कविश्रेष्ठ मोरोपंत बारामतीचे
मोरोपंत पराडकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जुने कवी. त्यांचा जन्म 1729 साली पन्हाळगडावर झाला. पराडकर हे मूळचे रत्नागिरीतील राजापूर प्रांतांतील सौंदल घराणे. पराडकरांचे वास्तव्य तेथे अनेक वर्षें होते. पुढे कित्येक घराणी कोकणातून 1700 ते 1715 या पंधरा वर्षांच्या कालावधीत देशावर आली. त्यामध्ये मोरोपंतांचे वडील रामाजीपंत आणि गोळवलीकर पाध्ये यांच्यापैकी केशव व गणेश पाध्ये यांचाही समावेश होता. ते पन्हाळगड येथे येऊन शाहू महाराज यांच्याकडे देशकार्यात दाखल झाले. त्यामुळे मोरोपंत यांचा जन्म पन्हाळगड येथे झाला. रामाजीपंत यांना तीन मुले आणि एक मुलगी. मोरोपंत त्या तीन मुलांमधील तिसरे. मोरोपंतांच्या वडिलांनी तत्कालीन वैदिक शिक्षणपद्धतीप्रमाणे मोरोपंत यांच्याकडून लिहिणे, वाचणे, स्तोत्रपठण, पुराणांचे वाचन करवून घेतले. मोरोपंत यांनी संस्कृत, काव्य, नाटक व अलंकारशास्त्र यांचे अध्ययन केशव पाध्ये आणि गणेश पाध्ये यांच्याकडून आठ वर्षें करून घेतले. मोरोपंत यांनी चाळीस संस्कृत ग्रंथ त्या कालावधीत लिहिले. पुढे, त्यांचे वडील श्रीमंत बाबूजी नाईक बारामतीकर यांच्या आश्रयास बारामतीला आले. बाबूजी नाईक यांनी मोरोपंत यांच्या अंगी असलेले विद्वत्तेचे गुण पाहून वाड्यात पुराणाचे कथन करण्यास ठेवले. आनंदी आणि लक्ष्मीबाई या त्यांच्या दोन पत्नी होत्या. नाईक यांनी त्यांच्या वाड्याशेजारीच दक्षिणेलाएक वाडा मोरोपंत यांना राहण्यास दिला. नाईक यांच्या प्रेमाबद्दल मोरोपंत यांनी लिहिले आहे -