हबल दुर्बीण


मानवाचा तिसरा डोळा

 

गॅलिलिओ आणि त्याने तयार केलेली दुर्बीणइटालीत जन्‍माला आलेल्‍या गॅलिलिओने चारशे वर्षांपूर्वी, १६१० साली दुर्बिणीचा शोध लावला. गॅलिलिओने दुर्बिणीच्‍या साह्याने चंद्रावरील डाग आणि गुरूचे चार उपग्रह शोधून काढले. दुर्बिणीच्‍या शोधापासून सुरू झालेला अवकाश संशोधनाचा हा प्रवास आजतागायत सुरू आहे. गॅलिलिओने लावलेला दुर्बिणीचा शोध संशोधनक्षेत्रात क्रांतिकारक ठरला. त्या दुर्बिणीचे सर्वात प्रगत रूप हबल दुर्बिणीच्‍या रूपाने आपणास दिसते. अवकाशाचा वेध घेण्‍यासाठी ‘नासा’ व युरोपीयन अवकाश संस्‍था यांनी संयुक्‍त रीत्‍या तयार केलेली हबल दुर्बीण (HubbleSpace Telescope (HST)) २४ एप्रिल १९९० रोजी अवकाशात सोडण्‍यात आली. अवकाशात सोडण्‍यात आलेली ती सर्वात मोठी व प्रगत दुर्बीण. ‘हबल’ने काढलेल्‍या छायाचित्रांमुळे जगभरातील खगोलप्रेमी भारावून जातात. दुर्बिणीने लागलेल्‍या अनेक शोधांवर पुस्‍तकेही लिहिण्‍यात आली आहेत.