बदलाच्या दिशेने...


रेखा कालिंदीझारखंडची राजधानी रांचीकडून पुरूलियाकडे जाताना झालदा नावाचा प्रदेश लागतो. येथे बोडारोला नावाचे एक गाव आहे. पुरूलियातल्‍या इतर गावांप्रमाणेच येथेही शिक्षणाचा अभाव, गरिबी, बहुसंख्‍य विडीकामगार अशी स्थिती आढळते. अंधारात एखादी पणती मिणमिणत असावी, तशी भासणारी रेखा कालिंदी मला येथेच भेटली. दोन वर्षांपूर्वी रेखाने अज्ञानात पिचत पडलेल्‍या गावात बदलाचे बी रोवण्‍याचे काम केले. या बिजाला कोंब फुटू लागले असल्‍याचे चित्र आज या परिसरात पहायला मिळत आहे.

रेखा कालिंदी. वय वर्षे फक्‍त चौदा. ती बारा वर्षांची असतानाच तिच्‍या गरिब पित्‍याने तिचे लग्‍न जुळवण्‍याची खटपट सुरू केली, मात्र रेखाने त्‍यास सक्‍त विरोध करत लग्‍न करण्‍यास नकार दिला. बालविवाहाच्‍या परंपरेविरूद्ध रेखाने आवाज उठवताच तिला चांगलेच दटावण्‍यात आले आणि तिचे लग्‍न जबरदस्‍तीने लावण्‍याचे प्रयत्‍न सुरू झाले. हे समजताच रेखाने आपल्‍या परिसराच्‍या लेबर कमिश्‍नरला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. परिणामी रेखाच्‍या पालकांना तिचे लग्‍न करण्‍याचा निर्णय मागे घ्‍यावा लागला.

रेखाच्‍या मोठ्या बहिणीचे लग्‍नही अशाच प्रकारे बाराव्‍या वर्षी करण्‍यात आले होते. तिने तीन वर्षांत चार मुलांना जन्‍म दिला, मात्र एकाही मुलास ती वाचवू शकली नाही. हे पाहिल्‍यानंतर लवकर लग्‍न न करण्‍याचा आणि त्‍यासाठी गरज पडल्‍यास कडवा विरोध करण्‍याचा निर्णय रेखाने घेतला आणि तो तिने प्रत्‍यक्षातही आणला. विशेष म्‍हणजे रेखाने हा प्रयत्‍न स्‍वतःपुरता मर्यादीत ठेवला नाही. तिने आपल्‍या चुलत बहिणीचेही अशाप्रकारे करण्‍यात येणारे लग्‍न रोखले. त्‍यानंतर रेखाने या प्रकारे होणा-या बालविवाहांविरोधात जणू काही मोहिमच उघडली. आपल्‍या नात्‍यातील सुमारे एकवीस मुलींची लग्‍नं अठरा वर्षांनंतर करण्‍यात यावीत यासाठी तिने त्‍या सर्वांच्‍या पालकांशी संवाद साधला आणि त्‍यांना राजी केले. सोबत ही ‘शादी रोको’ मोहिम शिक्षणाशीही जोडली. तत्‍पूर्वी रेखाच्‍या नात्‍यातील सर्व मुली शाळेत न जाता घरी विड्या वळत असत. मात्र आता या सर्व मुली शाळेत जाऊ लागल्‍या आहेत.

रेखाची ‘बीडी छोडो, शादी तोडो’ ही लहानशी मोहिम चार भिंतींपुरती मर्यादीत राहिलेली नाही. तिचा परिणाम आजूबाजूच्‍या कुम्‍हारपाडा, कर्मदा, झालदा, कोटशिला या गावांतही दिसत आहे. तिचा परिणाम फार व्‍यापक नसला तरी फार लहानही नाही. या प्रदेशात असलेली केवळ विड्या वळण्‍याची मानसिकता काही प्रमाणात तुटू पहात आहे. आता अनेक घरांमध्‍ये शाळेत जाणा-या मुली पहायला मिळत आहे. याचा एक लहानसा नमुना मला रेखाच्‍या घरीच पहायला मिळाला. पुरूलियामधून निघण्‍यापूर्वी मी रेखाच्‍या घरी गेले असता मला रेखा म्‍हणाली, ‘‘दीदी, मुझे टिचर बनना है.’’ तिच्‍यामागोमाग घरात असलेल्‍या पुष्‍पा, सोना अशा अनेक मुलींनी आपल्‍यालाही शिक्षीका व्‍हायचे असल्‍याची इच्‍छा लाजत लाजत बोलून दाखवली. नशिबात विड्या वळण्‍याचे काम घेऊन जन्‍माला आलेल्‍या या मुली शिक्षीका होण्‍याची स्‍वप्‍नं पहात आहेत, हा बराच मोठा बदल म्‍हटला पाहिजे. रेखाची पावलं बदलाच्‍या दिशेने पडत आहेत आणि इतर लहान पावलं तिच्‍या मागे येऊ पहात आहे.

अनुपमा (पत्रकार, झारखंड)
log2anupama@gmail.com

शब्‍दांकन – किरण क्षीरसागर
९०२९५५७७६७
thinkm2010@gmail.com
(हा लेख या http://mohallalive.com संकेतस्‍थळावर प्रसिद्ध करण्‍यात आला होता) 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.