देवता सांप्रदायाचे प्रतीक - कोकणातील गावऱ्हाटी
कोकण प्रांतावर इतिहासकाळात राज्य करणाऱ्या अनेक राजवटींनी त्यांच्या त्यांच्या संस्कृतीच्या खुणा ही कोकणच्या सांस्कृतिक वैभवातील व निसर्गरम्यतेतील मोठीच भर ठरते. ते कोकणाचे कोकणपण! तेथे सर्वकाही असल्याने ती नवलाईची व सुजलाम, सुफलाम देवभूमी मानली जाते. तेथील धार्मिक रूढी, परंपरा, सहिष्णुता व माणुसकी यांमुळे त्या देवत्वाला माणुसकीचा मनोरम पदर जोडला गेलेला आहे. कोकणात ते गुण विशेष तयार झाले त्यास कारण ठरले, तिला न्याय, नीती व धर्माचे अनुष्ठान लाभलेली ‘गावऱ्हाटी’ (गाव रहाटी). तेथील ग्रामीण जीवनाचा गावपाडा ‘गावऱ्हाटी’ला अधीन राहून चालत आला आहे. अंधारयुगात (साधारण इसवी सन १००० ते १८००) त्यास अंधश्रद्धेची झालर प्राप्त झाली, पण ती नव्या यंत्रयुगात मोठ्या प्रामाणात नष्ट होत आहे. त्याचे कारण म्हणजे खेड्यापाड्यातील शिक्षणप्रसार. ‘गावऱ्हाटी’चे सध्याचे स्वरूप आणि तिचे मूळचे स्वरूप यांत बराच फरक आहे. तिचे मूळ स्वरूप हे सात्त्विक व सोज्वळ होते.