श्रीक्षेत्र गाणगापूर (Ganagapur)
श्रीक्षेत्र गाणगापूर हे तीर्थस्थान गुलबर्ग्यापासून पश्चिमेला चाळीस किलोमीटरवर आहे. ते क्षेत्र भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावर आहे. तेथे यात्रेकरूंची स्नान करण्याकरता गर्दी होते. त्याचा उल्लेख गुरूचरित्रात गाणगाभवन, गंधर्वभवन, गंधर्वपूर असा येतो. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांची चोवीस वर्षांची तपश्चर्या तेथेच झाली. प्रथम ते संगमावरच (भीमा- अमरजा) राहत असत, नंतर गावातील मठात राहू लागले. मठात त्यांच्या पादुका आहेत. त्यांना 'निर्गुण पादुका' म्हणतात. मठ किंवा निर्गुण पादुकामंदिर गावाच्या मध्यभागी आहे. मठाच्या पूर्वेला व पश्चिमेला दोन महाद्वारे आहेत. पश्चिम महाद्वार प्रशस्त असून त्यावर नगारखाना आहे. मठात सात ओवऱ्या असून, त्यात सेवेकरी लोक अनुष्ठान करत बसतात. मठातील पादुकांच्या गाभाऱ्याला द्वार नाही. भक्तांना पादुकांचे दर्शन चांदीने मढवलेल्या एका लहान झरोक्यातून घ्यावे लागते.
हे ही लेख वाचा -
नरसिंहपूरचे ज्वाला नृसिंह मंदिर
रवळनाथ - लोकदेव व क्षेत्रपाळ