वैदिक गणित आणि बरेच काही.....


विलास सुतावणे   चाकोरीबाहेर डोकावून पाहणार्‍यांना नवनवीन वाटा खुणावत असतात. डोंबिवलीकर विलास सुतावणे यांच्याभोवती अशा वाटाच वाटा आहेत! त्यांनी त्या सर्वांवरून मार्गक्रमणा केलेली आहे. सुतावणे ह्यांच्या आयुष्यात मित्रामुळे ट्रेकिंग आले. त्यात त्यांनी स्वत:बरोबर लहान मुलांना सहभागी करून घेतले. त्याच ओघात लहान-थोरांबरोबर ट्रेकिंग, ऐतिहासिक स्थलदर्शन, पुस्तक-वाचन, कथाकथन अशा वेगवेगळ्या वाटांनी ते रमत गेले आणि सभोवतालच्यांना रमवत राहिले. ह्यातल्या विशेष उल्लेखनीय गोष्टी अशा: ते दरवर्षी मनाली इथे मुलांना घेऊन ट्रेकला जातात. ‘एक होता कार्व्हर’ ह्या पुस्तकाचे वाचन करतात, शं.ना.नवरे ह्यांच्याबरोबर त्यांच्या कथाचे अभिवाचन करतात, त्यांनी ‘किल्ले रायगड- एक देखणे दालन’ हा प्रयोग बसवला आहे..... आणि ते हे सारे नोकरी करून साधतात! ते कॉलेज-शिक्षण संपवून अंबरनाथच्या धरमसी मोरारजी कंपनीत नोकरी करू लागले. पण शनिवार-रविवारी आपल्याला आवडेल तेपण करत राहिले... त्यांनी त्या काळात मुशाफिरी केलेल्या क्षेत्रांची व छंदाची नोंद इथे विस्तृतपणे करणे शक्य नाही. पण थोडक्यात सांगायचे तर त्यांनी फोटोफ्रेमची लायब्ररी चालवली. ते आविष्कार नाट्यचळवळीत सहभागी झाले. त्या प्रायोगिक रंगभूमीवरून व्यावसायिक रंगभूमीवर छोट्या-मोठ्या भूमिका मिळेपर्यंत त्यांचा प्रवास झाला

     विलास आणि विदुला सुतावणे हे लोभसवाणे, उत्साही जोडपे आहे. त्यांच्या प्रत्येक उपक्रमामागे जीवनदृष्टी आहे. बर्‍याच सुखवस्तू घरांत बाहेरच्या दिवाणखान्यात प्रत्येक ठिकाणी देवाची फ्रेम किवा निसर्गचित्राची उत्तम फोटोफ्रेम लावलेली असते. काही दिवसांनी त्यातील नाविन्य संपते- त्याचे महत्त्व वाटत नाही. मग दुसरी आकर्षक फ्रेम मिळाली तर तेथे राहणार्‍याला आनंद होतो. ती नॉमिनल किमतीत असली तर आणखी मजा येते. म्हणून सुतावणे यांनी सनी फोटोफ्रेम सर्क्युलेटिंग लायब्ररी सुरू केली. ते घरोघरी जाऊन दर पंधरा दिवसांनी नवीन फ्रेम लावत. त्यांना इतका प्रतिसाद मिळाला की त्यांच्या योजनेचे साडेतीनशे सभासद झाले.

     त्यांचा आविष्कार (दादर) या नाट्य चळवळीशी योगायोगाने संपर्क आला. त्यातून एकांकिका सहभाग, अभिनयाची आवड उत्पन्न झाली. त्यांना गाजलेल्या ‘चांगुणा’ या नाटकात काम करण्याची संधीही मिळाली. राज्य नाट्य स्पर्धेत ‘चांगुणा’ पहिले आले. त्यांनी डोंबिवलीत स्थानिक कलाकारांना घेऊन ‘कलाप्राजक्त’ ही संस्था सुरू केली. डोंबिवलीतील या नाट्यचळवळीत प्रवीण मुश्रीफ, अविनाश सोमण, संजय रणदिवे हे कलाकार सामील झाले. त्यांनी तालमी घराच्या खोल्यांमध्ये आणि प्रयोग सोसायटीच्या टेरेसवर सुरू केले. कमीत कमी सामानात प्रयोग होत. त्यांनी या सामग्रीवर पंधरा नाटके व पन्नास एकांकिका सादर केल्या.

     त्यांनी धरमसी मोरारजी कंपनीत कामगार कल्याण मंडळातर्फे नाट्यस्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली, त्यांना, वसंत कानेटकर लिखित ‘घरात फुलला परिजात’ या नाटकात लाच घेणार्‍या ‘गृहस्था’ची भूमिका करण्याची संधी मिळाली. तसेच त्यांनी दिलीप परदेशी लिखित ‘निष्पाप’ या नाटकात काम केले. त्याचे बरेच प्रयोग झाले. त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.

     डोंबिवली म्हटली की आठवतात प्रख्यात नाटककार व साहित्यिक शं.ना.नवरे. त्यांचे अनेक कथासंग्रह निघाले. त्यांच्या कथामध्ये प्रेक्षकांना किंवा वाचकांना झटका देण्याचे तंत्र आहे. तसेच वाचक त्या कथेमध्ये गुंतून जातो. सुतावणे यांनी त्यांच्या कथासंग्रहावर आधारित ‘जन्मकथा कथांच्या’ या कार्यक्रमाकरता डोंबिवलीत ‘सुसंवाद ग्रूप’ स्थापन केला. त्यामध्ये प्रथम एक कथा सांगायची किंवा कथेचे अभिवाचन करायचे; मग ठाण्याचे श्रीहरी जोशी शं.ना.नवरे यांना प्रश्न विचारत. त्यांच्या उत्तरांमधून कथेची जन्मकथा कशी सुचली ते प्रेक्षकांना कळे. यामध्ये अभिवाचन करण्याचे किंवा कथा सांगण्याचे काम विलास सुतावणे करत.

     त्यांचा सगळ्यात लक्षणीय आणि महत्त्वाचा छंद किंवा उपक्रम म्हणजे वैदिक गणित शिकणे आणि नंतर ते खूप लोकांना शिकवणे. ते त्यांचे व्रत आहे असेच म्हणायला हवे, वैदिक गणित हा भारताचा ऐतिहासिक ठेवा आहे, तो जपावा अशी त्यांची इच्छा आहे. ते ‘दूरस्थ शिक्षण’ योजनेअंतर्गत मुंबईच्या रुपारेल कॉलेजमध्ये वैदिक गणित शिकले. व्ही.जे.टी.आय.चे प्रोफेसर भालचंद्र नाईक हे त्यांचे शिक्षक होते.

     जगभरातील सर्व आय.आय.टी. आणि एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांनी कॅलक्युलेटरपेक्षा वैदिक गणिताची पद्धत बेरजा-वजाबाक्यांसाठी सोपी आहे हे मान्य केले आहे. ही पध्दत वापरल्याने वेळ, श्रम आणि शाई या सार्‍यांची बचत होते!

     वैदिक गणित सूत्रे आणि उपसूत्रे यांमध्ये गुंफलेले आहे. ते वापरायला सोपे आहे. अर्थात त्यासाठी अटीही आहेत. अवघड गणिते वैदिक गणितसूत्रांच्या साहाय्याने हसतखेळत सोडवता येतात. तोंडी गणिते सोडवणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना पाश्चात्य विद्यापीठांतून मान्यता मिळते.

     ‘वैदिक गणिता’मध्ये मानवी मन कसे काम करते याचा विचार केला आहे. त्यामुळे आकडेमोड सोपी व जलद तर होतेच, पण मनावर ताण न पडल्याने ते सतत ताजेतवाने आणि कार्यक्षम राहते. संगणकाच्या जमान्यात हिंदुस्थानी गणिततज्ञांनी शेकडो वर्षांपूर्वी शोधून काढलेली ही पद्धत अधिक उठून दिसते.

     श्रीमद जगदगुरू शंकराचार्य, स्वामी भारतीकृष्ण तीर्थ यांच्याकडून वैदिक गणिताची भारताला देणगी लाभली. त्यांनी ‘अथर्ववेदा’त विखुरलेल्या गणिताच्या माहितीवर आधारित वैदिक गणिताच्या सोळा सूत्रांची आणि तेरा उपसूत्रांची रचना केली. गणिताचा कोणताही भाग या सूत्रांच्या पलीकडे नाही हे त्यांनी पाश्चात्य गणिततज्ञांना मान्य करायला लावले. त्यांनी आपल्या आयुष्याचा बराचसा भाग वैदिक गणिताच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी देशविदेशांत खर्च केला.

     विलास सुतावणे आपल्या ‘विविसु डेहरा’ या संस्थेतर्फे, वेगवेगळ्या शाळा-कॉलेजांमधून आणि स्वयंसेवी संस्थांमधून वैदिक गणिताच्या कार्यशाळा घेतात. कार्यशाळेत सुतावणे फक्त वैदिक गणित शिकवतात असे नाही, तर मोठमोठ्या संख्यांचे पाढे तयार करणे, तारखेवरून वार काढणे, मनातील आकडा ओळखणे अशी गंमतवजा कोडी शिकवतात. यांतून वैदिक गणिताचा नेमकेपणा स्पष्ट होतो.

     सुतावणे म्हणतात, ‘प्रत्येक कार्यशाळा, प्रत्येक ट्रेक हा वेगळा अनुभव असतो, लहान मुलांकडूनही खूप काही शिकण्यासारखं असतं. ट्रेकमध्ये येणार्‍या समस्या, संकटं अनुभवसंपन्न करून जातात.’

     त्यांची पत्नी विदुला आणि मुलगा कुणाल ह्यांचा सक्रिय सहभाग, त्यांच्या सर्व उपक्रमांत असतो. कुणालने ‘ट्रॅव्हल आणि टुरिझम’चा डिप्लोमा करून आय.टी.ची (आंतरराष्ट्रीय टुरिझम) परीक्षा दिली आहे. बाबांचा छंद ही लेकाची करिअर झाली आहे. तो स्वतंत्रपणे टुरिझम ऑफिस सांभाळतो.

संपर्क –
विलास सुतावणे,
ए/9, हरी गणेश सोसायटी,
वीर सावरकर रोड,
डोंबीवली (पूर्व)- 421201,
फोन नं. 0251-2436490,
भ्रमणध्वनी : 9819504020/ 9820920322,
वेबसाइट – http://vivisudehra.com/
इमेल : vivisudehra.holidays@yahoo.com, vivisudehra@sify.com,

ज्योती शेट्ये,
भ्रमणध्वनी : 9820737301,
इमेल :  jyotishalaka@gmail.com 

प्रभाकर श. भिडे,
B-209, यमुना माधव सोसायटी,
सावरकर रोड, डोंबिवली (पूर्व)- 421201,
दूरध्वनी : (0251) 2443642

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.