बाळशास्त्री जांभेकर


_Balashastri_Jambhekar_1.jpgबाळ गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी पोंभुर्ले (तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग) येथे झाला. वडिलांनी त्यांना घरीच मराठी व संस्कृत या भाषांचा अभ्यास शिकवला. ते मुंबईला 1825 मध्ये आले व ‘एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात शिक्षण घेऊ लागले. ते पाच वर्षांच्या अभ्यासाने इतके विद्वान बनले, की त्यांची विशीच्या आत प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. ते तसा मान लाभलेले पहिले भारतीय ठरले.

त्यांची ख्याती महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक म्हणूनही आहे. त्यांनी सतीची चाल, बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या, मुलींची विक्री, समाजातील अंधश्रद्धा या गोष्टींना विरोध केला. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांमध्ये ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. तसेच, त्यांनी सर्व विषयांचा संग्रह असलेले ‘दिग्दर्शन’ हे मासिकही सुरू केले.

त्यांना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगु, फारशी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. त्यांच्या फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या बादशहाने त्यांचा सन्मान केला होता. ते गणित व ज्योतिष शास्त्रात पारंगत होते. म्हणून त्यांची नियुक्ती कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी करण्यात आली होती. शिवाय, त्यांना रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, पाशवीविद्या, वनस्पतिशास्त्र, न्यायशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास इत्यादी विषयांचे चांगले ज्ञान होते. डॉक्टर दादाभाई नौरोजी हे त्यांचे शिष्य. ते म्हणतात, “बाळशास्त्री हे अतिशय बुद्धिमान, चतुर, सालस व सुज्ञ गुरू होते.”

त्यांची एल्फिस्टन कॉलेजमध्ये गणित, वांङ्मय व विज्ञान या विषयांचे पहिले एतद्देशीय लेक्चरर म्हणून 1834 मध्ये नियुक्ती झाली. त्यांनी प्राचीन शिल्पांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांसंबंधी लेखन केले आहे. त्यांनी सार्वजनिक वाचनालये, ग्रंथालये यांचीही ठिकठिकाणी योजना केली.

त्यांनीच ज्ञानेश्वरी मुद्रित स्वरूपात वाचकांच्या हाती प्रथम दिली. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. बाळव्याकरण, कथासार संग्रह, नीतिशास्त्र, साहित्यशास्त्र, इंग्लंड देशाची बखर-  भाग 1 व 2 मरे यांच्या इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, ब्रिटिश राज्याचा इतिहास, गणित शास्त्राच्या उपयोगाविषयीचे संवाद, पुनर्विवाह प्रकरणे, मानसशक्ती विषयीचे कार्य असे त्यांचे लेखन होते.

महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक, व्याकरणकार, गणितज्ज्ञ, शिक्षण शास्त्रज्ञ व प्रकाशक असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले बाळशास्त्री जांभेकर 18 मे 1846 रोजी वयाच्या केवळ चौतीसाव्या वर्षी मृत्यू पावले.

लेखी अभिप्राय

Apratim VA mahitipurna lekh sage. Dhanyavad think Maharashtra.com

Akshay rohankar31/08/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.