कुंकूप्रसिद्ध गाव - केम (Kem)
करमाळा तालुक्यातील केम हे दहा हजार लोकसंख्येचे गाव. केमचे कुंकू संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. त्या गावात हळद-कुंकू उत्पादन केले जाते. कुंकू निर्मितीमध्ये हळकुंडे, चिंच पावडर, स्टार्च पावडर आदी वापरले जाते. केमची कुंकू कारखानदारी सर्वदूर पोचली आहे. कुंकू दिल्ली, अहमदाबाद, बंगलोर, हैदराबाद, जयपूर, उज्जैन, पटना, वैष्णोदेवी, केरळ आदी ठिकाणी जात असते. गावाने कुंकू निर्मितीच्या उद्योगधंद्यामुळे चांगली प्रगती केलेली आहे; बेरोजगारीमुळे गाव ओस पडलेले नाही. कुंकवाचे दर वीस रुपये किलोपासून ते दीडशे रुपये किलोपर्यंत आहेत. त्याच्या प्रतवारीनुसार ते भाव ठरवले गेले आहेत. एका कारखान्यात दोन मजुरांपासून दहा मजुरांपर्यंत माणसे कामाला असतात.