वणी येथील सप्तशृंगी देवी (Saptashrungi Devi)
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या ‘वणी’ या गावाजवळील सप्तशृंगगडावरील देवीचे स्थान हे आदिशक्तीचे मूळ स्थान असून ते साडेतीन पीठांतील अर्धपीठ आहे असे म्हटले आहे.
एकपीठ ते तुळजापूर । द्वितीय पीठ ते माहूर | तृतीय पीठ ते कोल्हापूर । अर्धपीठ सप्तशृंगी।।
ॐकारातील म कार पूर्ण रूप ही आदिमाया मानली जाते. तीच सप्तशृंगी देवी. ती देवी अठरा हातांची असून आठ फूट उंचीची आहे. ती खूपच भव्य आहे. तिच्या हातात अठरा शस्त्रे व साधने - कमळ, बाण, वज्र, चक्र, त्रिशूळ, तलवार, मणिमाला, कुऱ्हाड, गदा, ढाल; यांसोबत पाश, शक्ती, शंख, घंटा, दंड, धनुष्य, पानपात्र, कमंडलू - आहेत. देवीचे प्रखर तेज डोळ्यांत न मावणारे आहे. तिला अकरा वारी साडी, रोज एका विशिष्ट रंगाची अशी आठवडाभर नेसवली जाते. तिच्या चोळीसाठी तीन खण वापरले जातात. तिला तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, नाकातील नथ, कानातील कर्णफुले आदी अलंकारही शोभून दिसतात. वणी येथील देवीच्या दर्शनासाठी आलेले काही उपासक नासिकच्या पंचगंगा, रामकुंड, येथील ‘पवित्र’ जल घेऊन येतात व ते देवीच्या मंगलस्नान अभिषेकासाठी वापरतात.