शिक्षकांना आवाहन
शिक्षक मित्रांनो, हे आपले व्यासपीठ आहे आणि आपण सर्वजण मिळून याचा प्रसार जगभर करणार आहोत. कोठलीही गोष्ट एकट्याने होत नाही. अनेकांचे सहाय्य त्यात लाभते तेव्हाच ती साध्य होते.
शिक्षकांचे व्यासपीठ ही निबंधस्पर्धा नाही. लेखनस्पर्धा नाही. किंबहुना ही स्पर्धाच नाही. ही शिक्षकांची चळवळ आहे. शिक्षक एकेकटे त्यांचा आवाज त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी उमटवत असतात. ते त्यांचे म्हणणे त्यांना जमेल तसे मांडण्याचा प्रयत्न करत असतात किंवा तशी संधी मिळाली नाही, तर ते व्यक्त न होता गुपचुप त्यांचे काम करत असतात, पण शिक्षक किंवा गुरू यांच्या गप्प बसण्यात समाजाचे फार मोठे नुकसान आहे, त्यामुळे समाज भरकटण्याचा धोका आहे, तेव्हा शिक्षक मित्रांनो, तुम्ही तुमच्या लेखण्या उचला आणि तुमची मते मांडा. उपक्रम सांगा. त्यासाठी हे व्यासपीठ आहे.
आम्ही तुम्हाला एका तरी विद्यार्थ्याबद्दलचा खरा अनुभव सांगा असे म्हणत आहोत. त्या मागचे कारण हे आहे, की एकातरी जीवनात बदल घडवून आणणे हे शंभर भाषणे देण्यापेक्षा फार मोठे काम आहे अशी आमची धारणा आहे आणि ते काम शिक्षक करू शकतो, करत असतो. लाखो रुपयांनी किंवा मोठ्या भाषणांनी जे काम होत नाही ते काम शिक्षकाचे प्रेमाचे चार शब्द करू शकतात.