गरूडेश्वरचे वासुदेवानंद सरस्वती
दत्तभक्तांचे प्रमाण महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खूप आहे. गाणगापूर, नरसोबाची वाडी ही जुनी दत्तक्षेत्रे. गुजरातेत नर्मदा ही सगळ्यात मोठी नदी. नर्मदेखेरीज इतर मोठ्या नद्यांमध्ये सुरतेजवळची तापीनदी, अहमदाबादची साबरमती नदी, बडोद्याजवळची महीनदी या आहेत. नर्मदेला मध्यप्रदेशात ‘रेवा’ म्हणतात. तिचे आणखी एक नाव ‘कृपा’ असे आहे. ती तिच्याशी जे नीट वागतात त्यांच्यावरच कृपा करते. नर्मदेकाठी तीर्थक्षेत्रे अनेक आहेत. त्यांपैकी महत्त्वाचे म्हणजे गरूडेश्वर. नर्मदा नदीचे खोरे म्हणजे वैराग्यभूमी आहे हे गरूडेश्वरीला गेल्यावर कळते. तेथेच इतर सर्व तीर्थक्षेत्रांची नावे माहीत होतात. खूप गाजलेले नर्मदेवरील सरदार सरोवर धरण नदीच्या वरील अंगाला, चौदा किलोमीटर दूर आहे.