बलुतं - एक दु:खानं गदगदलेलं झाड!
मनुष्यसमाज, निसर्ग आणि नियती यांनी निर्माण केलेल्या नाना प्रकारच्या दु:खांनी गदगदलेल्या दगडू मारुती पवार नावाच्या माणसाची बलुतं ही एक आत्मकथा आहे. महार जातीच्या आई-वडिलांपोटी त्यांचा जन्म झाला हा त्याचा मुख्य अपराध. ह्या देशातल्या माणसांवर जातीचा अदृश्य शिक्का जन्मकाळीच उठवलेला असतो. हिंदू धर्मात तर तो शिक्का पुसून दुसऱ्या जातीचा शिक्का उठवून घेण्याची हिंदूंच्या तेहतीस कोटी दैवांपैकी एकाही देवाचीसुद्धा प्राज्ञा नाही. ब्राह्मणाला कायस्थ होता येत नाही आणि साळ्याला माळी होता येत नाही हे तर जाऊच द्या, पण बालपणीच ‘बाबा ब्लॅकशीप’ची संथा मिळालेल्या ब्राह्मणाच्या पोराने चारही वेदांतला एकही पाहिलासुद्धा नसला तरी जन्मकाळीच त्याच्यावर ऋग्वेदी ब्राह्मण, यजुर्वेदी ब्राह्मण यांसारखी मुद्रा चिकटली की तीदेखील मरेपर्यंतच काय, पण मरणोत्तरही कायम. ती पुसायचा एकमेव मार्ग म्हणजे त्याने हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती किंवा मुसलमान व्हायचे. एकपत्नी व्रताच्या हिंदूंच्यावरील कायदेशीर सक्तीमुळे देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने स्वीकारलेली पहिली बायको जिवंत असताना दुसरी करण्यासाठी काही मर्द शंकररावांचे शहाबुद्दिन वगैरे होतात तसे हिंदूंच्या जातीच्या कप्प्याचा ‘व्हॉल्व’ बाहेरच्या बाजूने उघडत नाही. जन्मकाळीच त्याला पेटीत टाकले जाते. त्याचक्षणी ते बालक सवर्ण की अवर्ण हे ठरते. हिंदू समाजात सवर्णपणाचा डाग निदान त्या बालकाचे पुढले जीवन संपूर्णपणे विद्वान करत नाही.