आठवा स्वर


आठवा स्वर

- सरोज जोशी

संगीतक्षेत्रात पदार्पण करण्याच्या हेतूने अनेक आल्बम प्रकाशित होत असतात. पण ७ जून २०१० ला रवींद्र नाट्यमंदिरात वाजतगाजत प्रकाशित झालेला ‘आठवा स्वर’ हा आल्बम अनेकांपैकी एक असा, अलबत्या गलबत्या नाही तर रसिकांच्या कानांचा विषय झालेला ‘तो एकला’ आहे. ‘सारेगमप’च्या ‘लिटिल चॅम्पस्’नी सर्वांची ह्रदये जिंकलेली आहेत. ह्या बालकलाकारांच्या सांगितिक कौशल्याला, त्यांच्या विकासाला वाव देण्याच्या उद्देशाने ‘कलांगण’ संस्थेच्या चालक वर्षा भावे आणि गेली पंच्याऐंशी वर्षे संगीतवाद्यांच्या व्यवसायात कार्यरत असणा-या हरिभाऊ विश्वनाथ कंपनीचे मालक उदय दिवाने ह्या दोघांनी एकत्र येऊन ‘आठवा स्वरा’ची निर्मिती केली आहे. कंठसंगीताला वाद्यसंगीताने सुरेल साथ दिली आहे. स्पर्धेच्या मर्यादित वातावरणाच्या पलीकडच्या अफाट जगात – नवी, कोरी, ताजी गाणी गाण्याची सुवर्णसंधी संगीत दिग्दर्शक ‘ वर्षा भावे ’ ह्यांनी ‘लिटिल चॅम्पस्’ना प्राप्त करून दिली आहे.