महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित - खंड दोन
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'च्या नव्या ग्रंथाचे प्रकाशन
अजिंठ्याच्या लेण्यांतील फिकट होत चाललेल्या चित्रांना मूळ रंगाचा तजेला नव्या तंत्रांनी मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी व यशस्वीही प्रयत्न नाशिकच्या प्रसाद पवार या फोटोग्राफरने चालवला आहे. त्यांच्या त्या कामाची दखल जगभर घेतली जात आहे. 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'ने त्या आगळ्या प्रयत्नाची स्क्रीनवरील दृश्य झलक प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा अभिनव कार्यक्रम योजला आहे. प्रसाद पवार यांची मुलाखत ठाण्याचे किरण भिडे घेणार आहेत.
निमित्त आहे ते 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'वरील निवडक साहित्याचा संग्रह असलेल्या 'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित - खंड दोन' या ग्रंथाच्या प्रकाशनाचे. 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे पोर्टलवरील निवडक साहित्याचे खंड, अर्थसहाय्य मिळेल त्याप्रमाणे प्रसिद्ध होत असतात. 'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित - खंड दोन' या पुस्तकाचे प्रकाशनही आगळ्या वेगळ्या पद्धतीने होणार आहे. भाषणे वगैरे नाहीत. ज्ञानाकांक्षी दोन व्यक्तींच्या - नगररचनाकार सुलक्षणा महाजन व स्वतः ख्यातनाम चित्रकार असूनही चित्रकलेचे विविधांगी डॉक्युमेण्टेशन व्हावे यासाठी झटणारे सुहास बहुळकर - यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होईल. त्याच वेळी स्क्रीनवर त्यांच्या अभ्यासाचा परिचयदेखील करून देण्यात येईल.