सुतार, ठाकूर, मिराशी(ब्राम्हण) ह्यांना मिळतो.
 

तिस-या दिवशी सकाळी खापरा चाळ्याची आणि खापर मुकुटाची (मुखवटा) पूजा केली जाते. खापरा चाळा हा देवस्कीचा भाग असतो. देवस्कीमध्ये सर्व पूजा येतात. देवस्की हे गावाचे केंद्र होते/असते. त्याचे घटक तीन:
 

1. बारा-पाचाची देवस्की, 2. तरंग, 3. ग्रामदेवता. बारा-पाचाच्या देवस्कीमध्ये वंस व पूर्वस यांचा महत्त्वाचा भाग असतो. हे वंस (मुळपुरुष) व पूर्वस (पूर्वज) देवस्की सुरू करण्याच्या वेळी मनुष्याच्या अंगात संचार करतात. त्या संचाराला अवसर वारे देणे, अंगात येणे, शिवकळा येणे यांपैकी काहीही म्हणतात. वंस-पूर्वसाच्या अधिकारी देवता वेगवेगळ्या असून त्यांचे वंस-पूर्वस प्रत्येक स्थळात असतात. अशी बारा स्थळे असतात. पहिले स्थळ हे पूर्णसत्तेचे (किंवा मूळ भूमिकेचे). देवस्कीची सुरुवात ह्या स्थळाच्या साक्षीने व्हावी लागते. देवळाच्या गाभार्‍यात दोन्ही बाजूंस दोन मूर्ती असतात. उजवीकडील मूर्ती ही बारांचा पूर्वस आणि डावीकडील मूर्ती हा मायेचा पूर्वस. ह्या दोन्ही पूर्वसांपुढे देवाच्या नावाने बाहेर बळी देतात. त्यास देवाचा चाळा म्हणतात. तो चाळा मुख्य देवळाच्या बाहेर असतो.
 

श्री देवी भगवती मंदिराबाहेर असणारा खापर चाळा हा तीन चौरस फुटाचा दगडी चौथरा आहे. उत्सवात त्यावर खापर म्हणजे लाकडाचा राक्षससदृश मुखवटा ठेवण्यात येतो व तो लुगड्याने वेढण्यात येतो. ह्या मुखवट्यावर तांबड्या माळात खंजीर ठेवलेला असतो.
 

खापर चाळ्याची पूजा झाल्यानंतर दुपारी मंदिराचा मानकरी सुतार (मेस्त्री) यांना ग्रामस्थ उचलून आणतात. मिराशी म्हणजे ब्राम्हण मानकर्‍याला (भट) आणण्याची प्रथा मात्र वेगळीच आहे. त्याची प्रेतयात्रा मयताचा विधी करतच आणली जाते. भटाला मंदिरात आणून मातीचे मडके घाडी हा मानकरी फोडतो. ह्या प्रथेमागची आख्यायिका अशी, की अनेक पिढ्यांपूर्वी, एका वर्षी ह्या उत्सवाच्या दिवशीच मानकरी मिराशी मृत झाला, तर देवाकडून (म्हणजे अंगात आलेल्या अवस-याकडून) असे सांगण्यात आले, की आहे तसा त्या भटाला देवळात घेऊन या. मग त्या भटाची प्रेतयात्रा देवळात आली, प्रेत देवळात ठेवले गेले, तर थोड्या वेळात तो भट जिवंत झाला! तेव्हापासून भटाची प्रेतयात्रा काढतात.

असंख्य लोकांच्या उपस्थितीत, वाद्याच्या गजरात भावई शिवकळा (म्हणजे देवीने ज्याच्या अंगात संचार केला असेल ती मानकरी व्यक्ती) खापरा चाळ्याकडे झेपावते, तिथले खापर (मुखवटा) डोक्यावर धारण करून, त्यातल्या खंजिराने कोंबड्याचा बळी देऊन भगवतीच्या प्रांगणात येते. ती शिवकळा त्या क्षणी जणू खापर भावई असते. बळी दिलेले कोंबडे मानकरी वाटून घेतात.

असा तीन दिवसांचा उत्सव!

भावईसमोर मनोकामना पूर्ण झाल्यास पाण्याने भरलेल्या पाच, अकरा कळश्या देवीच्या चरणांवर ओतण्याचा नवस बोलला जातो आणि तो फेडण्यासाठी महिलांची झुंबड उडते. त्या पाण्यानेच सगळीकडे चिखल होतो आणि तो तुडवण्यात, त्या चिखलात लोळण्यात, ‘भल्ली भावई’च्या जल्लोषात आबालवृद्ध दंग होतात.

भावई म्हणजेच श्रीदेवी भगवतीची शिवकळा (अंगात न संचारल्यामुळे) येत नसल्याने आणि खापरा देवीचे खापर (मुखवटा) चोरीस गेल्यामुळे उत्सवाची ही परंपरा चौदा वर्षांपूर्वी खंडित झाली होती. यंदा एका मानक-याच्या मुलात शिवकळा आली आणि खापरदेवाचा नवीन मुखवटा बनवून ह्या वर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात घडून आला.
 

गावातल्या लोकांचे दु:ख, क्लेश, आजार इत्यादी दूर होऊन, सर्वत्र सुबत्ता येण्यासाठी, अन्नधान्य पिकण्यासाठी उत्सव होत असल्याचे देवस्थानाचे विद्यमान मिराशी कामतेकर यांनी सांगितले. त्याच्या मते, तिथला दहा दिवस चालणारा ‘नवरात्र उत्सव’ फार सुंदर असतो. ‘नवरात्र’ पूर्ण लांबीचा चित्रपट असेल तर ‘भावई’ हा त्याचा ट्रेलर!
 

- ज्‍योती शेट्ये

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.