माहुली गडावरील स्वच्छता मोहीम
‘उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या माणसांबद्दल झाडांना कितीही अनुकंपा वाटली तरी ती स्वत:ची जागा सोडून, सावलीचा वर्षाव करत माणसांच्या मागे जाऊ शकत नाहीत. झाडांच्या औदार्याला, ममत्वाला एकाच जागी स्थिरावण्याचा शाप असतो.’
तसेच काहीसे सह्याद्रीतील गडकोटांचे आहे, डोंगरांचे आहे, घाटमाथ्यांचे आहे, शिखरांचे आहे.
तरी त्यांच्यात आणि झाडांत एक साम्य दिसून येतेच… ते दोन्ही स्वत:ची जागा न सोडतासुद्धा दुसऱ्यांना स्वत:ची ओढ लावून आपल्याजवळ करतात.
मी डिसेंबरअखेरीला एक छायाचित्र फेसबूकवर पाहिले: ‘किल्ले माहुली’ची पुन्हा कचराकुंडी झाली आहे! अन् बाबासाहेबांचे बोल कानात घुमू लागले. “बाळ, तुला दाढी येते तेव्हा तू काय करतोस? ती तू भुईसपाट करून टाकतोस; पण दाढी परत उगवतेच. तो शरीरक्रम आयुष्यभर चालतो. तसंच या कचऱ्याचं आहे. तो परत परत येत राहतो.”
ठाण्यातील ‘दुर्गसखा’ने माहुलीवरील कचरा साफ करण्याची मोहीम अशा परिस्थितीत हाती घेतली!
आम्ही गड्यांनी ठरवले, “२८ फेब्रुवारी रातच्याला निघून १ मार्चला पहाटेच्या पारीला गडावर जायचं अन् गड स्वच्छ करायचा. गडाला गडाचंच रूप पुन्हांदा द्यायचं.”