पवई सरोवर धोक्यात
पवई सरोवर हे कृत्रिम रीत्या निर्माण करण्यात आलेले आहे. सरोवराखालील जागा इंग्रज सरकारने फ्रामजी कावसजी पवई यांना लीजवर दिली होती. ते पश्चिम भारतातील अॅग्रीकल्चरल व हॉर्टिककल्चरल सोसायटीचे उपाध्यक्ष होते. सरोवराची निर्मिती त्यांच्या जागेवर 1891 साली झाल्यामुळे पवर्इ यांचे नाव सरोवराला देण्यात आले. सरोवराच्या काठावर आयआयटी व निटी यांसारख्या प्रसिद्ध संस्था वसल्या आहेत. सरोवराचा आकार, ते बांधण्यात आले त्यावेळी 2.1 चौरस किलोमीटर(म्हणजे पाचशेवीस हेक्टर) एवढा होता. सरोवर जास्त खोल नाही. त्याची खोली वेगवेगळ्या ठिकाणी तीन ते बारा मीटर एवढी आहे. आरंभी, सरोवरातील पाण्याचा वापर मुंबईकर पिण्यासाठी करत असत. पण आता, ते पाणी पिण्यासाठी अयोग्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या पवई सरोवर हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
पवई सरोवर ज्या ओढ्यावर बंधारा बांधून तयार झाले तो ओढा पूर्वी मिठी नदीला जाऊन मिळत होता. त्या ओढ्यावर दोन बंधारे बांधून सरोवराची निर्मिती झाली आहे. ते बांधकाम एका वर्षात पूर्ण झाले. त्या साठी साडेसहा लाख रुपये खर्च आला. तयार झालेले सरोवर वेस्टर्न इंडिया फिशिंग असोसिएशनला भाडेपट्टीवर देण्यात आले. महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशन नावाची नियमित संस्था 1955 साली सुरू करण्यात आली व सरोवर त्या संस्थेकडे सोपवण्यात आले. सरोवराची काळजी घेणे, ते स्वच्छ ठेवणे, त्याची डागडुजी करणे आणि त्याचे सौंदर्यीकरण इत्यादी उद्देश त्यांच्या स्थापनापत्रात दाखवण्यात आले आहेत.