शिक्षण म्हणजे स्वत:च्या क्षमतांची ओळख! (Education means recognizing own Abilities)
नानावाडा ही जुना पेशवेकालीन इमारत पुण्यात शनिवार वाड्याला लागून आहे. तेथे ‘नूतन विद्यालय’ नावाची महानगरपालिकेची पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण असणारी शाळा दुसऱ्या मजल्यावर दोन मोठाल्या खोल्यांमध्ये भरते. पहिली ते चौथीचे वर्ग, वीस-बावीस मुले व दोन शिक्षक - संध्या पांढरे आणि सुधीर दाते. दोघेही तळमळीने काम करणारे. तेथील मुले आनंदी, हसरी, गोबऱ्या गालांची अशी आहेत. अभ्यासामधील त्यांची प्रगती बऱ्यापैकी आहे. संध्या पांढरे यांच्याशी बोलताना माझ्या काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या. समाजातील सुशिक्षित वर्ग त्यांच्या मुलांना चांगले वळण लागावे म्हणून प्रयत्न करतो; चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो. उलट, नानावाडा येथील ‘नूतन विद्यालया’त मुले जेथून येत होती त्या जागेकडे, म्हणजे वेश्या वस्तीकडे जगातील वाईट ठिकाण म्हणून बघितले जाते. तेथे मुलांना घडवणे ही एक वेगळी जबाबदारी शिक्षकांवर आहे. ती जबाबदारी संध्या पांढरे व त्यांचे सहकारी सक्षमपणे पेलत आहेत.