पुस्तकवेडे गायकरकाका!
दत्ताराम गायकर हे मुळचे कोकणातील. ते त्यांच्या कुटुंबासमवेत मुंबईतील चुनाभट्टी येथील किसन बापू चाळीत दहा बाय बाराच्या खोलीत राहतात. पत्नी, मुलगा, सून, एक नातू असे त्यांचे कुटुंब. गायकरांना छंद आहे तो दुर्मीळ पुस्तके जमवण्याचा, वाचण्याचा आणि ती पुस्तके ज्या कुणाला संदर्भासाठी हवी आहेत त्याला ती पुरवण्याचा. त्यांना लहानपणापासून वाचण्याची आवड आहे.
दत्ताराम गायकर आयआयटी, पवई येथे शिपाई म्हणून काम करत होते. ते सदतीस वर्षांच्या नोकरीनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना दुर्मीळ पुस्तके जमवण्याचा छंद आयआयटीत असतानाच लागला. ते पूर्णवेळ नोकरी करत होते तरी त्यांनी त्यांची पुस्तकांची आवड मनापासून जोपासली आणि वाढवली. गायकरांचे शिक्षण जेमतेम नववी, पण ज्ञान मिळवायचे तर शिक्षण आड येऊ शकत नाही याची प्रचीती गायकर यांच्या वाचनवेडातून येते!