मुजरा शाहिराला – विठ्ठल उमप यांना!
शाहीर विठ्ठल उमप यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळाला तेव्हा आमच्या बिरादरीतील माणसाला पुरस्कार मिळाल्यामुळे विशेष आनंद झाला होता, तो अजून आठवतो. ‘संगीत नाटक अकादमी’ म्हणजे लई भारी! मोठमोठ्या कलावंतांची मिरासदारी तेथे! पुरस्कार लोकसंस्कृतीतील एका पठ्ठ्याला मिळतो म्हणजे काय? लोकसंस्कृतीकडे बघण्याचा विद्वानांचा दृष्टिकोन तसा चांगला नसे. त्या मंडळींना शेला-पागोट्यांचा मान देऊन घडीभर कौतुक केले, की झाले काम... त्यांनी प्रस्थापितांचे मोठेपण मान्य करावे म्हणून त्यांचे घडीभर कौतुक करायचे हाच शिरस्ता. म्हणूनच, परिस्थितीशी झगडून, रक्ताचे पाणी करून, लोकांमध्ये मिसळून, तळागाळातील समाजाच्या व्यथा मांडणाऱ्या उमप यांच्यासारख्या लोककलाकाराचे कौतुक राष्ट्रीय पातळीवर व्हावे, यापेक्षा आनंद कोणता?